चार वर्षानंतरच्या क्रिकेट महोत्सवाचा सर्वात रोमांचकारी दिवस म्हणजे भारत-पाक लढत अगदी जवळ येऊन ठेपलाय. आत्तापर्यंतच्या विश्वचषकाच्या सर्व पाच लढतीत भारताने पाकला विनासायास हरवले. प्रत्येक वेळेस लढत चांगली झाली. पण अखेरचा धावफलक पाहिल्यावर लक्षात येते की एकदिवसीय सामन्यात ज्याला चांगले मार्जिन म्हणता येईल, अशा वर्चस्वाने भारताने सामने जिंकले.
अॅडलेडला भारत पाकिस्तान सामन्याला जो लागतो तो सगळा रोमांच असणार आहे. म्हणजे खचाखच भरलेले स्टेडियम, दोन्ही देशांचे झेंडे, घोषणा, खून्नस, शत्रुत्वाचे अनेक जिन्नस. अशा अत्यंत परीक्षा घेणाऱया वातावरणात खेळाडूंना खेळायचे आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंची कामगिरी पाहिली की लक्षात येतं पाकिस्तानच्या खेळाडूंचा अतिखुनशी प्रवृत्तीने घात केला आहे. ही लढतच अशी असते की, प्रत्येकाला वाटतं की आपल्या हातून काही विशेष कामगिरी झाली की आपण राष्ट्रीय नायक होणार. या न आवरणाऱया सुरसुरीमुळे अतिसाहस करून हिरोगिरीच्या नादात पाकिस्तानने आपल्याविरुद्ध हार पत्करली. १९९६ साली आमीर सोहेल हिरोगिरी करायला गेला. आफ्रिदिने तर अनेकवेळा माथेफिरूपणाचा उच्चांक गाठला. भारतीय खेळाडूंचा दृष्टिकोन संयत राहिला आहे. मला वाटतं आपण पाकिस्तानला मानसिक संतुलनावर हरवू शकतो. इम्रान खानबरोबर पाकिस्तानचे शहाणपण संपले. नंतरची पिढी खूपच चंचल सिद्ध झाली. दुसरी गोष्ट एकहाती सामना फिरवणारा अक्रमसारखा कोणी खेळाडू त्यांच्याकडे दिसत नाही. भारताने चाळीस ओव्हर्स जबाबदारीने विकेट्स राखून आणि शेवटच्या दहा ओव्हर्स टी-२० सारखी फलंदाजी केली तर पाकिस्तान नामोहरम होऊ शकतो. अजून एक महत्त्वाचे पथ्य भारताने पाळायला हवं. ते म्हणजे बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू व्हायचं नाही. पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण अजिबात भरवशाचे नसल्याने आपल्या फलंदाजांचे झेल पकडले जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू टाळले तर फार चिंता करण्याचे कारण नाही. भारताचे क्षेत्ररक्षण रैना, कोहली, राहाणे, जडेजामुळे खूपच उजवे आहे. धोनीच्या रुपात आपल्याकडे डीप फ्रिझरमधला कर्णधार आहे. विचलित झालेल्या खेळाडूंना आणि अवघड परिस्थितीला तो धीराने नियंत्रित करू शकतो. गोलंदाजांनी सर्वस्वपणाला लावून जास्तीत जास्त कौशल्य आणि संयम पणाला लावला तर फलंदाजांचे काम खूप हलके होईल. आपण गेल्या दोन महिन्यांत ऑस्ट्रेलियात साफ अपयशी ठरलो असलो, तरी पाकिस्तानविरुद्ध मी भारताला ६०-७० टक्के संधी देईन. बाकी त्या दिवशी फासे कसे पडतात ते बघायचे. आणि हो हिरोगिरीची लागण आपल्या खेळाडूंना होऊ नये म्हणजे झालं.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
BLOG : पाकिस्तानविरूद्ध विजयाची भारताला ६०-७० टक्के संधी
आत्तापर्यंतच्या विश्वचषकाच्या सर्व पाच लढतीत भारताने पाकला विनासायास हरवले.
First published on: 13-02-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by ravi patki on india pakistan cricket match in world cup