उपान्त्यपूर्व सामन्याचे संघ जवळजवळ ठरले आहेत. प्राथमिक फेरीत भारताने चांगले यश मिळवले. कोणत्याही संघास विश्वचषक जिंकायचा असेल तर उपान्त्यपूर्व सामन्यापासून तीन सामने जिंकायचे आहेत. प्रत्येक सामना म्हणजे एक आव्हान असणार, हे नक्की. कारण कोणताच संघ अगदी बांगलादेशसुद्धा लढतीशिवाय हात टेकणार नाही.
आतापर्यंतच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, भारत-वेस्ट इंडिज, पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका हे खूप अटीतटीचे झाले. या सामन्यात बेतास बात धावसंख्या होती. पण गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सगळय़ाचा कस लागला. बऱ्याच सामन्यांत ३५०, ४०० धावा झाल्या आहेत. पण एक गोष्ट नक्की सांगता येईल, की चांगल्या गोलंदाजीला बक्षीस मिळाले आहे. बॉल बॅटवर छान येतोय. पण चांगल्या लेंथवरून ऑफ स्टम्पच्या आसपास पडलेल्या चेंडूंना विकेट्स मिळालेल्या आहेत. अनेक फलंदाज कॉट बिहाइंड झाले आहेत हा त्याचा पुरावा आहे. तसेच बाऊन्समुळे गोलंदाजाला आधार मिळाला आहे. अनेक फलंदाज हूक करताना किंवा बाऊन्सरचा बचाव करताना सापडले आहेत. त्यामुळे एखादी १००-१५०ची भागीदारी झाली तरी गोलंदाजांनी धीर सोडण्याचे कारण नाही. दोन चेंडू वापरले जात असल्याने चेंडू जुना होत नाही आणि म्हणूनच रिव्हर्स स्विंग बाद झाल्यासारखा दिसतोय. त्यामुळे पायचित आणि बोल्ड फार दिसत नाहीत. यॉर्करचा ओव्हर पीच करून मारतील याची भीती असल्याने फारसे यॉर्कर्सही दिसत नाहीत. स्लोअर वनसाठी खूप हुकमत आणि नियंत्रण लागते. त्यामुळे त्याचा वेगळा सराव केलेले गोलंदाज त्याचा उपयोग करताना दिसतात. उदाहरणार्थ, मलिंगा, जॉन्सन, मोहित शर्मा. त्यामुळे जरी खेळपट्टय़ांवर फटके चांगले मारता येत असले तरी कसदार गोलंदाज असतील तर विकेट्स पडणार. उत्तम गोलंदाजच विश्वचषक जिंकून देणार. फक्त एक मेख आहे. ती म्हणजे बदडेश्वरांची बॅट लागली तर? फींच, वॉर्नर, मॅक्सवेल, वॉटसन, डी व्हिलीअर्स, मिलर, मॅककलम हे बदडेश्वर आहेत. म्हणजे त्यांचा दिवस असला तर त्यांना स्विंग, बाऊन्स, लेंथ वगैरे कशाचाच फरक पडत नाही. त्यांच्या एजेस पण स्टँडमध्ये जातात. २००३ साली पॉन्टिंगने आणि २००७ साली गिलख्रिस्टने घणाघात करून विश्वचषकाचा अंतिम सामन्याचा पार बोऱ्या वाजवला. या वेळेस अशा बदडणाऱ्या फलंदाजांना रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यांची बॅट लागली तर १५-२० षटकांत निकाल लागून जातो. चार वर्षांनंतर येणाऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना अशा व्यायामशाली फलंदाजीने चितपट होऊ नये. व्हिटोरी, अश्विन, हेराथ, शाकीब उल हसन, इम्रान ताहीर, सुलेमान बेन हे गोलंदाज अशा शक्तिमान फलंदाजांना कोणत्या युक्त्या वापरून बाद करतात हा खिळवून ठेवणारा भाग असणार आहे. व्हिटोरी, अश्विन, हेराथ हे स्पीनर्स आपापल्या संघांना पुढे घेऊन जाऊ शकतात. खेळपट्टीवर थोडा टर्न मिळाला तर कितीही तगडी फलंदाजी असली तरी २५० पर्यंत रोखता येऊ शकेल. फक्त एकच प्रार्थना करूया, की बदडेश्वरांचा दिवस एप्रिल महिन्यात कधीही येवो!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
BLOG : बदडणा-यांनी मॅचचा विचका करू नये
फक्त एकच प्रार्थना करूया, की बदडेश्वरांचा दिवस एप्रिल महिन्यात कधीही येवो!
First published on: 13-03-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by ravi patki on quarter finals of cricket world cup