आमच्या संघाचा कर्णधार मायकेल क्लार्कच्या पुनरागमनासाठी संघातील सर्वच खेळाडू उत्सुक आहेत. तो आल्यानंतर एका खेळाडूला जरी विश्रांती घ्यावी लागली तरीही त्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सांगितले.
क्लार्क हा दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या झालेल्या सामन्यात तो सहभागी होऊ शकला नव्हता. क्लार्क हा बांगलादेशविरुद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली १११ धावांनी विजय मिळवला होता. क्लार्क संघात परतल्यास कोणाला वगळायचे याबाबत सध्या येथे चर्चा सुरू आहे. या चर्चेबाबत जॉन्सन म्हणाला, ‘‘क्लार्कसाठी जागा रिकामी करण्यास बेलीदेखील तयार होईल अशी मला खात्री आहे. अर्थात संघाची व्यूहरचना व नियोजन काय आहे हे संघाच्या प्रशिक्षकांनाच अधिक माहीत आहे.’’

Story img Loader