छोटय़ा संघांनी बलाढय़ संघांबरोबर काही सामने खेळल्यास त्यांच्या खेळामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते, असे म्हटले जाते. मात्र भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संयुक्त अरब अमिरातीबरोबर खेळायला वेळच नाही, असे म्हणत कोणताही बहाणा केलेला नाही, तर आपले मत परखडपणे मांडले आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे अमिरातीबरोबर खेळायला वेळच नसल्याचे धोनीने सांगितले.
‘‘भारताविरुद्ध तरी अमिरातीच्या संघाला जास्त सामने खेळता येणार नाहीत. कारण वर्षभराचे वेळापत्रक पाहिले तर साडेनऊ महिने आम्ही क्रिकेट खेळत असतो. आयपीएल अडीच महिने चालू असते. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगही असतेच. त्यामुळे वर्षभरात अमिरातीसारख्या संघांबरोबर खेळायला वेळच मिळू शकत नाही. सरासरी पाहिल्यास दोन दिवसांमध्ये आम्ही एक सामना खेळत असतो. त्यामुळे ही गोष्ट अशक्यप्रायच आहे,’’ असे धोनी म्हणाला.
टीकाकार खेळाडूंच्या दुखापतीबाबत बोलत असले तरी आम्ही किती सामने खेळतो, हे पाहायला ते सोयीस्करपणे विसरतात. याबाबत धोनी म्हणाला की, ‘‘फार खेळाडूंवर टीका होते. त्यापैकी बहुतांश टीका ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत असते. पण आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जावर कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळत असतो. त्याचबरोबर आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगचे सामनेही असतात. त्यामुळे हे सारे पाहता आमचे गोलंदाज हे तंदुरुस्तच आहेत, असे म्हणावे लागेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा