भारतीयांचे क्रिकेटवेड जगप्रसिद्ध आहे. भारतीय लोकांना जाणकार ऑस्ट्रेलियन पहिला प्रश्न विचारतात, ‘‘हाऊ इज क्रिकेट?’’ आणि उत्तर काय देऊ याचा विचार करण्याआधीच ‘‘डू यू प्ले क्रिकेट?’’ असा दुसरा प्रश्न विचारला जातो. स्लीपमध्ये उभ्या बेसावध क्षेत्ररक्षकाकडे अचानक झेल आल्यावर त्याची अवस्था जशी होईल, तशी बहुधा भारतीयाची अवस्था होत असावी. अनेकांचे उत्तर बहुधा ‘ग्रेट’ आणि ‘आय युज्ड टू’ असेच असते. प्रत्येक भारतीय हा क्रिकेट खेळूनच मोठा झाल्याची पाश्चात्य नागरिकांना नुसती माहितीच नाही, पण खात्री आहे. जवळपास प्रत्येक एनआरआयने या प्रश्नाचे उत्तर ऑस्ट्रेलियात कधी ना, कधी तरी दिले असेल हे नक्की.
ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येत एनआरआयचा वाटा सुमारे ३-४ टक्के आहे. स्थलांतराच्या उद्देशाने दर वर्षी हजारोंच्या संख्येने भारतीय ऑस्ट्रेलियाकडे झेप घेतात. अमेरिका किंवा ब्रिटन यांसारख्या देशांऐवजी ऑस्ट्रेलिया अथवा न्यूझीलंडसारख्या देशांकडे हल्ली लोकांचा कल दिसून येतो. परदेशी असलेली चांगली संधी आणि उज्ज्वल भविष्याची हमी त्यांना भारताबाहेर खेचून नेते. सतत वाढती लोकसंख्या, स्पर्धा आणि भ्रष्टाचार याला पर्याय म्हणून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येतात.
एनआरआय म्हणताच का कुणास ठाऊक मध्यमवर्गीय माणसाची छबी कधीच कुणाच्या डोळ्यांसमोर उभी राहात नाही. सूट-बूट, बँकेत भरपूर पसा, दोन-तीन गाडय़ा, बंगले असेच चित्र नेहमी डोळ्यांसमोर उभे राहते. पण हे चित्र कितपत वास्तव आहे, याची फार कमी लोकांना माहिती आहे. ऑस्ट्रेलियात बरेच एनआरआय विद्यार्थ्यांच्या रूपात देशात प्रवेश करतात. यापकी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांतून आलेले असतात. आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या कमाईच्या बळावर त्यांचा राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च चालतो. आपला इतर खर्च चालवण्यासाठी विद्यार्थी सुपरमार्केट, मॉल किंवा छोटय़ा-मोठय़ा कॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी पत्करतात. स्थानिक कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवडय़ातून फक्त २० तास काम करायची परवानगी असल्यामुळे कमाई मर्यादित असते. भारतात मुले कुटुंबासह आई-वडिलांच्या सोबत राहतात. खाण्या-पिण्यासाठी, कपडेलत्ते धुण्यासाठी किंवा घरातल्या कामाकडे फार लक्ष द्यावे लागत नाही. पण ऑस्ट्रेलियात स्वत:ची कामे स्वत: करावी लागतात. दिवसभर विद्यापीठात व्याख्यानाला बसून संध्याकाळी अर्धवेळ नोकरी करून घरी थकून आल्यावर आपल्या जेवणा-खाण्याची सोय स्वत:लाच करावी लागते. एवढेच नव्हे, तर स्वत:चे कपडे स्वत:लाच धुवावे लागतात आणि गरज पडल्यास इस्त्रीदेखील करावी लागते. थोडक्यात सांगायचे तर स्वावलंबनाची उत्तम सवय येथे येताच एनआरआयना तीन ते चार महिन्यांतच लागते.
हॉस्टेलमध्ये विद्यार्थी कामे वाटून घेतात आणि काही वर्षे इथे राहिल्यानंतर त्यांना याची सवय होते. ओळखी वाढत जातात आणि हळूहळू मैत्री वाढत जाते. जे इकडे नोकरीसाठी स्थलांतर करतात त्यांची गोष्ट काही फार निराळी नाही आहे. देश आणि कुटुंबापासून दूर ते मित्रपरिवार किंवा मंडळ यात मन रमवण्यासाठी ते शोधू लागतात. ऑस्ट्रेलियात गेल्या पाच वर्षांत बरीच भारतीय मंडळी स्थलांतरित झाली आहेत आणि बरीचशी मराठी माणसे येताना दिसत आहेत. सिंगापूरमधल्या ‘लिटील इंडिया’प्रमाणे सिडनीच्या पश्चिमेकडे हॉरिस पार्क, वेस्टमीड, पॅरामॅटा या नगरांमध्ये भारतीयांचे वर्चस्व दिसून येते.
भारतीय साधनसामग्री, खाऊगल्ल्या (भारतासारख्या रस्त्यावर नव्हे तर दुकानांत), पानाचे दुकान (पान खाऊन थुंकणे गुन्हा आहे) या सगळ्या गोष्टी येथे उपलब्ध आहेत. मराठी मंडळ, मराठी रेडिओ, गणेशोत्सव, होळी किंवा दिवाळी हे सगळे सिडनीमध्ये अनुभवायला मिळते. ऑस्ट्रेलियातील सिनेमाघरांत बॉलीवूड चित्रपटदेखील प्रदíशत होतात. इतकेच काय तर पुण्यातील चितळे बंधूंचा चिवडा आणि अळूवडीदेखील सिडनीमध्ये उपलब्ध आहे.
आपले एनआरआय या सगळ्याचा पुरेपूर आनंद लुटताना दिसतात. बॉलीवूड चित्रपट, बॉलीवूडची गाणी, रेस्टॉरंटमध्ये मेजवानी, वीकेंडला मित्रांच्या घरी जाणे असो वा िहदी चित्रपट पाहणे किंवा क्रिकेटसारखे अनेक कार्यक्रम इथले एनआरआय करतात. पण बॉलीवूडशिवाय आणखी एक महत्त्वाचा धागा सर्व परदेशी एनआरआय मंडळींना एकत्र ठेवतो आणि तो म्हणजे फक्क आणि फक्त क्रिकेट!
ऑस्ट्रेलियातून.. : : एनआरआयना एकत्र ठेवणारा धागा क्रिकेटचा!
भारतीयांचे क्रिकेटवेड जगप्रसिद्ध आहे. भारतीय लोकांना जाणकार ऑस्ट्रेलियन पहिला प्रश्न विचारतात, ‘‘हाऊ इज क्रिकेट?’’
First published on: 03-03-2015 at 05:00 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket the game of love unity