‘‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान! लग्ना अजुनी लहान, अवघे पाऊणशे वयमान!’’ या पंक्ती गेल्या जमान्यातील ‘शारदा’ या गाजलेल्या संगीत नाटकातल्या. आता जमाना बदललाय आणि पाऊणशे वयमानाच्या दिशेनं पावलं टाकणारे नवरदेव प्रतीक्षेत होते, ‘शुभमंगल, सावधान’च्या घोषणेसाठी. देशाच्या कानाकोपऱ्यातून वाजंत्रीवाले, बँडवाले, मिठाईवाले गोळा केले गेले होते. नवरदेवाच्या शर्यतीतील सर्व उमेदवारांनी, या वाजंत्रीवाल्यांचा, बँडवाल्यांचा, मिठाईवाल्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित केलेलं होतं. केवळ त्यांनाच काय,पण त्यांच्या यापुढच्या सात पिढय़ांना काही कमी पडणार नाही, याची दक्षता घेतलेली होती.
या शर्यतीतील दोन मातब्बर उमेदवार बाजूला झाले आणि तेच बनले नवरदेवाचे आई-बाबा. तेच बनले पुरोहित. दोघेही आपापल्या परीने समाधानी, दुसऱ्याचा पत्ता काटला, हीच दोघांची खुशी. आपला पत्ता कापला गेला, याची नाखुशी जबरदस्त. पण दिलासा देत होती, दुसऱ्याचा पत्ता काटल्याची आणि दोघांनी मिळून शोधला नवरदेव. त्याचं नाव जगमोहन दालमिया. काही मंडळी त्यांना ‘डॉलरमिया’ म्हणून संबोधतात.
सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छितो, की जगमोहनजींचे वय अवघे पाऊणशे नाही. तसेच यंदा ३० मे रोजी, म्हणजे विश्वचषक संपल्यावर दोन महिन्यांनीही ते वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत नाहीएत. विकीपेडिया व इतर वेबसाइट्सवर त्यांचा जन्मदिन ३० मे, १९४० असा दिलेला असला, तरी तो चुकीचा आहे. दालमियांची कन्या वैशालीनेच, त्या चुकीची दुरुस्ती, प्रसार माध्यमांकडे केली आहे. दालमिया भूतलावर अवतरले ते १९४०च्या सप्टेंबरमध्ये. तेव्हा या लग्न समारंभास सहा-साडेसहा महिने होऊन गेले असतील.
शपथपत्राची मागणी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी, ११ वर्षांच्या वनवासानंतर दालमिया विराजमान झाले आहेत. निवडणूक मोहिमेत त्यांचे, तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार यांचे ७४ वय नेहमी घोळले जायचे. ‘‘पण वय हा आहे निव्वळ आकडा, माझ्या बाबांना व्यसन जडलंय. दिवसरात्र काम करत राहाण्याचे,’’ त्यांची सुकन्या सांगते, पण त्यांना बोहल्यावर चढवणारे आणि सर्वोच्च न्यायालयामुळे या शर्यतीबाहेर फेकले गेलेले श्रीनिवासन् यांनी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर दडपण आणलं ते त्यांच्या वयाचं स्मरण त्यांना करून देतच!
दालमियांना पाठिंबा देण्याआधी, श्रीनिवासन् यांनी त्यांना एक विलक्षण अट घातली. त्यांच्याकडून एका शपथपत्राची मागणी केली होती. दालमियांची तब्येत ठीक नसल्यामुळे बिस्वरूप डे यांची कार्यकारी साहाय्यक म्हणून दालमियांनी नेमणूक केली आहे, असं ते शपथपत्र. दालमियांनी त्यावर सही करून आपल्या हवाली करावं,
कोण हे बिस्वरूप डे? ते आहेत दालमियांच्या बंगाल क्रिकेट संघटनेतील कोषाध्यक्ष. दालमियांच्या विश्वासातले व मर्जीतले. गेली १०-१५ वर्षे त्यांनी दालमियांना साथ दिलेली आहे. पण उतारवयातील दालमियांना अधिकारपद लाभलं तरी लक्षणं सूर्यास्ताची. या हिशोबानं बिस्वरूप डे जमवून घेऊ लागले होते श्रीनिंशी. थोडक्यात त्यांना फोडण्यात श्रीनी यशस्वी झाल्याचं दालमियांना बजावत होते श्रीनि! आपल्या वयाचा मुद्दा श्रीनि उगाळत आहेत, ही बाब दालमियांना झोंबली. त्यांनी ती मागणी, ती अट फेटाळून लावली. श्रीनिवासन्ला मुकाटय़ाने दालमियांना पाठिंबा जाहीर करावा लागला.
अरुण जेटली नडले
श्रीनिवासन्विरोधी मोहीम उघडणाऱ्या शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीभेटीचे निमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारल्यानंतर, पुन्हा दिल्लीत जाऊन साकडे घातले. भाजपकडे दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरयाणा या किमान पाच राज्यांची मते. त्याखेरीज केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सेनादल, रेल्वे व भारतीय विद्यापीठ संघटना अशी आणखी तीन मते. पवारांना पाठिंबा मुंबई, महाराष्ट्र, सौराष्ट्र, विदर्भ, मध्यप्रदेश (व गोवा?) अशा ५-६ राज्यांचा. त्यांची आघाडी झाल्यास उत्तर प्रदेशचे काँग्रेस पुढारी राजीव शुक्ला व आंध्रचे भाजप खासदार गंगा रेड्डी असं ३०-३१ पैकी १६ जणांचं मताधिक्य. पण हा प्रस्ताव हाणून पाडला दिल्लीचे अध्यक्ष अरुण जेटली यांनी. एवढंच नव्हे तर दिल्लीतील सी. के. खन्ना यांना मध्य विभागातून व गंगा रेड्डींना आंध्रमधून उपाध्यक्षपदासाठी उभं केलं ते श्रीनिंच्या पॅनलमधून. अरुण जेटली पवारविरोधी, तसेच अमित शहाही पवारविरोधी, अमित शहांनी मुत्सद्दीपणे प्यादी हलवली- दक्षिणेतील पाचही राज्ये श्रीनिंकडे व पूर्वेतील सहा मते दालमियांची याची जाण ठेवली.
अध्यक्षपदासाठी भाजपचे अनुराग ठाकूर आघाडी उघडू लागले. तेव्हा शरद पवारांनी अमित शहांशी संपर्क साधला व ठाकुरांना माघार घ्यायला लावली. अमित शहांचे हिशोब असे : आजमितीस क्रिकेट मंडळ नाना वादात ओढलेले आहे. ते गुंते सोडवण्यास ठाकूर असमर्थ ठरतील. म्हणून अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट डोक्यावर चढवून घेण्याची घाई युवा नेते ठाकूर यांनी करू नये. शिवाय हिमाचल प्रदेशातही अनुराग ठाकूर यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत, त्यातून त्यांनी आधी बाहेर यावं!
शहांनी तडजोड घडवून आणली. अनुराग ठाकूर यांना कसंबसं सचिवपदी निवडून आणण्यात ते यशस्वी झाले. अध्यक्षांसह आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या बैठकांना पाठवलं जावं, ही ठाकुरांची अट. त्यासाठी शशांक मनोहरांना पाठवावं, हा पवारांचा रास्त आग्रह. पडद्यामागच्या शंभर चालींपैकी या काही हालचाली.
सरतेशेवटी मुद्दा पाऊणशे वयोमानाचा. राष्ट्रीय संघटनांत पदाधिकाऱ्यांसाठी सत्तरीची मर्यादा भाजपचे क्रीडा मंत्रालय घालते. पण अरुण जेटली, अमित शहा, अनुराग ठाकूर, गंगा रेड्डी हे भाजप नेते त्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत!
वि. वि. करमरकर