डॅनियल व्हेटोरीच्या फिरकीने रविवारी कमाल केली. त्यामुळे न्यूझीलंडला ‘अ’ गटात सलग पाचव्या विजयाची नोंद करता आली. अफगाणिस्तानचे १८७ धावांचे तुटपुंजे आव्हान न्यूझीलंडने सहा विकेट आणि १३.५ षटके राखून सहजपणे पेलले. सलामीवीर मार्टिन गप्तीलने सर्वाधिक ५७ धावा काढल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या अफगाणिस्तानची ६ बाद ५९ अशी अवस्था झाली. wc06डावखुरा फिरकी गोलंदाज व्हेटोरीने आपल्या जादूई फिरकीच्या बळावर अफगाणिस्तानच्या मधल्या फळीला जेरबंद केले. व्हेटोरीने १८ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळींचे त्रिशतक साजरे केले. परंतु नजीबुल्ला झाद्रान (५६) आणि समिउल्लाह शेनवारी (५४) यांनी जिद्दीने खेळत अफगाणिस्तानला १८६ धावा उभारून दिल्या.
त्यानंतर कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने पुन्हा आपल्या झंझावाती अदाकारीचे प्रदर्शन करताना १८ चेंडूंत चार षटकार आणि एक चौकारासह ४२ धावा केल्या. ब्रेंडन माघारी परतल्यावर किवी संघाचा धावांचा वेग मंदावला. परंतु अफगाणी प्रतिकाराचा धर्याने सामना करीत न्यूझीलंडने संयमाने विजय साकारला. केन विल्यमसन (३३) आणि गप्तील यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : ४७.४ षटकांत सर्व बाद १८६ (नजिबुल्ला झाद्रान ५६, समिउल्लाह शेनवारी ५४; डॅनियल व्हेटोरी ४/१८, ट्रेंट बोल्ट ३/३४) पराभूत वि. न्यूझीलंड : ३६.१ षटकांत ४ बाद १८८ (मार्टिन गप्तील ५७, ब्रेंडन मॅक्क्युलम ४२; मोहम्मद नबी १/३९, शापूर झाद्रान १/४५)
सामनावीर : डॅनियल व्हेटोरी.

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ३७२ धावा
२. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ३१८ धावा
३. हशिम अमला, ब्रेंडन टेलर २९५ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट व टिम साऊदी (न्यूझीलंड) १३ बळी
२. मिचेल स्टार्क, डॅनियल व्हेटोरी १२ बळी
३. मॉर्ने मॉर्केल, जोश डॅव्हे, जेरॉम टेलर, वहाब रियाझ ११ बळी