कोणत्याही गोष्टीमध्ये नावीन्यता आणि सर्जकता आल्याशिवाय त्यापुढे जाता येत नाही. भारतीय संघाने दोन विजय मिळवले असले तरी त्यांचे ध्येय फार मोठे आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी नव्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा सराव केला. एका खेळाडूकडून झेल सुटल्यावर दुसऱ्या खेळाडूने तो कसा झेलावा, अशा ‘डमी’ झेलचा सराव त्यांनी बुधवारी केला.
भारताचे साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी चार खेळाडूंचे गट बनवले होते. या चारही खेळाडूंना एका रांगेमध्ये त्यांनी उभे केले होते. त्यामधल्या पहिल्या खेळाडूला जाणीवपूर्वक झेल सोडायला लावायचा आणि अन्य खेळाडूंनी तो झेलायचा, असा अनोखा सराव भारतीय क्रिकेटपटूंनी केला. अचानकपणे वेगाने झेल आल्यावर भंबेरी उडते आणि झेल सुटू शकतो, त्या वेळी त्याच्या बाजूच्या खेळाडूने सतर्क राहावे, यासाठी हा खास सराव करण्यात आला.