पंखांना क्षितिज नसतं, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारं आकाश असतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग्रँट एलियट. ग्रँटचं सारं आयुष्य विश्वचषक खेळण्याच्या महत्त्वाकांक्षेनं व्यापलेलं. कठीण परिस्थितीत हिमतीने मैदानावर उभे राहून आपल्या न्यूझीलंड संघाला जिंकून देण्याची ईर्षां ही त्यामुळेच निर्माण झाली.
२३ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. योगायोगानं विश्वचषकाचं यजमानपद तेव्हा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडेच होतं. दक्षिण आफ्रिकेवरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बंदी उठली होती. त्यांचा विश्वचषकातील पहिला सामना २६ फेब्रुवारी १९९२ या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. रंगीत कपडे, प्रकाशझोतातील सामने या साऱ्यांसोबत त्याचा दक्षिण आफ्रिकेचा संघ नवखा होता. हा सामना पाहण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे जोहान्सबर्गमधील १२ वर्षांच्या ग्रँटनं शाळेला दांडी मारली. यासाठी त्यानं आपल्या आईची परवानगीसुद्धा घेतली. टीव्हीवर त्यानं या सामन्याचा यथेच्छ आनंद लुटला. कर्णधार केपलर वेसल्सच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. वेसल्सचं क्रिकेटरसिक जल्लोषात स्वागत करीत होते. त्याच्या यशानं प्रभावित झालेल्या ग्रँटचे डोळे दिपून गेले होते आणि क्षणार्धात भीष्मप्रतिज्ञा केल्याच्या आविर्भावात तो ओरडला, ‘‘मला विश्वचषक खेळायचा आहे. मला जगज्जेता व्हायचंय. साऱ्या जगानं म्हटलं पाहिजे हाच तो ग्रँट!’’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न ग्रँटच्या मनावर बालपणीच कोरलं गेलं. परंतु प्रत्यक्षात भलतंच घडलं. ग्रँट दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळेत गेला, तेव्हा मुख्याध्यापकांनी त्याला त्वरित बोलावून घेतलं. ‘‘तुला शाळेतून आणि शाळेच्या क्रिकेट संघातून आठवडय़ाभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे,’’ असं जेव्हा त्याला सांगण्यात आलं तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले. त्याला दरदरून घाम फुटला. ग्रँटच्या सुटीबाबत त्याची आई शाळेला कळवायलाच विसरली होती, म्हणूनच ही परिस्थिती ओढवली होती. परंतु त्या घटनेने त्याच्या मनावर कायमचा ठसा उमटवला होता. शाळेत एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून उदयास आल्यानंतर जोहान्सबर्गच्याच सेंट स्टिथियन्स महाविद्यालयात त्यानं पुढील शिक्षण घेतलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याच्या याच जिद्दीमुळे ग्रँटनं २००१मध्ये दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. २००८मध्ये ग्रँटनं कसोटी पदार्पण केलं, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे त्याचा विशेष ओढा होता. मागील विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये ग्रँटचं नाव होतं. परंतु जेम्स फ्रँकलिन आणि जेकब ओरम हे अष्टपैलू खेळाडू स्पध्रेत होते. त्यामुळे ग्रँटला आश्चर्यकारकरीत्या डावलण्यात आलं होतं. विश्वचषकाचं स्वप्न मात्र त्याला स्वस्थ बसून देत नव्हतं. यंदासुद्धा कोरे अँडरसनसोबत अष्टपैलू खेळाडू म्हणून जिमी नीशामची वर्णी लागण्याची चिन्हे होती. ग्रँटच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले. त्यामुळे खात्यावर जमा होता फक्त ५ कसोटी आणि ६०च्या आसपास एकदिवसीय सामन्यांचा अनुभव. वयाची पस्तीशीसुद्धा ओलांडल्यामुळे क्रिकेट कारकीर्द अस्ताकडेच वाटचाल करू लागली होती. आता विश्वचषक खेळण्याचं स्वप्न बहुधा अधुरंच राहणार, अशी त्याची धारणा झाली होती. परंतु न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांना पहिल्या पाच फलंदाजांपैकी एकाकडून कामचलाऊ गोलंदाजीचीही अपेक्षा होती. स्थानिक क्रिकेटमध्ये फॉर्मात असलेल्या आणि ऑस्ट्रेलियातील वातावरणाचा अनुभव असलेल्या ग्रँटला प्राधान्य देण्यात आलं. आपली निवड योग्य होती, याची खात्री मंगळवारी हेसन यांना पटली. ग्रँटच्या झुंजार खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ आता प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचं विश्वचषकाचं स्वप्न तो जगतो आहे आणि आता जगज्जेतेपद त्याला साद घालत आहे.
क्रिकेट नसानसांत फक्त भिनलेल्या ग्रँटनं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न उद्ध्वस्त केलं, डेल स्टेनला मारलेल्या षटकारानं आता इतिहासात आपलं स्थान निर्माण केलं आहे. यासाठी त्यानं वापरलेलं महत्त्वाचं अस्त्र म्हणजे ‘बझ क्रिकेट बॅट’, ही त्यानं स्वत:च तयार केलेली. न्यूझीलंडशी नातं सांगणाऱ्या या खास बॅटच्या निर्मितीसाठी त्यानं दोन व्यावसायिक क्रिकेटपटूंना सोबतीला घेऊन २००८ मध्ये एक कंपनी स्थापन केली. सध्या मायकेल पॅप्स, ल्यूक वूडकॉक, माइक रिंडेल, मार्क हटन, लेटन मॉर्गन यांसारखे अनेक क्रिकेटपटू ही बॅट वापरतात. ग्रँट या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातील काही वाटा समाजासाठी द्यायला अजिबात विसरत नाही. तूर्तास, विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने भरारी घेणाऱ्या किवी पंखांना ग्रँटनं एक भक्कम बळ दिलं आहे.
पंखांना क्षितिज नसतं..
पंखांना क्षितिज नसतं, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारं आकाश असतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग्रँट एलियट. ग्रँटचं सारं आयुष्य विश्वचषक खेळण्याच्या महत्त्वाकांक्षेनं व्यापलेलं. कठीण परिस्थितीत हिमतीने मैदानावर उभे राहून आपल्या न्यूझीलंड संघाला जिंकून देण्याची ईर्षां ही त्यामुळेच निर्माण झाली.२३ वर्षांपूर्वीची …
First published on: 26-03-2015 at 07:05 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grant elliott a new zealand cricketer0