राष्ट्रीय क्रिकेट मंडळाशी करारबद्ध असलेल्या कंपन्यांचे लोगो गणवेशावर धारण करणे प्रत्येक खेळाडूला क्रमप्राप्त असते. परंतु ‘कॅसल’ या मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीचा लोगो न वापरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अमलाने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाला केल्यामुळे समस्त क्रिकेटजगताचं त्यानं लक्ष वेधलं. मद्य हे इस्लाम धर्मात वज्र्य आहे, असं कारण त्यानं त्यात स्पष्टपणे मांडलं होतं. स्वत:च्या धर्मातील तत्त्वांचं भान राखणाऱ्या अमलापुढे क्रिकेट मंडळ आणि पुरस्कर्त्यांनीही नमते घेतले. ‘कॅसल’चा लोगो न वापरण्यासाठी त्याला खास परवानगी देण्यात आली. ज्या कारणास्तव आपण या कंपनीचा लोगो नाकारला, त्यांचे मानधन तरी का स्वीकारावे, या उद्देशाने तो त्यांच्याकडून मिळणारा कोणताच पैसा घेत नाही. इतकंच नव्हे, तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या नियमानुसार तो प्रायोजक कंपन्यांचा लोगो न वापरल्याबद्दल प्रत्येक महिन्याला पाचशे डॉलर्सचा दंड भरणं पसंत करतो.
हशिम अमलानं २००४ मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला. त्याचे वंशज गुजरातचे. परंतु हशिमचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेतला आणि तिथेच तो वाढला. परंतु इस्लामी परंपरा अमला कुटुंबीयांनी काटेकोरपणे जपल्या. त्यामुळेच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपल्या कर्तृत्वाचे झेंडे फडकावत ठेवणारा हा क्रिकेटपटू पैसा आणि झगमगणाऱ्या शानशौकतसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या व्यासपीठापासून दूर राहिला. आयपीएलमध्ये अनेक मद्यनिर्मिती करणाऱ्या किंवा तत्सम कंपन्यांचा पैसा आहे, तसेच अनेक संघांना प्रायोजकत्वही या कंपन्यांचे लाभले आहे. त्यामुळे आयपीएलचा आठवा हंगाम आता महिन्याभराच्या अंतरावर आला असला तरी अमला या आकाशात तळपताना दिसत नाही. यंदाच्या हंगामात खरे तर लिलावकर्त्यां खेळाडूंच्या यादीत अमलाचं नाव होतं, परंतु पुरस्कर्त्यांचा रोष कोण पत्करणार, या दडपणापायी कोणत्याही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली लावण्यात रस दाखवला नाही.
फुटबॉलमध्ये रूढ झालेली ‘व्ॉग्ज’ संस्कृती आता क्रिकेटमध्येसुद्धा लक्ष वेधू लागली आहे. सध्याच्या अनेक नावाजलेल्या क्रिकेटपटूंच्या मैत्रिणी आणि बायका या नित्य चर्चेत असतात. त्यांचं प्रेम, त्यांचे विवाह हे सारे फिल्मी असतात. परंतु अमलाच्या बाबतीत असं काहीच नाही. कौटुंबिक रिवाजानुसार अमलानं सुमय्या हिच्याशी ठरवून ‘निकाह’ केला. त्यानंतर देशांतर्गत किंवा परदेशातील स्पर्धा असो किंवा मालिका सुमय्या बऱ्याचदा स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंच्या ‘व्ॉग्ज’ मंडळींमध्ये लक्ष वेधते, कारण धर्माचं आचरण करणारी सुमय्या बुरखा घालूनच सर्वत्र वावरत असते.
२०१३च्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेचा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळला होता. या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी आफ्रिकेने गमावली. २०११पासून सलग १५ कसोटी सामने अपराजित राखणारा हा संघ हरला होता. त्या सामन्यात अमलानं झुंजार शतक झळकावलं होतं. त्यानंतर मालिका वाचवण्यासाठी दुसरी कसोटी जिंकण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु बायकोच्या गर्भधारणेची तारीख त्यादरम्यान येत असल्यामुळे अमला परवानगी घेऊन मायदेशी परतला. सुदैवानं दुसरी कसोटी जिंकत आफ्रिकेनं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अन्यथा कौटुंबिक कारणास्तव घरी परतणारा अमला खलनायक ठरला असता.
७ ऑगस्ट २००६ या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्याचं समालोचन करणाऱ्या डीन जोन्स यांनी ‘टेन स्पोर्ट्स’वर अमलाला ‘दहशतवादी’ संबोधल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. प्रक्षेपणकर्त्यां कंपनीची व्यावसायिक जाहिरात चालू आहे, असा समज होऊन जोन्स यांनी ‘दहशतवाद्याला आणखी एक बळी मिळाला’ असं भाष्य केलं होतं आणि ते दक्षिण आफ्रिकेसहित जगभरात प्रसारित झालं. त्यानंतर माजी क्रिकेटपटू, समालोचक, क्रिकेटचाहते यांनी जोन्स यांच्यावर कडाडून टीका केली. त्या वाहिनीनं जोन्स यांच्याशी असलेला करारसुद्धा मोडीत काढला. या प्रकरणानंतर जोन्स यांनी अमलाची वैयक्तिक भेट घेऊन माफी मागितली. अमलानंसुद्धा मोठय़ा अंत:करणानं या माजी क्रिकेटपटूला माफ केलं, कारण त्याचं आकाशच वेगळं होतं!
प्रशांत केणी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा