सौदेबाजी व सट्टेबाज यांचं सावट विश्वचषकावर अजिबात पडत नाहीए, सारं कसं सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ अन् गंगाजलासारखं निर्मळ, असा भास निर्माण करू पाहात आहे आयसीसी. बांगलादेशचा अल अमीन हुसेनला घरी परत धाडलं, ते केवळ संचारबंदीचा भंग केल्याच्या बेशिस्तीबद्दल अन् सौदेबाज, सट्टेबाज यांच्याशी त्यानं संपर्क साधला असल्यास, ते आम्ही ना पाहिलं, ना ऐकलं, अशी सारवासारव करू पाहात आहे. याचप्रमाणे बेशिस्त खेळाडूच्या बदली खेळाडू देण्याचा घातक पायंडा पाडत आहे. या पाश्र्वभूमीवर उठून व खुलून दिसतं, ते कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचं प्रांजळ आत्मकथन.
ही गोष्ट १९९७ची. सट्टेबाजी हे ऑस्ट्रेलियात कायदेशीर मानलं जातं. एक उद्योग व व्यवसाय म्हणून त्याच्याकडे समाज बघतो. त्या सुमारास ऑस्ट्रेलियन क्रीडा क्षेत्रात, घोडय़ांच्या शर्यतीवरील उघडउघड जुगारापलीकडील व्यापक क्रीडा क्षेत्रात सट्टेबाजी हातपाय पसरू लागलं होतं. अशा वेळी एका सट्टेबाजानं पॉन्टिंगकडे विचारणा केली.
एक एकदिवसीय सामना संपवून, पॉन्टिंग सिडनीतील वेंटवर्क पार्कमधील ग्रेहाउंडस्वर गेला होता. तेव्हा विदेशी-सट्टेबाजी संस्थेशी संबंधित असलेल्या एकाने पॉन्टिंगपुढे प्रस्ताव ठेवला- ‘‘मित्रा! सामन्याच्या आदल्या दिवशी, सकाळी-दुपारी-सायंकाळी केव्हा तरी, ऑस्ट्रेलियन संघात कोणते ११ खेळाडू असतील, तेवढं मला कळवशील का? बघ! तू सहकार्य दिलंस, तर बँकेतील तुझ्या खात्यात काही डॉलर्सचा भरणा आम्ही करू. बँकेत तुझं खातं उघडण्याची व्यवस्थाही आम्ही करू!’’
पॉन्टिंगला हा प्रस्ताव सर्वस्वी अनपेक्षित होता. क्षणभर काय बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं.
ना होकार, ना नकार! हा प्रस्ताव मांडणाऱ्या सट्टेबाजाला, पॉन्टिंग फारसा ओळखत नसावा. तो सट्टेबाजा व त्याच्या आसपासचे त्याचे सवंगडी, हे एका विदेशी हे सट्टेबाजी संस्थेशी संबंधित होते. तो सट्टेबाज क्रिकेटवेडा दिसत होता. त्यानं हा प्रस्ताव मांडला आणि पॉन्टिंगच्या डोक्यातील ‘टय़ूब’ पेटू लागली. काहीशा अस्वस्थ अवस्थेत त्याच्या तोंडून शब्द निघून गेले: ‘‘घोडय़ांच्या शर्यतीप्रमाणे क्रिकेटवरही तुमची सट्टेबाजी चालते काय?’’
पॉन्टिंगला त्यानं उत्तर दिलं, ‘‘दोस्ता! आम्ही वाट्टेल त्यावर पैजा लावतो, सट्टेबाजी करतो!’’
त्या वेळी २२ वर्षांच्या पॉन्टिंगला बरेचसे छक्केपंजे कळत नव्हते. एका बाजूस बिनकष्टाच्या, घाम न गाळता, अक्कलन वापरता मिळू शकणाऱ्या पैशाचा मोह; पण दुसऱ्या बाजूनं सदसद्विवेकबुद्धीची टोचणी. त्याच्या तोंडून ना होकार निघेना, ना नकार! तो म्हणाला, ‘‘मला विचार करायला वेळ दे. आय विल थिंक अबाउट इट.’’
परंतु पॉन्टिंगने सुज्ञपणा दाखवला. आपले व्यावसायिक व्यवस्थापक आणि सच्च्या मित्राप्रमाणे आपले हितसंबंध जपणारे सॅम हॅलवरसेन यांच्या कानी त्याने हे सारं घातलं. हॅलवरसेन यांनी शांतपणे त्याचं सारं सांगणं ऐकून घेतलं. मग एकच प्रश्न केला, ‘‘त्याला तू काही आश्वासन तर दिलं नाहीस ना?’’ पॉन्टिंगचं उत्तरही त्याच्या प्रामाणिकपणाला साजेसे, ‘‘नाही, पण मी त्याचा प्रस्ताव फेटाळून टाकला नाहीए.’’ मग हॅलवरसेन यांनी कडक भाषेत त्याला सुनावलं, ‘‘रिकी, माझे ऐक. त्याच्याशी संबंध तोडून टाक. त्याचा फोन आला, तर काही न बोलता फोन बंद कर!’’
प्राथमिक पाऊल
पॉन्टिंग मागे वळून बघताना म्हणतो, ‘‘आम्ही किती भाबडे होतो! वरपांगी या प्रस्तावात काही काळंबेरं दिसत नव्हतं; पण कोवळ्या खेळाडूंना जाळ्यात ओढण्याचं ते प्राथमिक पाऊल होतं, हे हॅलवरसेन यांच्या मुरब्बी नजरेनं जाणलं होतं. हे सट्टेबाज शार्क माशांसारखे! पहिलेवहिले तुमच्यापुढे ठेवतील कॉफीचा कप किंवा बीयरचा ग्लास, मग तुमच्या दारू पार्टीचं बिल ते भरतील. मग हॉटेल बिल, फोन बिल, मिनी बारचं बिल तेच चुकवतील. तुमची, तुमच्या खेळाची खुशामत करत राहतील, हॉटेल बारमध्ये तुम्हाला देखण्या मैत्रिणींची संगत मिळवून देतील. टप्प्याटप्प्याने तुम्हाला घट्ट पकडीत अडकवतील. मग तुमच्याकडून अधिकाधिक, आतल्या गोटातील माहिती मिळवतील. तुमचा पाय अधिकाधिक खोलात अडकत जाईल.
हॅलवरसेन यांची सूचना, पॉन्टिंगने पाळली. त्या बोलबच्चन सट्टेबाजाचा फोन आल्यावर स्पष्ट शब्दांत सांगितलं, ‘‘मला पुन्हा फोन करण्याच्या फंदात पडू नका!’’
रिकीच्या या वागण्याला पाश्र्वभूमी होती शेन वॉर्न अन् मार्क वॉ यांनी सट्टेबाजांना दिलेल्या प्रतिसादाची. खेळपट्टी व संघनिवड यांची माहिती पुरवण्यात कोणताही गौप्यस्फोट होत नसतो, असा त्यांचा बचाव होता. ऑस्ट्रेलियन मंडळाला ते समजल्यावर, त्या दोघांना दंड ठोठावला गेला होता. १९९५पासून ऑस्ट्रेलियन गोटात तो विषय चर्चिला जायचा. काही अभ्यासू क्रीडा शोधपत्रकारितेतून त्याचा गौप्यस्फोट झाला १९८८-८९ च्या अ‍ॅशेस मालिकेत, ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका जिंकत असताना! आणि अ‍ॅडलेड कसोटीत मार्क वॉला प्रेक्षकांच्य हुर्योला, धिक्काराला सामोरं जावं लागलं.
अधिकृत दखल
मार्क वॉ-शेन वॉर्न यांची सौदेबाजी काही वर्षे दडपून ठेवणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंडळाला पत्रकारांनी वठणीवर आणलं. मग एकेक खेळाडूची त्यांनी स्वतंत्र साक्ष घेतली. ‘‘सट्टेबाजांनी संपर्क साधला होता का?’’ या प्रश्नास पॉन्टिंगनंपण प्रामाणिकपणे होकारार्थी उत्तर दिलं. मग त्याला विचारलं गेलं, ‘‘याआधी ती गोष्ट आमच्या कानी का नाही घातलीस?’’ पॉन्टिंग म्हणाला की, कोणताही सौदा झालेला नव्हता. म्हणून तेव्हा ती गोष्ट तुम्हाला कळवण्याजोगी वाटली नव्हती. मग मंडळाने जाहीर केलं, सौदेबाजी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी रॉव ओ’रीगन यांची समिती नेमत आहोत. त्यांनीही पॉन्टिंगची साक्ष नोंदवली आणि त्याला निर्दोष ठरवलं.
आयसीसीने हुसेन प्रकरण कसं हाताळलं आणि पॉन्टिंगनं कसं हाताळलं, यातील तफावत जमीन-अस्मानाएवढी. अशा वेळी मनात पाल चुकचुकते. गेल्या ३०-४० वर्षांत, पाकिस्तानी, दक्षिण आफ्रिकन, बांगलादेशी, वेस्ट इंडियन, श्रीलंकन, केनियन खेळाडूंशी संपर्क साधणाऱ्या सट्टेबाजांनी किती भारतीय खेळाडूंशी संपर्क साधला असेल? त्यापैकी किती जणांनी पॉन्टिंगप्रमाणे प्रांजळ आत्मकथन केलंय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा