‘ट्विटर’च्या माध्यमातून भारतीय संघाच्या जर्सीसोबतच्या छायाचित्राने रॉजर फेडररला चांगलेच अडचणीत टाकले आहे. भारतीय संघाच्या जर्सीबरोबरच्या त्याच्या छायाचित्राने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानातील त्याचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा प्रयत्न नव्हता, असे स्पष्ट करत फेडररने सभ्य गृहस्थाची प्रतिमा जपली आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या जर्सीसोबतचे छायाचित्र फेडररने ‘ट्विटर’वर अपलोड केला. फेडरर आणि भारतीय संघ यांचे प्रायोजक सामाईक आहेत. नाईके कंपनीच्या प्रसारासाठी भारतीय संघाची जर्सी आपलीशी करणे फेडररसाठी त्रासदायक ठरले आहे.
‘‘प्रायोजकांसाठी भारतीय संघाची जर्सी न्याहाळत होतो. भारताच्या काही क्रिकेटपटूंनी मी भेटलो आहे. काही महिन्यांपूर्वी मी भारतात जाऊनही आलो. या कारणामुळेच नाईके कंपनीने मला ती जर्सी भेट दिली. पण मी दक्षिण आफ्रिकेचा समर्थक आहे आणि हे सर्वश्रुत आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. मात्र कोणी नाराज झाले असेल तर मला माफ करा,’’ अशा शब्दांत फेडररने आपली भूमिका मांडली.
फेडररची आई दक्षिण आफ्रिकेची आहे. रॉजर फेडरर फाऊंडेशनच्या माध्यमातून फेडरर दक्षिण आफ्रिकेतील उपेक्षित लोकांसाठी लक्षावधी रुपयांचे देणगी देतो.
‘‘भारतीय संघाच्या जर्सीसोबतच्या छायाचित्राने पाकिस्तानमधील फेडरर चाहते नाराज झाले आहेत. टेनिसच्या निमित्ताने ज्या भागात असतो त्यानुसार क्रिकेट पाहतो,’’ असे फेडररने सांगितले.

Story img Loader