‘‘विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर प्रेयसीच्या दिशेने ‘फ्लाइंग किस’ पाठवल्यास माझी कोणतीही हरकत नसेल. परंतु खेळाडू शून्यावर बाद झाला आणि ‘फ्लाइंग किस’ करीत असेल तर माझा आक्षेप असेल. माझा क्रिकेट खेळण्याचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. परंतु आपल्याला त्याचा स्वीकार करायला हवा,’’ असे मत भारताचा माजी कर्णधार कपिल देवने व्यक्त केले. भारताला विश्वचषक जिंकण्याची २५ टक्के संधी असल्याचे कपिलने या वेळी नमूद केले.
‘‘भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल. उपांत्य फेरीतील चारही संघांना विश्वविजेतेपदाची २५ टक्के संधी असते. त्यानंतर मात्र अंदाज वर्तवणे कठीण आहे. सुरुवात अतिशय महत्त्वाची असते, यावर माझा विश्वास आहे. सामन्यातील पहिल्या १५ षटकांतच भारताची कामगिरी ठरेल. ही षटके आपल्यासाठी चांगली गेल्या भारताला २७०हून अधिक धावसंख्या उभारता येऊ शकेल. परंतु १५ षटकांतच २-३ फलंदाज बाद झाल्यास मात्र भारताची अवस्था बिकट होईल,’’ असे कपिलने सांगितले.

Story img Loader