गेल्या काही सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे मनोबल खालावलेले असेल; पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, असे मत भारताचे माजी यष्टिरक्षक आणि माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे.
‘‘विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये गुणवत्तेबरोबरच दैवही तुमच्या बाजूने असावे लागते. भारत-पाकिस्तान हा साखळीतील पहिला सामना दोन्ही देशांबरोबरच क्रिकेट जगतासाठी महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकल्यावर भारताचे मनोबल उंचावेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुन्हा त्यांच्यामध्ये आक्रमकपणा दिसेल,’’ असे मोरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘विश्वचषकामध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. प्रत्येक सामन्यागणिक समीकरणे बदलतात. विजयामुळे आत्मविश्वास वाढतो. विश्वचषकातील एखादा विजय प्रेरणादायी ठरू शकतो.’’