विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनविण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सर्फराझ नवाझ यांच्याकडून करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी) सांगण्यावरून भारतीय संघाच्या ताकदीला साजेशा अशा खेळपट्ट्यांची निर्मिती करण्यात आल्याचा खळबळजनक दावा नवाझ यांनी केला. तुम्ही या विश्वचषकात खेळण्यात आलेल्या सामन्यांकडे नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल की, भारतीय संघाचे सर्व सामने त्यांच्या मजबुत दुव्यांना पोषक असणाऱ्या खेळपट्ट्यांवरच खेळविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
५५ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्फराझ नवाझ यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हा आरोप केला. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नवाझ यांनी पाकिस्तानी संघाचे सर्व सामने जाणुनबुजून त्यांना प्रतिकूल खेळपट्ट्यांवर आयोजित केल्याचाही आरोप केला. रविवारी पाकिस्तानी संघाचा सामना ज्या खेळपट्टीवर झाला ती खेळपट्टी वेगवान आणि उसळणाऱ्या चेंडुंसाठी पोषक होती. मात्र, ही परिस्थिती पाकिस्तानसाठी प्रतिकूल होती. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात आयसीसीकडे दाद मागावी, अशी सूचनाही नवाझ यांनी केली आहे. विश्वचषकासाठी बनविण्यात आलेल्या खेळपट्ट्या या एकतर फलंदाज किंवा गोलंदाजांना पूर्णपणे सहाय्य करणाऱ्या आणि एकांगी असल्याचेही नवाझ यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात झगडणाऱ्या भारतीय संघाचा खेळ अचानक इतका कसा सुधारला, हा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा