आपण घरच्या मैदानावर २०११ मध्ये विश्वचषक जिंकला, त्या वेळी युवराजसिंग या अष्टपैलू खेळाडूची कामगिरी खूपच महत्त्वाची ठरली होती. मी जर निवड समितीत असतो, तर पंधरा खेळाडूंमध्ये त्याला नक्कीच संधी दिली असती. जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो, तेव्हा आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर किंवा प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर संघास अडचणीतून मुक्त करण्याची क्षमता त्याच्याकडे अजूनही आहे. यापूर्वी त्याने अनेक वेळा भारताला प्रतिकूल परिस्थितीतून विजय मिळवून दिला आहे. त्याच्या अनुपस्थितीत प्रत्येकाने फलंदाजीत किमान २५ ते ३० धावा केल्या पाहिजेत. अकराव्या खेळाडूपर्यंत सर्वच खेळाडूंनी किमान ५० धावांची भागीदारी करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर आपल्या वेगवान व मध्यमगती गोलंदाजांनी अचूक टप्पा व दिशा ठेवत गोलंदाजी केली पाहिजे. वेगापेक्षाही स्विंगवर अधिक भर देण्याची गरज आहे. तेथे २६० ते २७० धावांचे आव्हानही पुरेसे आहे. न्यूझीलंडमधील वातावरण लक्षात घेता तेथे २२० ते २२५ धावाही पुरेशा मानल्या जातात. मात्र दोन्ही देशांमध्ये गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी मोलाची साथ दिली पाहिजे.
ऑस्ट्रेलियाचा संघ संभाव्य विजेता मानला जात आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा, अनुकूल वातावरण व खेळपट्टय़ा याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे, मात्र कधी कधी घरच्या मैदानावर खेळताना मानसिक दडपणही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिण आफ्रिकेकडे अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत तसेच त्यांचे फलंदाजही सध्या अतिशय चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांनाही विजेतेपदाची चांगली संधी आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध नुकतेच चांगले यश मिळविले असले, तरी त्यांना विजेतेपदासाठी खूप झगडावे लागेल. न्यूझीलंडला घरच्या मैदानांचा फायदा मिळणार असला, तरी बाद फेरीत त्यांना संघर्षांखेरीज पर्याय नाही. श्रीलंकेचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असले, तरी विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये ते नाहीत. वेस्टइंडिज व पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत अंदाज बांधणे कठीण असते. कधी ते सवरेत्कृष्ट खेळ करतात तर कधी कधी त्यांची कामगिरी खूपच खराब होते. एकूणच ही स्पर्धा चुरशीने खेळली जाईल असे वाटते.
मिलिंद गुंजाळ (माजी क्रिकेटपटू)
संकलन : मिलिंद ढमढेरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा