भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी त्यांना एका जागी बसवणारा जिव्हाळा, लळा लावणारा एकमेव मार्ग २२ यार्डामधून जातो.. हा फक्त सामना नसतो, तर ते द्वंद्व असतं प्रत्येकाच्या मनामनातलं, जिथे फक्त विजयच हवा असतो. पराभवाचा ‘प’देखील शेवटच्या चेंडूपर्यंत निघत नसतो.. हाडवैर या शब्दाची अनुभूती देणारं, प्रत्येक चेंडूवर वाहवा किंवा शिव्यांची लाखोली वाहिली जाणारा असा हा सामना. अवघे क्रिकेट विश्व ज्याची आतुरतेने वाट पाहात आहे तो भारत आणि पाकिस्तान विश्वचषकातील यांचा पहिला सामना रविवारी रंगणार आहे. त्यामुळे उत्स्फूर्ततेचा सर्वोच्च बिंदू गाठणाऱ्या या सामन्यात जो संघ दडपण उत्तम पद्धतीने हाताळेल, त्यालाच विजयाची सर्वाधिक संधी असेल.
आतापर्यंत विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेले आहेत, त्यामुळे ध्वज विजयाचा उंच धरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. विश्वचषकापूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आलेला नसला तरी या सामन्यात पाकिस्तानसारखा संघ समोर आल्यावर मात्र भारतीय संघाने चांगलीच कंबर कसली आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे दोन्ही मुंबईकर चांगल्या फॉर्मात आहेत; पण शिखर धवन, विराट कोहली, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताची फलंदाजी कशी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. भारतीय गोलंदाजी बोथट वाटत असली तरी त्यांनी आपली अस्त्रांना या सामन्यासाठी धार चढवलेली असेल.
आतापर्यंतच्या विश्वचषकातील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तानचा संघ प्रयत्नशील असेल. त्यांच्या संघाचा विचार केला, तर त्यांची फलंदाजी ही गोलंदाजीपेक्षा दमदार आहे. कर्णधार मिसबाह उल हक, युनिस खान, उमर अकमल, शाहिद आफ्रिदी असे दमदार फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. पाकिस्तानची गोलंदाजी ही अनुनभवी आहे; पण या नवख्या गोलंदाजांकडून आश्चर्यकारक कामगिरीही घडू शकते. गोलंदाजीमध्ये आफ्रिदीवर साऱ्यांची नजर असेल.
सध्याच्या घडीला दोन्ही संघांची फलंदाजी ही जमेची बाजू आहे, त्यमुळे दोन्ही संघ धावसंख्येचे आव्हान स्वीकारून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्याची शक्यता आहे. धोनीचा चाणाक्षपणा पाकिस्तानच्या एकाही खेळाडूकडे दिसत नसून भारतासाठी ही जमेची बाजू असेल. पाकिस्तानसाठी आफ्रिदी हा हुकमी एक्का ठरू शकतो. दोन्ही संघांचा विचार केला, तर पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे वरचढ आहे; पण या थरारक सामन्यात कागदावरच्या नावांपेक्षा कामगिरीवरच सारे काही अवलंबून असते.
घमासान!
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी त्यांना एका जागी बसवणारा जिव्हाळा, लळा लावणारा एकमेव मार्ग २२ यार्डामधून जातो..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-02-2015 at 05:05 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan at adland today