भारतीय ब्लेझर व भारतीय टाय यात खुशाल मिरवून घ्यायचं, डॉन ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलियात जाण्याची स्वप्नवत सुवर्णसंधी साधण्यासाठी, भारतीय संघातर्फे दौऱ्यावर जाण्याचं आमंत्रण विनाअट स्वीकारून घ्यायचं, ब्रॅडमन-मिलर-लिंडवॉल अशा अलौकिक खेळाडूंशी सामना देण्यासाठी फाळणीचे हिशेब नजरेआड करायचे- पण कसोटी लागण्याच्या निर्णायक क्षणी, तिरंगी झेंडय़ाला सलाम करायला उद्दामपणे नकार द्यायचा! असे होते भारतीय संघातील छुप्या पाकिस्तानी जोडीचे अक्षम्य चाळे. भारत-पाक क्रिकेटचा थरार किती जहरी असू शकतो, याचं हे विस्मरणात गेलेलं एक चित्रण. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतला अंतिम सामना ज्या मेलबर्नमध्ये रंगणार आहे, तिथेच घडली ही लज्जास्पद घटना.
३० जानेवारी १९४८ रोजी एका माथेफिरूने नि:शस्त्र व कडक सुरक्षा कवच नाकारणाऱ्या राष्ट्रपित्या महात्मा गांधींचा खून केला होता. संपण्याच्या अवस्थेत असलेला ऑस्ट्रेलियन दौरा अर्धवट सोडून द्यावा काय आणि मेलबर्नमधील शेवटची कसोटी रद्द करावी की काय, याची चर्चा चाललेली होती. राष्ट्रपित्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तिरंगी झेंडय़ाला मानवंदना देण्यासाठी सारा संघ एकत्र आला होता. त्यात आपली जात दाखवून दिली, लेग-स्पिनर अमीर इलाही आणि उत्तम फलंदाज व क्षेत्ररक्षक असलेल्या गुल महमदने. तिरंगी झेंडय़ाला सलाम करण्याचं पाप त्यांना आपल्या हातून घडू द्यायचं नव्हतं.
हरामजादे- हा शब्द अशा लोकांना वापरण्यास कुणाचीही हरकत नसावी!
तेव्हा का चूप बसले?
गुल महमद व अमीर इलाही यांचं म्हणणं असं की : ‘फाळणीनंतर बडोद्यातून पाकिस्तानला जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे तिरंगी झेंडा आपला झेंडा, असं आम्ही मानत नाही! पण हा दौरा सुरू झाला ऑक्टोबर ४७मध्ये. म्हणजे फाळणीनंतर किमान दीड महिन्याने. गुल महमद व अमीर इलाही तेव्हा चूप का बसले? अब्दुल हफीझ कारदार व फझल महमूद यांच्याप्रमाणे ते तेव्हाच भारतापासून अलग का झाले नाहीत? भारतातून बाहेर पडता पडता, शेवटच्या क्षणी भारतीयत्वाचे फायदे उठविणारे हे बोके, किती संधिसाधू. देशाच्या सीमेपलीकडे घुसखोरी करणाऱ्या विस्तारवादी पॅन-इस्लामने भारावलेले लुच्चे!
कर्णधार लाला अमरनाथ यांनी त्यांना एकेकटय़ाला बोलावून खडसावलं. गुल महमदने क्षमायाचना केली. अमीर इलाहीने आपल्याला भडकावलं, असाही कबुलीजबाब दिला. पण अमीर इलाहीला आपलं चुकलं, असं वाटतच नव्हतं. खरं तर चूक त्यांच्यापेक्षा होती भारतीय नेतृत्वाची. कर्णधार अमरनाथ, व्यवस्थापक पंकज गुप्ता अन् भारतीय मंडळाचे अँथनी डिमेलो यांची. तडकाफडकी त्या दोघांना संघातून हुसकावून भारतात (खरं तर पाकिस्तानात) पाठविण्याची शिक्षा न देणाऱ्या मंडळाची.
आणि हेच आहे भारतीय, म्हणजेच हिंदू समाजाच्या व्यवहारांचं चित्र. हिंदू धर्मातील महिला दलित, हरिजन, आदिवासी यांचे चातुर्वण्र्याच्या व मनुवादी प्रभावाखाली शतकानुशतके शोषण करायचं, असहाय समाजाला तुडवायचं, पण शक्तिमान मोगल, मुस्लीम, ब्रिटिश, ग्रीक आक्रमकांविरुद्ध अधूनमधून विजयी झालो, तरी शरण आलेल्या आक्रमकांना जीवनदान द्यायचं! स्वधर्मीयांशी असहिष्णु व क्रूर. परकीयांशी सहिष्णु व पडखाऊ.
नाना नेते तितकी सत्ता केंद्रे
इतिहास असं सांगतो की, १८५७च्या उठावात, संख्येने कमी असलेलं ब्रिटिश सैन्य जिंकलं. कारण नेता मृत्युमुखी पडल्यावर, उपनेता लगेच त्याची जागा घेत असे, पण ब्रिटिश पलटणी कधीच नेतृत्वहीन नसत. याउलट रणांगणात हट्टाने सर्वात पुढे राहणारा भारतीय सेनेचा नायक गारद झाला तर फौजेत निर्नायकी पसरे. याचाच दुसरा पैलू म्हणजे भारतीय क्रिकेटचे नेतृत्व एकमुखी नसे. १९४५ ते १९५३ दरम्यान, विजय र्मचट, इफ्तिकार पतोडी, लाला अमरनाथ, विजय हजारे, विनू मांकड असे आलटून पालटून आठ वर्षांत पाच नवे-नवे संघनायक. सारे फार मोठे खेळाडू, पण सारे एकमेकांविषयी साशंक, संशयी निदान सावध. सारे बडे खेळाडू, पण सारे स्वायत्त संस्थानिक. एकछत्री अंमल चालणार कसा? भारत एकसंध, एकवटलेला असणार कसा?
१९५२च्या भारत-पाकमधील पहिल्यावहिल्या मालिकेत, पहिली कसोटी भारतानं तीन दिवसांत एका डावाने जिंकली. लगेच त्या विजयाच्या तीन मानकऱ्यांनी विनू मांकड- विजय हजारे- हेमू अधिकारी यांनी दुसऱ्या कसोटीतून अंग काढून घेतलं. त्यांनी सांगितलेल्या दुखापती खऱ्या असतीलही! पण संघातील वातावरण इतकं संशयाचं, गटबाजीने दूषित की, काही वर्षांनी अमरनाथ म्हणाले : ‘माझ्या नेतृत्वाखालील भारतीय विजय (या त्रिमूर्तीला) किना डाचला! फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या माझ्यासारख्यांना झालेल्या यातना, ते समजूच शकत नाहीत. भारतीय प्रतिष्ठेला तडा जातो, याची त्यांना पर्वा नाही. माझं करिअर बिघडवण्यात तेवढा त्यांना रस आहे.’ लालाजींची भावना अतिरंजित व बढाईखोर असेलही, पण त्यातून दिसतो तो दुभंगलेला भारतीय संघ.
त्यानंतर मुंबईतील कसोटीआधी अमरनाथनी सारे खेळाडू आपल्या खोलीत एकत्रित आणले. प्रत्येकाच्या हातात छोटे तिरंगी झेंडे दिले. एकजुटीने खेळण्याची शपथ घेतली.
पाकिस्तानी संघही कित्येकदा असाच विखुरलेला. तो संघही शपथ घेतो कुराणावर हात ठेवून!
२००३च्या विश्वचषकात सचिनने पाकची धुलाई केली तेव्हा राजसिंग डुंगरपूर यांचे निरीक्षण मार्मिक होते. पाक संघात पाच-सहा माजी कर्णधार होते, तितकीच सत्ताकेंद्रे होती. याउलट गांगुलीच्या संघातील माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यानं आपणहून नेतृत्व सोडलं होतं आणि वारसदार गांगुलीला उत्तम सहकार्य देत होता. धोनीलाही अशीच बुजुर्गाची साथ लाभली.
भारत-पाक समाज व्यक्तिवादी. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या यजमान देशांकडून त्यांना सांघिक कार्याचे काही धडे घ्यावे लागतील. ‘एक सूर, एक ताल’ संस्कृती अंगी बाणवावी लागेल.
एक सूर, एक ताल
भारतीय ब्लेझर व भारतीय टाय यात खुशाल मिरवून घ्यायचं, डॉन ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलियात जाण्याची स्वप्नवत सुवर्णसंधी साधण्यासाठी
First published on: 15-02-2015 at 04:54 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan match in rhythm