रविवारी झालेली भारत-पाकिस्तान मॅच महत्त्वाची होती. तशी ती प्रत्येक वेळी महत्त्वाचीच असते. विश्वचषकाचा पहिला सामना आणि तोही पाकिस्तानबरोबर, त्यामुळे या सामन्याची सर्वानाच फार मोठी उत्सुकता होती. कारण असे नेहमीच महत्त्वाचे असते की, कोणत्या दोन संघांमध्ये सामना आहे; पण wc07भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी भावना उत्कट झालेल्या असतात. ‘और कोन से भी मॅच में उन्नीस-बीस हुआ तो चलताए, पर पाकिस्तान से तो हमे जितनाही है!’ सचिन तेंडुलकर नसणारा हा विश्वचषकातील पहिला सामना होता, कारण सहा विश्वचषकांमध्ये सचिन आपल्याबरोबर होता. हे एक वेगळेपण होते या सामन्याला. असे बरेच अर्थ आणि कंगोरे या सामन्याला होते. आपल्याला एक ‘अँडव्हान्टेज’ होता की, आपण विश्वचषकात पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेलो नाही; पण तरीही भारतीय खेळाडूंवर जे दडपण असेल त्याचा विचारही आपण करू शकत नाही. बॅटिंग विकेट होती, आपण तीनशेचा स्कोअर केला. कमर्शियल अँगल में जो जो चाहिए.. अ‍ॅक्टिंग चाहिए, इमोशन्स चाहिए, रोमान्स चाहिए, म्युझिक चाहिए, रोना-धोना चाहिए, वो सब इस मॅच में था. कारण पहिली बॅटिंग इंडियाने केली आणि पाकिस्तान या आव्हानाचा पाठलाग करत होता. माझी मजा अशी झाली की, मी, माझी बायको आणि सोनाली कुलकर्णी आम्ही औरंगाबादला ‘मितवा’च्या प्रमोशनसाठी चाललो होतो. तीनची फ्लाइट होती, तेव्हा वाटले, अरे यार, आता मॅच रंगात येणार आणि आपल्याला पाहायला नाही मिळणार; पण सुदैवाने त्या दिवशी फ्लाइट दोन-अडीच तास लेट होती. विमानामध्ये आम्ही बसलो होतो आणि मोबाइलवर मॅच लावली होती आणि अर्धे विमान आमच्याबरोबर मॅच एन्जॉय करत होते. जवळपास ५०-६० जण एकत्र सामना बघत होतो आणि टाळ्या-शिटय़ा वाजत होत्या. बऱ्याच दिवसांनी गिरगावात एकत्र मॅच बघण्याची मजा मी पुन्हा अनुभवली. अनपेक्षितपणे सामना अनुभवयाला मिळाला आणि एक अद्भुत अनुभूती मिळाली. कारण भारत-पाकिस्तान सामन्यात प्रत्येक देशवासीय त्या पिचवर असतो, बाकीच्या सामन्याला आपण प्रेक्षक असतो. भावनांचा पूर आलेला असतो. हा सामना आपण सहज जिंकलो. विराटचे शतक झाले और क्या चाहिए. दुनिया में खुशी इससे अलग नही हो सकती!
आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आपल्यापुढे आहे. पहिला सामना पाकिस्तानबरोबर सहज जिंकलोय, पण आफ्रिकेचा हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातो. एक स्ट्राँग सलामी लागेल आपल्याला, त्याचबरोबर रनिंग बीटविन दी विकेट चांगली लागेल. कारण धावा करणे सोपे नसेल. त्यांची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. पाकिस्तानविरुद्ध तुम्ही विलपॉवर आणि इमोशनवर मॅच खेळता, पण तसे या वेळी होऊ शकत नाही. कारण त्यांचा संघ जगात अव्वल आहे. आफ्रिकेचा डेल स्टेन जो आहे तो सर्वात जास्त आव्हानात्मक असेल. तो एक चॅम्पियन बोलर आहे; पण पाकिस्तानच्या विजयानंतर संघात पॉझिटिव्ह एनर्जी असेल आणि आता घोडामैदान लांब नाहीए. सोमवारी आपण चर्चा करूही, की भारताने आफ्रिकेला हरवलेय; पण पराभव झाला तरी मानाने हरण्याची गंमत फक्त खेळामध्येच आहे. प्रत्येक सामना नवीन असल्याने तुम्हाला तुमचा मीटर पुन्हा झिरोवर सेट करावा लागतो, त्यामुळेच मला सामना नाटकासारखा वाटतो. मालिकेमध्ये टीआरपी घेऊन आपण काम करत असतो. आम्ही असे म्हणतो की, जेव्हा नाटकाचा पहिला प्रयोग उत्तम होतो ना तेव्हा दुसरा प्रयोग फार जपून करायचा असतो. प्रत्येक नाटकाला तीच प्रकाशयोजना, नेपथ्य, कलाकार, संवाद तेच असतात तरी तो प्रत्येक वेळी वेगळा होतो व त्यामुळे आपण त्याला नाटकाचा प्रयोग म्हणतो. त्यामध्ये उन्नीस-बीस होणारच. मला वाटते आपली जबाबदारी आता वाढलीय. विश्वचषकाचा दुसरा प्रयोग भारत जिंकेल, अशी मला आशा आहे. टीम इंडियाला मन:पूर्वक शुभेच्छा!
शब्दांकन : प्रसाद लाड