‘‘जेतेपद पटकावता न आल्याने निराश झालो आहोत. मात्र गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रत्येक आघाडीवर ऑस्ट्रेलियाने आम्हाला निष्प्रभ केले. एका मातब्बर संघाविरुद्ध आम्ही हरलो. त्यामुळे पराभवाने दु:खी आहोत. पण कसलाही पश्चात्ताप नाही,’’ असे मत न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने व्यक्त केले.
‘‘विश्वचषक अंतिम लढतीसारख्या मोठय़ा व्यासपीठावर सर्वोत्तम प्रदर्शन करत त्यांनी हे जेतेपद पटकावले आहे. कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आमचा  विजय हिरावला आहे. मात्र स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याचा अभिमान वाटतो,’’ असे मॅक्क्युलमने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘आक्रमकस्वरूपाचे क्रिकेट खेळताना आम्ही लोकांचे मनोरंजन केले. त्याचवेळी खेळभावना जोपासली जाईल, याचीही काळजी घेतली. प्रत्येक सामना सकारात्मक पद्धतीने खेळण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. स्पर्धेतला प्रवास विलक्षण असा होता. संघातील सर्वासाठी हा कालखंड स्वप्नवत होता. जेतेपद पटकावता आले असते तर आनंद झाला असता, मात्र ते नशिबात नव्हते. ’’
‘‘दुसऱ्या स्थानावर राहायला लागणे कधीच आवडणारे नसते. परंतु काही वेळा विजेत्या संघाच्या सर्वोत्तम प्रदर्शनाला सलाम करणे आवश्यक असते,’’ असे मॅक्क्युलम म्हणाला.
निवृत्तीबाबत संभ्रम
३३ वर्षीय ब्रेंडन मॅक्क्युलमने निवृत्तीबाबत चाहत्यांना संभ्रमात ठेवले. मॅक्क्युलम अंतिम लढतीनंतर निवृत्ती पत्करणार अशी चर्चा होती. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा विजय महत्त्वाचा आहे. माझी निवृत्ती नाही, असे सांगत मॅकक्युलमने निवृत्तीबाबत काहीही स्पष्ट सांगण्यास नकार दिला. ‘‘आमच्या संघातील काही खेळाडू स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहेत. मात्र पुढील काही दिवस ऑस्ट्रेलियाचे आहेत. निवृत्तीच्या वृत्ताने त्यांचे यश झाकोळण्याचा आमचा प्रयत्न नाही,’’ असे सांगत मॅक्क्युलमने निवृत्तीबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.