मॉर्ने मॉर्केलच्या त्या उसळत्या चेंडूला सीमारेषेबाहेर भिरकावण्याचा कुमार संगकाराचा प्रयत्न फसला आणि थर्डमॅनला डेव्हिड मिलरच्या हाती चेंडू विसावला.. त्यासह एक गौरवशाली प्रवासही संपुष्टात आला.. संगकारा बाद होऊन परतत होता त्या वेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. जणू या महान खेळाडूच्या निवृत्तीला पावसानेही सलाम ठोकला.
श्रीलंका क्रिकेटरूपी रथाची दोन चाके असणाऱ्या संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी यंदाचा विश्वचषक शेवटचा असणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर मात करत श्रीलंका आगेकूच करेल अशी शक्यता होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या जबरदस्त सांघिक खेळासमोर श्रीलंकेच्या संघाने नांगी टाकली आणि या जोडगोळीच्या प्रवासाला अचानक खीळ बसली.
४०४ एकदिवसीय सामन्यांत १४,२३४ धावा नावावर असणाऱ्या संगकाराचा आधुनिक क्रिकेटमधील महान खेळाडूंच्या मांदियाळीत समावेश होतो. शेवटच्या विश्वचषकात चार सलग सामन्यांत चार शतके झळकावत संगकाराने अनोखा विक्रम प्रस्थापित केला. आक्रमक आणि प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या संगकाराला शेवटच्या सामन्यात मात्र एकेका धावेसाठी झगडावे लागले.
शैलीदार आणि कलात्मक फलंदाजीसाठी प्रसिद्ध जयवर्धनेला शेवटच्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. ४४८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२,६५० धावा नावावर असणाऱ्या जयवर्धनेला शेवटच्या स्पर्धेत संघाला यशोशिखरावर नेता आले नाही.
२०११च्या विश्वचषकात या दोघांच्या सुरेख प्रदर्शनाच्या जोरावर श्रीलंकेने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र भारताने जेतेपदावर कब्जा केला. यंदाही हे दोघे श्रीलंकेचे जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार अशी चिन्हे होती. मात्र या विश्वचषकातही या जोडगोळीचे स्वप्न अधुरेच राहिले.
वैयक्तिक अफलातून खेळ करणाऱ्या या दोघांनी एकत्रित केलेल्या भागीदाऱ्यांनी श्रीलंकेला असंख्य संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही जोडगोळी २४ चेंडू टिकली आणि तिथेच श्रीलंकेच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा