श्रीलंकेला सापडलेल्या कुमार संगकारा नामक कोहिनूर हिऱ्याची चमक डोळे दिपवणारीच ठरत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतकांचा विश्वविक्रम रचत त्याने क्रिकेट जगताला आपल्यातील गुणवत्तेचे सर्वोत्तम प्रदर्शन केले. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने झळकावलेले शतक, त्याला तिलकरत्ने दिलशानची मिळालेली सुयोग्य शतकी साथ आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या जलद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने ३६३ धावांचा डेंगर उभारला, या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव १९८ धावांमध्ये संपुष्टात आला आणि श्रीलंकेने अखेरच्या साखळी सामन्यामध्ये १४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने गुणतालिकेत ‘अ’ गटात दुसरे स्थान पटकावले आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पहिला धक्का २१ धावांवरच बसला. पण त्यानंतर मात्र नजाकतभऱ्या फटक्यांच्या आतषबाजीने मैदान दणाणून गेले. गोलंदाजीचे कुठलेही दडपण न घेता संगकारा आणि दिलशान यांनी मुक्तपणे आपल्या पोतडीतील फटक्यांचा नजराणा पेश केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली, या दोघांची ही विसावी शतकी भागीदारी ठरली. शतकी भागीदारी रचण्यात संगकारा आणि दिलशान यांनी दुसरे स्थान पटकावले असून, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे अव्वल स्थानावर आहेत. संगकाराने ९५ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १२४ धावांची अप्रतिम खेळी साकारली, तर दिलशानने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०४ धावांची खेळी साकारत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. हे दोघे बाद झाल्यावर मॅथ्यूजने २० चेंडूंत विश्वचषकातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक लगावले. मॅथ्यूजने ५१ धावांची खेळी साकारताना एकमेव चौकार आणि अर्धा डझन षटकार फटकावले. पण मॅथ्यूज बाद झाल्यावर श्रीलंकेला ३६ चेंडूंमध्ये फक्त १० धावाच करता आल्या, नाही तर त्यांना चारशे धावांचा टप्पा ओलांडणे सहज शक्य होते.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडची ३ बाद ४४ अशी स्थिती होती. पण त्यानंतर फ्रेडी कोलमन (७०) आणि प्रेस्टन मोमसेन (६०) यांनी अर्धशतके झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले. लसिथ मलिंगा आणि न्युवान कुलसेकरा यांनी अचूक मारा करत स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद केला, तर दुषमंता चमिराने तीन फलंदाज बाद केले असले तरी त्यासाठी त्याला ५१ धावा मोजाव्या लागल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद ३६३ (कुमार संगकारा १२४, तिलकरत्ने दिलशान १०४; जोश डॅव्हे २/६३) विजयी वि. स्कॉटलंड : ३९.१ षटकांत सर्व बाद १९८ (फ्रेडी कोलमन ७०, नुवान कुलसेकरा ३/२०)
सामनावीर : कुमार संगकारा.
एके काळी यष्टीरक्षण आणि फलंदाजी या दोन्ही जबाबदाऱ्या मी पेलत होतो, पण आता मी ३७ वर्षांचा असल्याने फक्त फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त असले तरी आम्ही खेळाचा आनंद लुटत आहोत. फलंदाजीवर लक्ष केंद्रित केल्याने संघासाठी मी चांगल्या धावा करू शकत आहे. यापुढेही संघासाठी अशीच चांगली कामगिरी सातत्यपूर्ण व्हावी आणि संघाला विजय मिळावेत, हीच माझी इच्छा असेल.
– कुमार संगकारा, श्रीलंकेचा फलंदाज
कुमार संगकारा
१२४ धावा
९५ चेंडू
१३ चौकार
४ षटकार
४ कुमार संगकाराच्या सलग शतकांची संख्या. एकदिवसीय प्रकारात आणि विश्वचषकात सलग चार डावांत शतक झळकावण्याचा विक्रम करणारा संगकारा एकमेव खेळाडू.
१ एकाच विश्वचषकात चार शतकांची नोंद करणारा संगकारा पहिला खेळाडू. यापूर्वी मार्क वॉ, मॅथ्यू हेडन आणि सौरव गांगुली यांनी एकाच विश्वचषकात प्रत्येकी तीन शतके नोंदवली होती. आता हा विक्रम संगकाराच्या नावावर.
५ विश्वचषकातल्या संगकाराच्या एकूण शतकांची संख्या. विश्वचषकात सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संगकारा दुसऱ्या स्थानी. सहा शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी
५४ विश्वचषकात कुमार संगकाराने यष्टिरक्षक म्हणून बाद केलेल्या फलंदाजांची संख्या. विश्वचषकात यष्टिरक्षकातर्फे सर्वाधिक बळींचा विक्रम आता संगकाराच्या नावावर. त्याने ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टच्या
५२ बळींचा विक्रम मोडला.
१०२५ कुमार संगकाराने २०१५ वर्षांत सर्व
प्रकारात मिळून केलेल्या धावांची संख्या. यंदाच्या वर्षांत सर्व प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम संगकाराच्या नावावर.
गेल्या काही दिवसांमध्ये संघात लक्षणीय बदल झालेले आहेत. सारेच खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विजयाचे श्रेय कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान यांना द्यायलाच हवे. या दोघांनीही अनुभव पणाला लावत अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करीत शतके झळकावली आणि त्यामुळे आम्हाला स्कॉटलंडवर सहजपणे विजय मिळवता आला. यापुढे कामगिरीत सातत्य ठेवण्यावर आमचा भर असेल.
अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार
अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ४९६ धावा
२. तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) ३९५ धावा
३. शिखर धवन (भारत) ३३३ धावा
अव्वल गोलंदाज
१. जोश डॅव्हे (स्कॉटलंड) १४ बळी
२. ट्रेंट बोल्ट व टिम साऊदी (न्यूझीलंड) १३ बळी
३. मिचेल स्टार्क, डॅनियल व्हेटोरी, मोहम्मद शमी १२ बळी