श्रीलंकेला सापडलेल्या कुमार संगकारा नामक कोहिनूर हिऱ्याची चमक डोळे दिपवणारीच ठरत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतकांचा विश्वविक्रम रचत त्याने क्रिकेट जगताला आपल्यातील गुणवत्तेचे सर्वोत्तम प्रदर्शन केले. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने झळकावलेले शतक, त्याला तिलकरत्ने दिलशानची मिळालेली सुयोग्य शतकी साथ आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या जलद
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पहिला धक्का २१ धावांवरच बसला. पण त्यानंतर मात्र नजाकतभऱ्या फटक्यांच्या आतषबाजीने मैदान दणाणून गेले. गोलंदाजीचे कुठलेही दडपण न घेता संगकारा आणि दिलशान यांनी मुक्तपणे आपल्या पोतडीतील फटक्यांचा नजराणा पेश केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली, या दोघांची ही विसावी शतकी भागीदारी ठरली. शतकी भागीदारी रचण्यात संगकारा आणि दिलशान यांनी दुसरे स्थान पटकावले असून, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे अव्वल स्थानावर आहेत. संगकाराने ९५ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १२४ धावांची अप्रतिम खेळी साकारली, तर दिलशानने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०४ धावांची खेळी साकारत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. हे दोघे बाद झाल्यावर मॅथ्यूजने २० चेंडूंत विश्वचषकातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक लगावले. मॅथ्यूजने ५१ धावांची खेळी साकारताना एकमेव चौकार आणि अर्धा डझन षटकार फटकावले. पण मॅथ्यूज बाद झाल्यावर श्रीलंकेला ३६ चेंडूंमध्ये फक्त १० धावाच करता आल्या, नाही तर त्यांना चारशे धावांचा टप्पा ओलांडणे सहज शक्य होते.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडची ३ बाद ४४ अशी स्थिती होती. पण त्यानंतर फ्रेडी कोलमन (७०) आणि प्रेस्टन मोमसेन (६०) यांनी अर्धशतके झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले. लसिथ मलिंगा आणि न्युवान कुलसेकरा यांनी अचूक मारा करत स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद केला, तर दुषमंता चमिराने तीन फलंदाज बाद केले असले तरी त्यासाठी त्याला ५१ धावा मोजाव्या लागल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा