एखादा विजय संघाचे आणि खेळाडूंचे मनोबल उंचावू शकतो, मग तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात का असेना, पण भारताला अखेर विजय गवसला. रोहित शर्माने पुन्हा एकदा धडाकेबाज शतकी खेळी साकारल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ३६४ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २११ धावाच करता आल्या आणि भारताने १५३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने हा सामना सहज जिंकला असला, तरी त्यांना अफगाणिस्तानसारख्या संघाला सर्व बाद करता आले नाही.
भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्यांना १६ धावांमध्येच दोन फलंदाज गमवावे लागले. पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी गडगडणार असे वाटत होते. पण रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी दमदार फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. रैना बाद झाल्यावर रोहितने अजिंक्य रहाणेला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. रोहितने यावेळी पुन्हा एकदा झंझावाती खेळीचा नमुना पेश करत १२ चौकार आणि सात षटकारांसह १५० धावांची खेळी साकारली. रैनाने ५ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ आणि रहाणेने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारत संघाला साडेतीनशे धावांची मजल मारून दिली.
भारताच्या ३६४ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला ठरावीक अंतराने धक्के बसत गेले आणि त्यांना ५० षटकांमध्ये ८ बाद २११ अशी मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून नवरोझ मंगलने ६० धावांची सर्वाधिक खेळी साकारली. भारताकडून मोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ५ बाद ३६४
(रोहित शर्मा १५०, अजिंक्य रहाणे नाबाद ८८, सुरेश रैना ७५; हमीद हसन १/४९) विजयी वि. अफगाणिस्तान : ५० षटकांत ८ बाद २११.
(नवरोझ मंगल ६०; रवींद्र जडेजा २/३८, मोहित शर्मा २/४०).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा