बांगलादेशवर १०९ धावांनी विजय
प्रत्येक सामन्यात काही ना काही चुका होतच असतात, पण सातत्याने होणाऱ्या चुका आणि त्यामुळे टीकेचा धनी तो ठरत होता. त्याच्या गुणवत्तेवर कोणालाही संशय नव्हता, पण त्याचे धावांचे मीटर काही धावत नव्हते. याला आता संघातून बाहेरचा रस्ता दाखवा, अशी ओरडही सुरू झाली होती. परंतु संघाला त्याच्यावर विश्वास होता आणि रोहित शर्माने तो सार्थ ठरवला बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीमध्ये. या सामन्यात रोहितला अखेर सूर गवसला आणि त्याच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने पुन्हा एकदा सोपा विजय मिळवला. रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०२ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १९३ धावांमध्ये संपुष्टात आणत भारताने १०९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी दिमाखात प्रवेश केला आहे. बांगलादेशला पराभूत करून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयाचे शतक साजरे केले.
नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारायची आणि मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पध्र्यावर दडपण आणायचे, हे धोनीचे सूत्र पुन्हा एकदा यशस्वी ठरले. फॉर्मात असलेला शिखर धवन (३०), विराट कोहली (३) आणि अजिंक्य रहाणे (१९) यांना मोठी खेळी साकारता न आल्याने भारतावर दडपण वाढत होते. पण एका बाजूने रोहित खिंड लढवत होता. भारताचा डाव डगमगेल असे वाटत असतानाच रोहितला रैनाने चांगली साथ दिली व त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५.५ षटकांमध्ये १२२ धावांची भागीदारी रचली. रोहितने या वेळी शतकी खेळीची अप्रतिम बांधणी केली. रोहितला ९० धावांवर जीवदान मिळाले, त्याचा फयदा उचलत त्याने विश्वचषकातले पहिले शतक झळकावले. रोहितने १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १३७ धावांची खेळी साकारली. रैनाने या वेळी भारताची धावगती वाढवत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. मोठा फटका मारण्याच्या नादात रैना बाद झाला, तर रोहित त्रिफळाचीत झाला. पण बाद होण्यापूर्वी या दोघांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक फरकाने बांगलादेशला धक्के दिले आणि विश्वचषकात सलग सातव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळण्याची किमया साधली. उमेश यादवने भेदक मारा करत चार फलंदाजांना माघारी धाडले, तर मोहम्मद शमीने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.दरम्यान, षटकांची गती संथ राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुर्तझावर एका सामन्याची बंदी घातली आहे. याप्रमाणे मानधनाच्या ४० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.

धोनीच्या विजयाची शंभरी
मेलबर्न : विश्वचषकातील सलग विजयांपाठोपाठ भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमांची यादीही वाढायला लागली आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयानिशी त्याने यंदाच्या विश्वचषकातील सलग सातवा विजय नोंदवला, त्याचबरोबर विजयाची शंभरीही त्याने साजरी केली. धोनीने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी दिवंगत कर्णधार हॅन्सी क्रोनिएला (९९) यावेळी मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला. धोनीने १७८ व्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद भूषवताना शंभरावा विजय साजरा केला. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग अव्वल स्थानावर आहे, त्याने १६५ एकदिवसीय विजय मिळवले होते. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार अ‍ॅलन बोर्डर असून त्याच्या नावावर १०७ विजय आहेत.

मुर्तझा नाराज
मेलबर्न : भारताचा अडखळलेला डाव सावरत असतानाच रोहित शर्माचा ९० धावांवर असताना रुबेला हुसेनच्या गोलंदाजीवर मिड विकेटला झेल उडाला. त्यावेळी मैदानावरील पंच इयान गोऊल्ड यांना चेंडू कंबरेच्यावर थेट आल्याचे जाणवले आणि त्यांनी नो-बॉल दिल्यामुळे रोहित सुदैवी ठरला. याबाबत नाराजी व्यक्त करताना मश्रफी म्हणाला की, ‘‘पंचांच्या निर्णयावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही. जे काही मैदानात झाले ते साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे याबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही.’’

धावफलक
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. तस्किन १३७, शिखर धवन यष्टिचीत मुशफिकर गो. शकिब ३०, विराट कोहली झे. मुशफिकर गो. हुसेन ३, अजिंक्य रहाणे झे. शकिब गो. तस्किन १९, सुरेश रैना झे. मुशफिकर गो. मुर्तझा ६५, महेंद्रसिंग धोनी गो. नासिर हुसेन गो. तस्किन ६, रवींद्र जडेजा नाबाद २३, आर. अश्विन नाबाद ३, अवांतर (बाइज ४, लेग बाइज ७, वाइड ३,
नो बॉल २) १६,
एकूण : ५० षटकांत ६ बाद ३०२.
बाद क्रम : १-७५, २-७९, ३-११५, ४-२३७, ५-२७३,
६-२९६.
गोलंदाजी : मश्रफी मुर्तझा १०-०-६९-१, तस्किन अहमद १०-०-६९-३, नासिर होसेन ९-०-३५-०, महमुदुल्ला १-०-४-०, रुबेल हुसेन १०-०-५६-१, शकिब अल हसन १०-०-५८-१.

बांगलादेश : तमीम इक्बाल झे. धोनी गो. यादव २५, इम्रुल केस धावचीत ५, सौम्य सरकार झे. धोनी गो. शमी २९, महमुदुल्ला झे. धवन गो. शमी २१,  शकिब अल हसन झे. शमी गो. जडेजा १०, मुशफिकर रहिम झे. धोनी गो. यादव २७, शब्बीर रहमान झे. शमी गो. यादव ३०, नासिर हुसेन झे अश्विन गो. जडेजा ३५, मश्रफी मुर्तझा झे. धोनी गो. मोहित शर्मा १, रुबेल हुसेन झे. अश्विन गो. यादव ०, तस्किन अहमद नाबाद ०, अवांतर (बाइज १, लेग बाइज १, वाइड ८) १०,
एकूण ४५ षटकांत सर्व बाद १९३.
बाद क्रम : १-३३, २-३३, ३-७३, ४-९०, ५-१०४, ६-१३९
गोलंदाजी : उमेश यादव ९-१-३१-४, मोहम्मद शमी ८-१-३७-२, मोहित शर्मा ७-०-३६-१, आर. अश्विन १०-१-३०-०,
सुरेश रैना ३-१-१५-०, रवींद्र जडेजा ८-०-४२-२.
सामनावीर : रोहित शर्मा.

महिन्याभरापूर्वी आम्ही चाचपडत होतो, पण विश्वचषकात आमची कामगिरी चांगली होत असून हे सांगायला काहीही वावगे वाटत नाही. या विजयाचे श्रेय संघातील खेळाडूंना आणि सहयोगींना द्यायला हवे. फलंदाज सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये अव्वल नसले तरी आमची चांगली फलंदाजी होत आहे. गोलंदाजही चोख कामगिरी बजावत आहेत. कामगिरीत अजूनही सुधारणेची गरज आहे.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

या खेळपट्टीवर कोणीही नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. कारण या खेळपट्टीवर ३०० धावांचा पाठलाग करणे कठीण समजले जाते. रुबेल आणि शकिब यांनी चागली गोलंदाजी केली, पण परिस्थितीचा आम्हाला फायदा उचलता आला नाही. विश्वचषकातील आमच्या कामगिरीवर चाहते आनंदी असतील, अशी आशा करतो.
मश्रफी मुर्तझा, बांगलादेशचा कर्णधार

मेलबर्नची खेळपट्टी मला नेहमीच आवडते. या खेळपट्टीवर एकदा स्थिरस्थावर झाल्यावर चांगली खेळी उभारता येते. संघासाठी माझेही शतक कामी आले, याचा आनंद आहे. संघाची कामगिरी सातत्यपूर्ण होत आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी गोलंदाजीवर मेहनत घेतली असून गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
रोहित शर्मा, भारताचा सलामीवीर

रोहित शर्मा
१३७ धावा
१२६    चेंडू
१४ चौकार     
३ षटकार    

  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रोहित शर्माच्या शतकांची संख्या. या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या यादीत विवियन रिचर्ड्स आणि डेव्हिड गॉवर यांच्यासह आता रोहित शर्माही.

११ विश्वचषकात भारताच्या सलग विजयांची संख्या. २५ सलग विजयांसह ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी.

   विश्वचषकात सलग सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर.

०  भारताने बॅटिंग पॉवरप्ले दरम्यान भारताने गमावलेल्या फलंदाजांची संख्या. यंदाच्या विश्वचषकात बॅटिंग पॉवरप्लेदरम्यान एकही विकेट न गमावणारा भारत हा एकमेव संघ.