बांगलादेशवर १०९ धावांनी विजय
प्रत्येक सामन्यात काही ना काही चुका होतच असतात, पण सातत्याने होणाऱ्या चुका आणि त्यामुळे टीकेचा धनी तो ठरत होता. त्याच्या गुणवत्तेवर कोणालाही संशय नव्हता, पण त्याचे धावांचे मीटर काही धावत नव्हते. याला आता संघातून बाहेरचा रस्ता दाखवा, अशी ओरडही सुरू झाली होती. परंतु संघाला त्याच्यावर विश्वास होता आणि रोहित शर्माने तो सार्थ ठरवला बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीमध्ये. या सामन्यात रोहितला अखेर सूर गवसला आणि त्याच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने पुन्हा एकदा सोपा विजय मिळवला. रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०२ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १९३ धावांमध्ये संपुष्टात आणत भारताने १०९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी दिमाखात प्रवेश केला आहे. बांगलादेशला पराभूत करून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयाचे शतक साजरे केले.
नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारायची आणि मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पध्र्यावर दडपण आणायचे, हे धोनीचे सूत्र पुन्हा एकदा यशस्वी ठरले. फॉर्मात असलेला शिखर धवन (३०), विराट कोहली (३) आणि अजिंक्य रहाणे (१९) यांना मोठी खेळी साकारता न आल्याने भारतावर दडपण वाढत होते. पण एका बाजूने रोहित खिंड लढवत होता. भारताचा डाव डगमगेल असे वाटत असतानाच रोहितला रैनाने चांगली साथ दिली व त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५.५ षटकांमध्ये १२२ धावांची भागीदारी रचली. रोहितने या वेळी शतकी खेळीची अप्रतिम बांधणी केली. रोहितला ९० धावांवर जीवदान मिळाले, त्याचा फयदा उचलत त्याने विश्वचषकातले पहिले शतक झळकावले. रोहितने १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १३७ धावांची खेळी साकारली. रैनाने या वेळी भारताची धावगती वाढवत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. मोठा फटका मारण्याच्या नादात रैना बाद झाला, तर रोहित त्रिफळाचीत झाला. पण बाद होण्यापूर्वी या दोघांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक फरकाने बांगलादेशला धक्के दिले आणि विश्वचषकात सलग सातव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळण्याची किमया साधली. उमेश यादवने भेदक मारा करत चार फलंदाजांना माघारी धाडले, तर मोहम्मद शमीने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.दरम्यान, षटकांची गती संथ राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुर्तझावर एका सामन्याची बंदी घातली आहे. याप्रमाणे मानधनाच्या ४० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
आता माझी सटकली !
प्रत्येक सामन्यात काही ना काही चुका होतच असतात, पण सातत्याने होणाऱ्या चुका आणि त्यामुळे टीकेचा धनी तो ठरत होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-03-2015 at 03:12 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score world cup 2015 india vs bangladesh