सिंहाने एखादी छोटी शिकार बेमालूमपणे करावी, असेच काही विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अव्वल ठरलेल्या भारताने संयुक्त अरब अमिरातीच्या बाबतीत शनिवारी केले. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर फिरकीपटू आर. अश्विनने चार बळी मिळवत कमाल केली आणि अमिरातीचे आव्हान बेचिराख केले. भारताच्या भेदक माऱ्यापुढे अमिरातीचा संघ १०२ धावांमध्ये गडगडला आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान नऊ विकेट्स राखत पूर्ण केले. विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करत भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
अमिरातीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांना सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसत गेले. उमेश यादवने त्यांना सुरुवातीलाच दोन धक्के दिले. या धक्क्यातून त्यांना अश्विनने सावरायला संधीच दिली नाही. आपल्या फिरकीच्या तालावर अमिरातीच्या फलंदाजांना चकित करत त्याने चौघांना माघारी धाडले. त्याला अन्य गोलंदाजांची योग्य साथ मिळाल्यामुळे भारताला अमिरातीचा १०२ धावांमध्ये खुर्दा उडवता आला. अमिरातीच्या आठ फलंदाजांना या दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. अमिरातीकडून शैमान अन्वरने सर्वाधिक ३५ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना फॉर्मात असलेला शिखर धवन (१४) झटपट माघारी परतला. पण त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली (नाबाद ३३) यांनी संयत फलंदाजी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. या खेळीतून रोहित फॉर्मात आल्याने भारतीय संघ सुखावला आहे, रोहितने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५७ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
संयुक्त अरब अमिराती : ३१.३ षटकांत सर्व बाद १०२. शैमान अन्वर ३५, आर. अश्विन ४/२५) पराभूत वि. भारत : १८.५ षटकांत १ बाद १०४ (रोहित शर्मा नाबाद ५७; मोहम्मद नवीद १/३५) सामनावीर : आर. अश्विन.
आमच्याकडून आज चांगली सांघिक कामगिरी झाली. पहिल्यांदा गोलंदाजांनी भेदक मारा करत विजयाचा पाया रचला आणि फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. आम्ही एक झेल सोडला असला तरी तो वगळता क्षेत्ररक्षण उत्तम झाले. तिन्ही आघाडय़ांमध्ये आम्ही बाजी मारत सामना जिंकला.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार
रोहित शर्मा
५७
चेंडू ५५
चौकार १०
षटकार १
४ आर. अश्विनने विश्वचषकात भारताकडून केलेली ही सर्वोत्तम तिसरी कामगिरी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर युवराज सिंग असून त्याने २०११ च्या विश्वचषकात ५ आणि २००३च्या विश्वचषकात ४ बळी मिळवले होते.
१८७ जास्त चेंडू राखून भारताने मिळवलेला दुसरा विजय. केनियाविरुद्ध भारताने १२ ऑक्टोबर २००१ला २३१ चेंडू राखून विजय मिळवला होता.
१९९१ वाकाच्या खेळपट्टीवरील ही भारतीय फिरकीपटूची सर्वोत्तम दुसरी कामगिरी. यापूर्वी १९९१ साली रवी शास्त्री यांनी १५ धावांत ५ बळी मिळवले होते.
सामनावीर- आर.अश्विन