आम्हीच सर्वोत्तम आहोत, हे पुन्हा एकदा भारतीय संघाने विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यातही दाखवून दिले. सुदैवी सुरेश रैनाचे नाबाद शतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या आत्मविश्वासपूर्ण नाबाद ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेवर ६ विकेट्स राखून विजय मिळवत ‘ब’ गटामध्ये अपराजित राहण्याची किमया साधली. झिम्बाब्वेने ब्रेंडन टेलरच्या अप्रतिम शतकाच्या जोरावर २८७ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे पहिले चारही फलंदाज शतकाची वेस ओलांडण्यापूर्वीच तंबूत परतले होते. पण रैना आणि धोनी यांनी सुंदर खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताने नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेला फलंदाजीला पाचारण करत त्यांनी ३ बाद ३३ अशी अवस्था केली. भारतीय संघ झिम्बाब्वेला झटपट गुंडाळेल, असे वाटत असतानाच आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या टेलरने संघाचा डाव सावरला. भारतीय गोलंदाजीचा सुरुवातीला संयमपणे सामना करणाऱ्या टेलरने स्थिरस्थावर झाल्यावर मोठी फटकेबाजी करत शतक झळकावले. त्याला या वेळी शॉन विल्यम्सने (५०) अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली. शॉन बाद झाल्यावरही टेलरने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत शतक झळकावले. टेलरने ११० चेंडूंत १५ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर १३८ धावांची अप्रतिम खेळी साकारली. मोहित शर्माला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नांमध्ये टेलरने आपली विकेट गमावली आणि झिम्बाब्वेला तीनशे धावांचा पल्ला गाठण्यापासून वंचित राहावे लागले. अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात झिम्बाब्वेने फलंदाज गमावले आणि त्यांना २८७ धावाच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने २१ धावांमध्ये दोन्ही फलंदाज गमावले. त्यानंतर अजिंक्य रहाणे (१९) आणि विराट कोहली (३८) यांनी अर्धशतकी भागीदारी रचली, पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही आणि भारताची ४ बाद ९२ अशी अवस्था झाली. पण यानंतर रैना आणि धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी १९७ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. रैनाला ४७ धावांवर असताना सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर हॅमिल्टन मसाकाझाने जीवदान दिले आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत रैनाने शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. रैनाने ९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ११० धावांची खेळी साकारली, तर धोनीने ८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ८५ धावांची खेळी साकारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा