विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अटी-तटीच्या लढतीत न्यूझीलंडने चार विकेट्स आणि एक चेंडू राखून रोमांचक विजय प्राप्त केला. या विजयासह किवींनी पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठून इतिहास रचला तर, द.आफ्रिकेवरील ‘चोकर्स’चा शिक्का पराभवामुळे कायम राहिला. आफ्रिकेच्या २९८ धावांच्या तुल्यबळ आव्हानाचा पाठलाग करताना सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. ग्रँट इलियट न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डेल स्टेनच्या अखेरच्या षटकात दोन चेंडूत ५ धावांची गरज असताना इलियटने खणखणीत षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने ७३ चेंडूत नाबाद ८४ धावा ठोकल्या. तर, कोरे अँडरसनने ५८ धावांची खेळी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ब्रेंडन मॅक्क्युलमने डेल स्टेनला झोडपलं
दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४३ षटकांचा करण्यात आला होता. द.आफ्रिकेने ४३ षटकांमध्ये ५ विकेट्स गमावून २८१ धावा ठोकल्या. पुढे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार न्यूझीलंडसमोर २९८ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने जोरदार फटकेबाजीला सुरूवात केली. मॅक्क्युलमने चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू करत आफ्रिकेच्या डेल स्टेनचा खरपूस समाचार घेतला. मॅक्क्युलमने त्याचे वैयक्तिक अर्धशतक अवघ्या २२ चेंडूत पूर्ण केले. त्याने केवळ २५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकार ठोकत ५९ धावा कुटल्या. केन विल्यम्सनला मॉर्केलने स्वस्तात त्रिफळाबाद करून माघारी धाडले तर, मार्टीन गप्तील धावचीत बाद झाला. त्यानंतर संयमाने फलंदाजी करत रॉस टेलरने डाव सावरण्यास सुरूवात केली. मात्र, मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला. टेलरला जेपी ड्युमिनीने तंबूत धाडले.
सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरूवातीलाच दोन धक्के बसले होते. द.आफ्रिकेची सलामीजोडी न्यूझीलंडचा तेजतर्रार गोलंदाज ट्रेंट बोल्टने स्वस्तात फोडून काढली. हशिम अमलाला बोल्टने १० धावांवर त्रिफळाबाद केले तर, क्विंटन डी कॉकला १४ धावांवर माघारी धाडले. पहिल्या दहा षटकांच्या आतच दोन फलंदाजी गमावल्याने द.आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यास न्यूझीलंडला यश आले. यानंतर फॅफ डू प्लेसिस आणि रिले रोसू यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. कोरे अँडरसनने रिले रोसूला ३९ धावांवर बाद केले. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलने पॉईंटवर रोसूचा उत्तम झेल टीपला. फॅफ डू प्लेसिस आणि रोसूने ८३ धावांची भागीदारी रचली. पुढे कर्णधार एबी डीव्हिलियर्सच्या साथीने फॅफने आपले अर्धशतक गाठले. त्यापाठोपाठ कर्णधार डीव्हिलियर्सनेही आपले अर्धशतक गाठले आणि दोघांनीही फलंदाजी पॉवरप्लेमध्ये फटकेबाजीला सुरूवात केली. द.आफ्रिकेच्या फलंदाजीवेळी ३८ व्या षटकात वरुणराजाच्या आगमनामुळे खेळ थांबविण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी द.आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद २१६ अशी होती. अखेरच्या षटकांत कर्णधार एबी.डीव्हिलियर्स आणि डेव्हिड मिलरने दमदार फटकेबाजी करून धावसंख्या वाढवली. मिलरने १८ चेंडूत ४९ धावा कुटल्या तर, डीव्हिलियर्सने ४५ चेंडूत नाबाद ६५ धावा ठोकल्या. केवळ तीन षटकांचा फलंदाजी ‘पावर प्ले’ द.आफ्रिकेला खेळता आल्याने न्यूझीलंडसाठी पहिल्या नऊ षटकांमध्ये अनिवार्य होता तर, तीस षटकांनंतर फक्त ४ षटकांचा फलंदाजी ‘पावर प्ले’ न्यूझीलंडला घेता आला.
न्यूझीलंडचा थरारक विजय, द.आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने चार विकेट्स आणि १ चेंडू राखून रोमांचक विजय प्राप्त केला
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2015 at 06:45 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score world cup 2015 new zealand vs south africa