अॅडलेडवर झालेल्या तिसऱया उपांत्यपूर्व फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६ विकेट्सने मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानच्या २१३ धावांचे आव्हान यजमानांनी ३४ व्या षटकात गाठले. मात्र, लक्ष्य गाठताना यजमानांना यावेळी संघर्ष करावा लागला. शेन वॉटसनने नाबाद ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तर, स्टिव्हन स्मिथने ६५ धावा केल्या.
पाकच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तीन फलंदाज स्वस्तात गमावले होते. यामुळे कांगारूंवर दडपणाखाली आणण्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश आले. वहाब रियाझने भन्नाट गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पांगवले. वॉटसन आणि रियाझ मध्ये अधून-मधून खटकेही उडाले. परंतु, सहकारी गोलंदाजांकडून रियाझला साजेशी साथ मिळाली नाही. त्यात वॉटसन आणि मॅक्सवेलचा सुटलेला झेल पाकिस्तानला महागात पडला. अखेर वॉटसनची संयमी नाबाद खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलची दबावात न खेळता मुक्तछंदी फटकेबाजीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने पाकचे आव्हान गाठले.
सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱया पाकिस्तानच्या फलंदाजांनी यावेळी नाहक फटकेबाजीच्या नादात स्वस्तात विकेट्स गमावल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये संयमाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेष म्हणजे, संपूर्ण संघ यावेळी झेलबाद झाला. पाकिस्तानची सलामीजोडी मोठे फटके मारण्याच्या घाईत स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर संयमी खेळी करून संघाला सावरण्याची जबाबदारी असतानाही कर्णधार मिसबाह गरज नसतानाही मोठा फटका मारून झेल देऊन बसला. पाठोपाठ हॅरिस सोहेल देखील ४१ धावांवर बाद तंबूत परतला. यानंतर उमर अकमलन, शाहिद आफ्रिदिने देखील आधीच्या फलंदाजांचाच कित्ता गिरवत सोपे झेल देऊन विकेट्स गमावल्या. आफ्रिदी बाद झाल्यानंतर संघाला उतरती कळा लागली आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला २१३ धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या तर, मिचेल स्टार्क आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा