फिरकीपटू ताहीर विजयाचा शिल्पकार * डय़ुमिनीची हॅट्ट्रिक
१९९२ ते २०११.. वर्ष, स्पर्धा आणि ठिकाण बदलत होते, पण कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे बाद फेरीतून माघारी जाणे परवलीचे झालेले.. यंदा समतोल आणि फॉर्मात असलेला संघ असूनही भाकिते त्यांच्या गाशा गुंडाळण्याचीच होती.. मात्र प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास आणि शिस्तबद्ध योजनांची मैदानावर अचूक अंमलबजावणी यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत अनेक वर्षांचे ‘चोकर्स’चे ओझे डोक्यावरून उतरवले.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र कौशल्याला मेहनतीची जोड देत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय आपल्यासाठी सार्थ ठरवला. लहिरू थिरिमानेच्या जागी सलामीवीर म्हणून आलेल्या कुशल परेराला कायले अॅबॉटने तिसऱ्याच षटकात बाद करत शानदार सुरुवात केली. पुढच्याच षटकात डेल स्टेनने धोकादायक दिलशानला बाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. थिरिमाने आणि कुमार संगकारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्रान ताहीरने थिरिमानेला बाद करत ही जोडी फोडली. चार सलग सामन्यांत चार शतके झळकावणारा कुमार संगकाराला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अक्षरश: निष्प्रभ केले. एका क्षणी संगकाराच्या नावावर ५१ चेंडूंत अवघ्या १५ धावा होत्या. अनुभवी महेला जयवर्धनेला डू प्लेसिसच्या हाती झेल द्यायला भाग पाडत ताहीरने श्रीलंकेला अडचणीत टाकले. पाचवा विशेषज्ञ गोलंदाज नसणे हा दक्षिण आफ्रिकेचा कच्चा दुवा होता. मात्र कामचलाऊ गोलंदाजी करणाऱ्या जे पी डय़ुमिनीने अँजेलो मॅथ्यूजला माघारी धाडले. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या थिसारा परेराला बाद करत ताहीरने श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. पुढच्याच षटकात न्यूवान कुलसेकरा आणि थरिंदू कौशलला बाद करत डय़ुमिनीने हॅट्ट्रिक पूर्ण केली. फटक्यांची अस्त्रे म्यान झालेल्या संगकाराला मॉर्ने मॉर्केलने बाद केले. संगकारा बाद होताच श्रीलंकेच्या सन्मानजनक धावसंख्या गाठण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. संगकाराने ९६ चेंडूंत ४५ धावा केल्या. श्रीलंकेचा डाव १३३ धावांतच आटोपला. ताहीरने ४, तर डय़ुमिनीने ३ बळी घेतले.
सोपे लक्ष्य मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेने आक्रमक सुरुवात केली. मात्र हशिम अमला १६ धावा करून तंबूत परतला. साखळी लढतीत खराब फॉर्मशी झगडणाऱ्या क्विंटन डी कॉकने ५७ चेंडूंत नाबाद ७८ धावांची दिमाखदार खेळी साकारत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ताहीरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवासह श्रीलंकेचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीची लढत ऑकलंड येथे होणार आहे.
धावफलक
श्रीलंका : कुशल परेरा झे. डी कॉक गो. अॅबॉट ३, तिलकरत्ने दिलशान झे. प्लेसिस गो. स्टेन ०, कुमार संगकारा झे. मिलर गो. मॉर्केल ४५, लहिरु थिरिमाने झे. आणि गो. ताहीर ४१, महेला जयवर्धने झे. प्लेसिस गो. ताहीर ४, अँजेलो मॅथ्यूज झे. प्लेसिस गो. डय़ुमिनी १९, थिसारा परेरा झे. रोसू गो. ताहीर ०, न्यूवान कुलसेकरा झे. डी कॉक गो. डय़ुमिनी १, थरिंदू कौशल पायचीत गो. डय़ुमिनी ०, दुश्मंत चमिरा नाबाद २, लसिथ मलिंगा झे. मिलर गो. ताहीर ३, अवांतर (बाइज ४, लेगबाइज २, वाइड ७, नोबॉल २) १५, एकूण : ३७.२ षटकांत सर्वबाद १३३
बादक्रम : १-३, २-४, ३-६९, ४-८१, ५-११४, ६-११५, ७-११६, ८-११६, ९-१२७, १०-१३३
गोलंदाजी : डेल स्टेन ७-२-१८-१, कायले अॅबॉट ६-१-२७-१,
मॉर्ने मॉर्केल ७-१-२७-१, जे पी डय़ुमिनी ९-१-१९-३,
इम्रान ताहीर ८.२-०-२६-४
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक नाबाद ७८, हशिम अमला झे. कुलसेकरा गो. मलिंगा १६, फॅफ डय़ू प्लेसिस नाबाद २१, अवांतर (लेगबाइज ४, वाइड १२, नोबॉल ३) १९,
एकूण : १८ षटकांत १ बाद १३४
बादक्रम : १-४०
गोलंदाजी : लसिथ मलिंगा ६-०-४३-१, तिलकरत्ने दिलशान २-०-१०-०, न्यूवान कुलसेकरा १-०-१३-०,
थरिंदू कौशल ६-०-२५-०,
दुश्मंत चमीरा २-०-२९-०,
थिसारा परेरा १-०-१०-०
सामनावीर : इम्रान ताहीर.
ओझे उतरले!
१९९२ ते २०११.. वर्ष, स्पर्धा आणि ठिकाण बदलत होते, पण कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे बाद फेरीतून माघारी जाणे परवलीचे झालेले..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2015 at 03:10 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score world cup 2015 sri lanka vs south africa