शुक्रवारी रात्रीपासून मेलबर्नमध्ये जोरदार तयारी सुरू झाली होती. लोकांचे लोंढे मोठय़ा प्रमाणावर शहराच्या सीबीडी (सेन्ट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, मुंबईच्या फोर्ट एरियाशी तुलना) क्षेत्राकडे रवाना होत होते. पालिका कर्मचारी जोरदार तयारी करत होते आणि बऱ्याच घाईतदेखील दिसत होते. कुणी तरी जिज्ञासू भारतीय क्रिकेट समर्थकाने सहज एका कर्मचाऱ्याला थांबवून विचारले, ‘‘अहो, मॅचची तयारी इतक्या लवकर सुरू केली काय?’’ कर्मचारी बावचळला आणि म्हणाला, ‘‘कोणती मॅच? कुठली मॅच? ही तयारी तर ‘व्हाइट नाइट’साठी चालू आहे. समर्थकाला उलगडेना, की ‘व्हाइट नाइट’ हा काय प्रकार होता आणि मॅचपेक्षा का महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्याने मग स्पष्टीकरण दिले की, ‘‘व्हाइट नाइट हे कला व संस्कृतीचे प्रदर्शन करणारे जागतिक पातळीवरील पर्व आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत चालणारा कार्यक्रम आहे. मेलबर्नमध्ये हा सोहळा गेल्या दोन वर्षांपासून यशस्वीरीत्या आयोजित केला जात आहे. यंदा आयोजनाचे हे तिसरे वर्ष असून कर्मचाऱ्याने समर्थकाला उत्साहाने सहभाग घेण्याचे आमंत्रण केले. समर्थक मूळचा भारतीय असल्याचे कर्मचाऱ्याने एव्हाना ओळखले होते आणि.. ‘देयर इज अ बॉलीवूड डान्स टू’, असे म्हणून सहभागी होण्याचे आमिष दिले. समर्थकाला कळेना, की भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट सामना सोडून कोण या साधारणशा पर्वात सहभागी होणार होतं? वाईट वाटत समर्थक म्हणाला, ‘‘मी काय जवळपास नव्वद हजार लोक या पर्वात सहभागी होणार नाहीत, कारण ते एमसीजीमध्ये मॅच बघायला जातील.’’ यावर कर्मचारी हसला आणि म्हणाला, ‘‘तुमच्या सामन्याला ९० हजार चाहते कुठून येणार आहेत, हे ठाऊक नाही, कारण आमच्या सोहळ्याला सुमारे पाच लाख चाहते येणार आहेत. हे ऐकून समर्थक स्तब्ध झाला, पाच लाख चाहते येणार कुठून?
समर्थक गोंधळून हसला व आपल्या मार्गी निघाला; पण कर्मचाऱ्याने केलेल्या त्या टीकेने त्याच्या मनात घर केले होते. शनिवार उजाडला आणि समर्थक रात्रीचे संभाषण विसरला होता. रविवार उजाडला आणि समर्थक उत्साहित हाऊस एमसीजीला रवाना झाला. गेटमधून आत जाताच भारतात असल्याची जाणीव झाली. स्टेडियम गच्च भरले होते. सुमारे ९० हजार प्रेक्षक हा सामना पाहायला आले होते. ऑस्ट्रेलियातही ‘टीम इंडिया’ला भरपूर पाठिंबा होता. भारतीय क्रिकेटवेडे चाहते जगभरातून मेलबर्नमध्ये रवाना झाले होते. जिकडे बघावे तिकडे निळी जर्सी घातलेले किंवा भारतीय तिरंगा फडकवताना दिसत होते. सामना सुरू व्हायच्या आधीपासून स्टेडियमवर फक्त जयघोष, शिटय़ा, टाळ्या आणि नारेबाजी ऐकू येत होती. नाणेफेक जिंकल्यावर अनेक प्रेक्षकांना भारत प्रथम गोलंदाजी करेल, असे वाटत होते. धोनीने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला व बऱ्याच दर्शकांना धडकी भरली. विश्वचषकात अद्याप आफ्रिकेचा भारताने कधीही पराभव केला नव्हता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यात भर तर घालणार नव्हता? ‘मौका, मौका’ची जाहिरात त्यांच्या डोळ्यांसमोर नक्कीच आली असावी. हे सगळे चालू असताना रोहित शर्मा धावचीत झाला व स्टेडियमवर शांतता पसरली. रहाणे आणि धवनने हळूहळू डाव सावरला; पण ३०-३५व्या षटकापर्यंत प्रेक्षकांना हर्षनाद करायला फरकही मिळाले नाही. धवनच्या शतकाने स्टेडियम परत जिवंत झाले आणि रहाणेच्या षटकाराने तर स्टेडियमवरील आवाजाला एका वेगळ्या स्तरावर नेले; पण त्याहीपेक्षा जास्त गोंगाट झाला, तो सचिन स्टेडियमवर उपस्थित असल्याचे स्क्रीनवर दाखवल्यावर.
शेवटच्या १० षटकांमध्ये त्यानंतर भारताचे एकेक फलंदाज तंबूत परतले. भारताचा डाव संपला आणि द. आफ्रिका संघ फलंदाजी करण्यासाठी मदानावर आला. त्यांच्या सुरुवातीने भारतीय समर्थक थंडावले होते. ३०० धावांचे लक्ष्य मेलबर्नच्या मदानावर अद्याप कुणी पिटाळून लावले नव्हते; पण द. आफ्रिकेची फलंदाजी उत्तम. त्यांचे पहिले सहा फलंदाज एकापेक्षा एक सरस. थोडय़ाच वेळात कोहलीने डी कॉकचा झेल टिपला व बँडबाजाला सुरुवात झाली. त्यानंतर समर्थकांनी वळून बघितले नाही आणि भारतीय संघाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. नियमित अंतरावर बळी घेत भारतीय खेळाडूंनी समर्थकांना साजरा करण्याचे कारण दिले व प्रत्येक वेळी आवाज वाढतच गेला, अधिकाअधिक झेंडे फडकायला लागले. माहोल आणखी उत्साहवर्धक होत गेला व भारताने विजय मिळवला. लोकांनी मदान डोक्यावर घेतले होते. आवाज ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. आपला समर्थक खूप खूश होता. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला होता.
यारा नदीच्या किनारी वसलेल्या या शहरातल्या लोकांनी आवाजाने मदान डोक्यावर घेतले होते, सामना ऑस्ट्रेलियात चालला आहे का भारतात हे कळू नये म्हणून!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcg in india
Show comments