‘‘चार महिन्यांपूर्वी फिलीप ह्य़ूज आम्हाला सोडून गेला. तो प्रसंग हादरवून टाकणारा होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी संलग्न प्रत्येकाला यातून सावरणे कठीण होते. विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ खेळतो. पण आमच्याकडे १६ खेळाडू होते. हा विजय, हे जेतेपद आमच्या त्या लहान भावाला समर्पित..!’’..  अशा शब्दांत भावुक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने ह्य़ूजला आदरांजली वाहिली.
नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातील स्थानिक सामन्यात उसळता चेंडू मानेवर आदळून फिलीप ह्य़ूजचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचा तीव्र धक्का ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बसला होता. एरव्ही बेडर वृत्तीचे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भावुक झालेले पाहायला मिळाले. ह्य़ूजला अंतिम निरोप देतानाही ऑस्ट्रेलियाचे सगळे आजीमाजी खेळाडू उपस्थित होते. ह्य़ुजच्या अकाली निधनामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकतील का यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र भावनांपेक्षा व्यावसायिकतेला प्राधान्य देणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने कसोटी आणि तिरंगी मालिकेसह विश्वविजेतेपदावर नाव कोरत आपल्या या दोस्ताला अनोखी आदरांजली वाहिली.
‘‘विजयाचा आनंद साजरा करण्यात ह्य़ुज आमच्यात आघाडीवर असायचा. आज विश्वविजेतेपदाचा जल्लोष करताना त्याची आठवण येईल,’’ असे क्लार्कने सांगितले. दंडावर बांधलेल्या आर्मबँडविषयी विचारले असता पाणावलेल्या डोळ्यांनी क्लार्क म्हणाला, ‘‘हा बँडही फिलिपसाठी आहे. त्यावर ‘पीएच’ असे लिहिले आहे. जेव्हा मी ऑस्ट्रेलियासाठी खेळेन तेव्हा हा आर्मबँड माझ्या दंडावर असेल.’’
‘‘एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करण्याची ही योग्य वेळ आहे. मात्र मी कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. विश्वविजेतेपद पटकावणे अभिमानास्पद आहे. आमच्या विजयात प्रशिक्षक आणि त्यांच्या सहयोगींचा सिंहाचा वाटा आहे,’’ असे क्लार्कने सांगितले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा