विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांनी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे, पण यानंतरही मिसबाह पाकिस्तानकडून कसोटी आणि आफ्रिदी ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळणार आहे.
४० वर्षीय मिसबाहने बरीच वर्षे संघाची सेवा केली, पण १६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही. २००१मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये कारकीर्दीला सुरुवात केली होती. मधल्या फळीत फलंदाजी करताना मिसबाहने ४२ अर्धशतके लगावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४३.४० च्या सरासरीने ५१२२ धावा केल्या आहेत. कारकीर्दीच्या अखेरच्या म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये त्याला ३४ धावाच करता आल्या.
आफ्रिदीने तडफदार सलामीवीर म्हणून कारकीर्दीची दणक्यात सुरुवात केली. १९९६ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. तडफदार फलंदाजीबरोबरच आफ्रिदीने पाकिस्तानसाठी उपयुक्त ‘लेग स्पिन’ गोलंदाजीही केली. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर त्याने बऱ्याच फलंदाजांना चकित केले होते. आतापर्यंत ३९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये आफ्रिदीने ८०६४ धावा केल्या असून ३९५ बळी मिळवले आहेत. २०११ च्या विश्वचषकात आफ्रिदीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते, तेव्हा पाकिस्तानने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मोहालीला झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते.wc03