भारतीय संघाला विश्वविजेतेपदावर कब्जा करायचा असेल तर सलामीवीर रोहित शर्माला सूर गवसणे आवश्यक आहे. रोहित सातत्याने धावा करत आहे, मात्र मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले आहे. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीला याबाबत काळजी वाटत नाही. रोहित किती धावा करतोय, यापेक्षा तो कशा पद्धतीने धावा करतोय, हे पाहणे आवश्यक असल्याचे मत धोनीने व्यक्त केले.
रोहितने प्राथमिक फेरीतल्या सहा लढतींमध्ये मिळून ३१.८च्या सरासरीने १५९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके नावावर असणाऱ्या रोहितला विश्वचषकात अद्याप तरी शतकी खेळी साकारता आलेली नाही. मात्र तरीही धोनीला रोहितच्या फॉर्मची चिंता वाटत नाही.
धोनी म्हणाला, ‘‘साखळी फेरीत आम्ही धावांचा पाठलाग अनेकदा केला आहे. प्रतिस्पर्धी संघाने कमी धावा केल्या होत्या. त्यामुळे सलामीवीरांकडून प्रत्येक वेळी धावांची अपेक्षा करता येणार नाही. अनेकदा लक्ष्य झटपट गाठायचे असल्याने आक्रमक खेळावे लागते. या प्रयत्नात फलंदाज बाद होतो.’’
‘‘धावा किती केल्या, यापेक्षा त्या कशा पद्धतीने आणि कोणत्या परिस्थितीत केल्या आहेत, ते पाहणेही आवश्यक आहे. रोहितने आतापर्यंत चांगला खेळ केला आहे. त्याची फटक्यांची निवडही सुरेख आहे. धावांसाठी झगडणारा खेळाडू अचानक मोठी खेळी करू शकतो. रोहित धावा करतो आहे. खेळपट्टीवर स्थिरावणे आवश्यक असते. तेही त्याने केले आहे. भारतीय संघाचा तो अविभाज्य घटक असून मोठी खेळी साकारल्यास संघासाठी उपयुक्तच असेल,’’ असे धोनीने सांगितले.

Story img Loader