कधी कधी विचित्र योगायोग समोर येतात, मग तो विजय असो किंवा पराभव. तसे म्हटल्यास त्या योगायोगाला काहीही सूत्रबद्धता (लॉजिक) नसते, पण तरीही त्या गोष्टींच्या मुंग्या डोक्यात कायमस्वरूपी वारूळ करून घर करतात. दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स ठरली, डकवर्थ-लुइस नियमांनी पुन्हा त्यांचा घात केला, हे योगायोग एका बाजूला आणि ते व्यावसायिक संघासारखे खेळले नाहीत, हेदेखील तेवढेच खरे. कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सला डेल स्टेनसारखा हुकमी एक्का साथ देत नसेल, तर त्याने तरी काय करावे. जिथे आपले मुख्य अस्त्रच बोथट ठरते, तिथे तुमची मान अभिमानासाठी उंचावूच शकत नाही आणि हेच डी’व्हिलियर्सच्या बाबतीत झाले. पण हा एक सामना म्हणून पाहिला तर उपांत्य फेरीसारखाच अटीतटीचा झाला आणि प्रेक्षकांना एक लज्जतदार मेजवानी मिळाली. कारण सुरुवातीपासूनच हा सामना आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत राहिला तो अगदी अखेरच्या षटकापर्यंत.
हशिम अमला हा कुठल्याही खेळपट्टीवर धावांचा रतीब घालू शकतो. क्विंटन डी कॉककडे अनुभव जास्त नसला तरी त्यानेही आपली छाप पाडलेली आहेच. पण उपांत्य फेरीच्या सामन्यात या दोघांनाही जास्त धावा करता आल्या नाहीत. अमलाकडून असलेल्या अपेक्षांचा फुगवलेला फुगा झटक्यात फुटला. २ बाद ३१ अशी अवस्था असताना सामना न्यूझीलंडकडे झुकत होता, पण फॅफ डू प्लेसिस, डी’व्हिलियर्स आणि डेव्हिड मिलर यांनी सामना आपल्या बाजूने फिरवला. फॅफने संघासाठी खेळपट्टीवर नांगर टाकला, डी’व्हिलियर्सने परिस्थिती सुधारल्याचे पाहत फटकेबाजी सुरू केली, तर अखेरच्या षटकांमध्ये मिलरने धुँवाधार फलंदाजीचा वस्तुपाठ दाखवून दिला. ही फटकेबाजी होत असताना न्यूझीलंडचे ‘ते’ भेदक गोलंदाज बोथट वाटात होते. ३८व्या षटकानंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा सामना तसा दोलायमान होता. पावसामुळे चेंडू हातातून निसटत होते, पण खेळपट्टीवर त्याचा परिणाम जाणवला नव्हता. चेंडू बॅटवर थेट येत असल्याचा फायदा एकिकडे मिलर घेत असला, तरी दुसऱ्या टोकाकडून धडाकेबाज डी’ व्हिलियर्स मात्र तसा शांतच होता. तसाच शांत गोलंदाजांना मार पडत असताना न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमही होता. कारण या छोटय़ा मैदानात आपण कोणतेही आव्हान ओलांडू शकतो, याचा विश्वास त्याला होता.
आफ्रिकेच्या आव्हानाचा स्टेन बचाव करेल, असे साऱ्यांनाच वाटत होते. पण त्याच्या तिसऱ्याच षटकात जेव्हा मॅक्क्युलमने २५ धावा काढल्या तिथे डी’व्हिलियर्सने डोक्यावर हात मारला. स्टेनची गोलंदाजी बंद करावी लागली. सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. पण त्यानंतरच्याच षटकात मॅक्क्युलम बाद झाला, काही फरकाने केन विल्यमसन. दोन खंदे, सातत्यपूर्ण फलंदाजी करणारे फलंदाज धारातीर्थी पडले. गेल्या सामन्यात द्विशतक झळकावणारा गप्तील बाद झाल्यावर सामना पुन्हा आफ्रिकेच्या बाजूने झुकला. ४ बाद १४९वरून हा सामना न्यूझीलंड जिंकेल असे वाटत नव्हते. पण मुख्य पाच गोलंदाज नसल्याचा फटका यावेळी आफ्रिकेला बसला. डय़ुमिनी आणि डी’व्हिलियर्स यांच्या ८ षटकांमध्ये न्यूझीलंडने ६४ धावा लुटल्या आणि आफ्रिकेच्या हातून सामना पुन्हा निसटला. कोरे अँडरसन आणि ग्रँट एलियट यांनी सामना न्यूझीलंडच्या बाजूला झुकवला होता, पण त्यांनाही कामगिरीत सातत्य राखता आले नाही. अँडरसनपाठोपाठ ल्यूक राँकी बाद झाल्यावर सामना पुन्हा दोलायमान अवस्थेत होता. आता हा सामना कोण जिंकेल, याची शाश्वती देता येत नव्हती. यामध्येच व्यावसायिक समजल्या जाणाऱ्या आफ्रिकेने पराभव ओढवून घेतला. डी कॉकने एलियटला धावबाद न करता जीवदान दिले. चेंडू हातात आहे की नाही हे न पाहता त्याने यष्टय़ा उखडल्या. ही पहिली घोडचूक. दुसरी सुवर्णसंधी त्यांनी एलियटचा झेल सोडून गमावली. बेहरादीनला शक्य असलेला झेल घेण्यासाठी डय़ुमिनीनेसुद्धा आततायीपणा केला. दोघांमध्येही समन्वय नसल्याने हा झेल सुटलाच. अखेरच्या षटकात ‘स्टेनगन’सारखा धडधडून फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या डेलने धावा द्याव्यात, याला काय म्हणावे. डी’व्हिलियर्सची अवस्था रडणाऱ्या माशासारखी झाली असणार.
एकंदरीत सामना उत्कंठावर्धक झाला. चाहत्यांनी चांगलाच आनंद लुटला. पण हा विजय न्यूझीलंडचा कमी असून दक्षिण आफ्रिकेचा पराभवच जास्त आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रसाद लाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा