ब्रेंडन मॅक्क्युलम आणि केन विल्यम्सनसारख्या धडाकेबाज फलंदाजांना एकाच षटकात तंबूत धाडून शाकिब अल हसनने बांगलादेशच्या विजयाच्या आशा प्रज्वलित केल्या. परंतु सलामीवीर मार्टिन गप्तिलने कोणताही आततायीपणा न करता संयमाने न्यूझीलंडच्या विजयाची पायाभरणी केली. न्यूझीलंडने ‘अ’ गटातील अखेरची रोमहर्षक लढत तीन विकेट राखून जिंकली. त्यामुळे साखळीतील सहापैकी सहा लढती जिंकत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत ‘किवीभरारी’ घेतली. हा सामना जर किवी संघाने गमावला असता तर उपांत्यपूर्व फेरीत भारताविरुद्ध बांगलादेशऐवजी श्रीलंकेचा संघ समोर आला असता. त्यामुळे भारतीय संघाचेसुद्धा धाबे दणाणले होते.
बांगलादेशचे २८९ धावांचे आव्हान स्वीकारताना सुरुवातीला न्यूझीलंडचे स्फोटक फलंदाज मॅक्क्युलम (८) आणि केन विल्यम्सन (१) लवकर तंबूत परतले. त्यामुळे ५ षटकांत त्यांची २ बाद ३३ अशी बिकट अवस्था झाली. परंतु गप्तिल आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि संघाला स्थर्य मिळाले. गप्तिलने १०० चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची शानदार खेळी साकारली. तर टेलरने ९७ चेंडूंत ५ चौकारांसह सावधपणे ५६ धावा केल्या. गप्तिलचा अडसर शाकिबनेच दूर केल्यानंतर ग्रँट एलियट आणि कोरे अँडरसन यांनी प्रत्येकी ३९ धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात न्यूझीलंडचा डाव थोडा गडगडल्यानं पुन्हा सामना वाचवण्यासाठी झुंज करावी लागली. परंतु आठव्या क्रमांकावरील फलंदाज डॅनियल व्हेटोरीने (१६) फक्त १० चेंडूंतील आपल्या छोटेखानी खेळीत षटकार आणि चौकारांची अदाकारी पेश केली. त्याला टिम साऊदीनेही तशीच साथ दिली. त्यामुळे ७ चेंडू शिल्लक असताना न्यूझीलंडला बांगलादेशचे लक्ष्य पार करता आले.
त्याआधी, महमुदुल्लाने विश्वचषकात सलग दुसरे शतक झळकावण्याचा पराक्रम दाखवला. आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च अशी नाबाद १२८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे बांगलादेशला ७ बाद २८८ धावा उभारता आल्या.
‘अ’ गटाची स्थिती आज स्पष्ट होणार
न्यूझीलंडने सर्वाधिक १२ गुणांसह सहापैकी सहा सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ‘अ’ गटात त्यापाठोपाठ श्रीलंका (८), ऑस्ट्रेलिया (७) आणि बांगलादेश (७) हे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. परंतु ‘अ’ गटाची अंतिम स्थिती ही शनिवारी होबार्टला होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड लढतीनंतर स्पष्ट होऊ शकेल. ऑस्ट्रेलियाचा संघ स्कॉटलंडला सहज हरवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकेल, तर श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर जाईल. परंतु दुबळ्या स्कॉटलंड संघाने जर मोठय़ा फरकाने चार वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधली, तर मात्र गटातील संघांची स्थिती बदलू शकेल.
विश्वचषक असो किंवा अन्य एकदिवसीय लढत, मला शतक करायला आवडत़े मात्र त्या शतकावर विजयाची मोहर उमटल्यास हा आनंद द्विगुणित होतो़ हा सामना अटीतटीचा झाला़ बांगलादेशने कडवी झुंज दिली, परंतु अखेरीच बाजी आम्हीच मारली़ हा सामना संघाची परीक्षा पाहणारा ठरला़
– मार्टीन गप्तील, न्यूझीलंडचा फलंदाज
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ५० षटकांत ७ बाद २८८
(महमुदुल्ला नाबाद १२८, सौम्या
सरकार ५१; कोरे अँडरसन २/४३) पराभूत वि.
न्यूझिलंड : ४८.५ षटकांत ७ बाद २९० (मार्टिन
गुप्तिल १०५, रॉस टेलर ५६; शाकिब अल् हसन ४/५५)
सामनावीर : मार्टिन गप्तिल.
मार्टीन गप्तील
१०५ धावा
१०० चेंडू
११ चौकार
२ षटकार
२ फलंदाजांनी बांगलादेशकडून दोन सलग एकदिवसीय शतके झळकावली आहेत. शहरियार नाफीजने २००६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध दोन सलग शतके नोंदवली होती. त्यानंतर महमुदुल्लाने विश्वचषकात दोन शतके साकारली.
३ सामन्यांत महमुदुल्लाने ५०हून अधिक धावा काढल्या. त्याने स्कॉटलंडविरुद्ध ६२, इंग्लंडविरुद्ध १०३ आणि न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १२८ धावा केल्या.
२४ डावांनंतर केन विल्यम्सनला दुहेरी आकडी धावा काढण्यात अपयश आले. डिसेंबर २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो अखेरचा एकेरी आकडय़ात बाद झाला होता.
अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ४९६ धावा
२. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४१७ धावा
३. तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) ३९५ धावा
अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) १५ बळी
२. जोश डॅव्हे (स्कॉटलंड) १४ बळी
३. डॅनियल व्हेटोरी, टिम साऊदी, मॉर्ने मॉर्केल १३ बळी