सराव सामन्यात झिम्बाब्वेकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने यातून कोणताही धडा घेतला नाही. मागील विश्वचषकात उपविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या श्रीलंकेचा रुबाब सलामीच्याच सामन्यात जमीनदोस्त झाला. यजमान न्यूझीलंडने दिमाखात विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ केला. कोरे अँडरसनच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर ‘अ’ गटात किवींनी लंकेवर ९८ धावांनी विजय मिळवला.
सकाळी पावसामुळे सामना आठ मिनिटे उशिरा सुरू झाला. त्यामुळे श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु तो त्याच्या अंगलट आला. न्यूझीलंडने कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम (६५) आणि मग कोरे अँडरसन (७५) यांनी अपेक्षेप्रमाणेच मायदेशातील खेळपट्टय़ांची नस अचूक ओळखत चौफेर फटकेबाजी केली. केन विल्यमसनने ५७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळेच न्यूझीलंडला ६ बाद ३३१ धावांचे आव्हान उभारता आले. फिरकी गोलंदाज जीवन मेंडिसने दोन षटकांत ५ धावांत २ बळी घेतले. २२व्या षटकानंतर थेट ३४वे षटक टाकल्यानंतर मेंडिसने अँडरसन आणि रॉस टेलर या महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. परंतु तरीही त्याला तिसरे षटक का देण्यात आले नाही, हे मात्र कळू शकले नाही.
अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरीने तिलकरत्ने दिलशानला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करून न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. दिलशान (२४), कुमार संगकारा (३९) आणि महेला जयवर्धने (०) हे तीन हुकमी मोहरे लवकर बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा डाव ४६.१ षटकांत २३३ धावांत आटोपला. सलामीवीर लाहिरू थिरिमाने (६० चेंडूंत ६५ धावा) या एकमेव फलंदाजाला हॅगले ओव्हलच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला. मॅथ्यूजने ४६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ५० षटकांत ६ बाद ३३१ (कोरे अँडरसन ७५, ब्रेंडन मॅक्क्युलम ६५, केन विल्यमसन ५७; जीवन मेंडिस २/५, सुरंगा लकमल २/६२) विजयी वि. श्रीलंका : ४६.१ षटकांत सर्व बाद २३३ (लाहिरू थिरिमाने ६५, अँजेलो मॅथ्यूज ४६; कोरे अँडरसन २/१८, डॅनियल व्हेटोरी २/४३)
सामनावीर : कोरे अँडरसन.
श्रीलंकेसारख्या अव्वल संघाला नमवणे समाधानकारक असते. सुरेख सांघिक कामगिरीचे हे यश आहे. दमदार सलामीसाठी आम्ही प्रदीर्घ काळापासून योजना आखल्या होत्या. फलंदाजांनी केलेल्या पायाभरणीवर गोलंदाजांनी कळस चढवला
-ब्रेंडन मॅक्क्युलम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगकाराने पाँटिंगला मागे टाकले
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावांच्या पंक्तीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराने दुसऱ्या स्थानाला गवसणी घातली आहे. कुमार संगकाराने ख्राइस्टचर्च येथील आपल्या ३९ धावांच्या खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकले. पाँटिंगच्या खात्यावर १३,७०४ धावा जमा होत्या. आता संगकाराच्या खात्यावर १३,७३२ धावांची पुंजी जमा आहे.

संगकाराने पाँटिंगला मागे टाकले
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावांच्या पंक्तीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराने दुसऱ्या स्थानाला गवसणी घातली आहे. कुमार संगकाराने ख्राइस्टचर्च येथील आपल्या ३९ धावांच्या खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकले. पाँटिंगच्या खात्यावर १३,७०४ धावा जमा होत्या. आता संगकाराच्या खात्यावर १३,७३२ धावांची पुंजी जमा आहे.