इंग्लंड येथे २०१९ साली होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत १४ संघांऐवजी फक्त १० संघांचा समावेश करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले. मात्र आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत १६ संघांचा समावेश करण्याचाही या बैठकीत विचार केला जाणार आहे.
आयसीसीच्या कार्यकारिणी मंडळाची सोमवारी आढावा बैठक होणार आहे. या बठकीमध्ये १४ संघांची संख्या १० पर्यंत कमी करण्याबाबत चर्चा होणार आहे. सात आठवडे चालणाऱ्या या लांबलचक कार्यक्रमावर त्यामुळे मर्यादा येऊ शकेल, अशी चर्चा आहे.
‘‘दर्जेदार संघांमध्ये चुरशीचे सामने व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे. जर दहा संघांचा विश्वचषक झाल्यास चांगले सामने क्रिकेटरसिकांना पाहायला मिळतील,’’ असे रिचर्डसन यांनी सांगितले.