कोंडवाडय़ात १५-२० दिवस डांबलेल्या जनावरांना मोकळे सोडल्यानंतर त्यांची काय काय खाऊ आणि काय नको, अशी अवस्था होत असते. तद्वत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची अवस्था होत असते. पाकिस्तानचे खेळाडू देशाबाहेर खेळावयास गेल्यानंतर मैदानावरील मर्दुमकीपेक्षाही मैदानाबाहेरील ‘कर्तृत्व’ अधिक गाजत असते. कधी प्रशिक्षकांबरोबर भांडणे तर कधी बेशिस्त वर्तन यामुळे त्यांचे खेळाडू सतत चर्चेत असतात.
क्रिकेट म्हणजे अफाट पैसा मिळविण्याचे उत्तम साधन असले तरीही पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंना अपेक्षेइतकी कमाई तेथे होत नसते. तसेच त्यांच्यावर अनेक बंधनेही घातलेली असतात. त्यामुळेच जेव्हा जेव्हा परदेशात खेळण्याची संधी त्यांना मिळत असते, त्या त्या वेळी घृणास्पद वर्तने त्यांच्याकडून केली जात असतात. सर्व बंधने झुगारून ते वावरत असतात. त्याचप्रमाणे झटपट मार्गाने पैसा कसा मिळेल याकडे त्यांचे लक्ष असते. मग देशनिष्ठेलाही विकायला ते कमी करीत नाहीत असाच अनुभव पाहावयास मिळाला आहे. मॅच-फिक्सिंग, स्पॉट-फिक्सिंगपासून प्रशिक्षकाच्या हत्येपर्यंत अनेक गुन्ह्य़ांमध्ये त्यांचे खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडतात. थोडी फार झालेली शिक्षा भोगून आल्यानंतर ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणेच पुन:पुन्हा तशीच कृत्ये ते करीत असतात.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे तत्त्व पाकिस्तानच्या खेळाडूंनी देशाच्या वेशीवर टांगले असावे. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू सकलेन मुश्ताकने १९९९मध्ये केलेल्या बेशिस्त वर्तनाची कबुली अलीकडेच दिली आहे. उपांत्य फेरीच्या वेळी खेळाडूंनी आपल्या मैत्रिणी किंवा पत्नीला आपल्याबरोबर आणू नये, अशी बंधने त्यांच्या क्रिकेट मंडळाने घातली असतानाही सकलेनने १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या पत्नीला सोबत आणले होते. जेव्हा संघाचे व्यवस्थापक किंवा प्रशिक्षक त्याच्या खोलीत येत असत, तेव्हा तो पत्नीला कपाटात लपवून ठेवत असे. सकलेनच्या सहकारी खेळाडूंना ही गोष्ट माहीत होती, मात्र ‘उंदराला मांजर साक्षी’ या म्हणीप्रमाणे ते सकलेनच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करीत असत.
वेस्ट इंडिजमध्ये २००७च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणून बॉब वूल्मर हे कार्यरत होते. स्पर्धेतील पहिल्या फेरीतच पाकिस्तानला आर्यलडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला व या पराभवामुळे त्यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते. जमैका येथे झालेल्या या सामन्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या खेळाडूंचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील खोलीत वूल्मर यांचा मृतदेह आढळला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणास्तव न होता त्यांना झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचे पोलिसांनी कारण नमूद केले होते. सोयीस्कररीत्या हे प्रकरण मग गुंडाळण्यात आले.
पाकिस्तानचे खेळाडू यंदाही बेशिस्त वर्तनाबद्दल चर्चेत आहेत. भारताविरुद्धचा सामना होण्यापूर्वी शाहिद आफ्रिदी व अन्य सात खेळाडू अॅडलेड येथे त्यांच्या मित्राकडे मेजवानी झोडायला गेले होते. मेजवानीहून हॉटेलवर परत येण्यास त्यांना खूप उशीर झाला होता. त्याबद्दल संघव्यवस्थापनाने त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. पाकिस्तानचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक व ट्रेनर ग्रँट लुडेन यांनी भारताबरोबरचा सामना संपल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आफ्रिदी, अहमद शेहजाद व उमर अकमल आदी खेळाडूंनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. खेळाडू आपले ऐकत नाहीत, अशीही तक्रार लुडेन यांनी केली.
भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानच्या खेळाडूंना खूप जिव्हारी लागला. संघातील काही खेळाडूंनी या पराभवाला संघाचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस जबाबदार असल्याचे जाहीर आरोपही केले. संघातील खेळाडूंमध्ये वरिष्ठ व युवा खेळाडू असे दोन गट निर्माण झाले आहेत, हे देखील अनेक वेळा दिसून आले आहे. कर्णधार मिसबाह-उल-हक याच्या चेहऱ्यावर त्याचे प्रतििबब अनेक वेळा पडले आहे. खेळाडूंप्रमाणेच पाकिस्तानचे निवड समिती सदस्यही सतत चर्चेत असतात. त्यांच्या निवड समितीचे मुख्य मोईन खान हे वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर न्यूझीलंडमधील एका कॅसिनोत गेले होते. कॅसिनोत जाणे, हा काही गुन्हा नाही, मात्र भारताविरुद्धच्या पराभवाची बोच त्यांना झालेली नाही, हेच जणू काही त्यांच्या वर्तनात दिसून आले. एकूणच पाकिस्तानचे खेळाडू व अन्य पदाधिकारी मैदानाबाहेर मर्दुमकी गाजविण्यात पटाईत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
मैदानाबाहेरच पाकिस्तानची मर्दुमकी!
कोंडवाडय़ात १५-२० दिवस डांबलेल्या जनावरांना मोकळे सोडल्यानंतर त्यांची काय काय खाऊ आणि काय नको, अशी अवस्था होत असते.
First published on: 28-02-2015 at 04:43 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan out of ground