मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदार संघात नवखा असतानाचा हा किस्सा. त्यावेळी मुंबई रणजीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधाराने एक बैठक बोलावली. त्यामध्ये त्या कर्णधाराने तासभर भाषण केले आणि त्या भाषणानंतर संघामध्ये असे काही चैतन्य संचारले की, थेट मैदानात उतरायचे आणि प्रतिस्पध्र्याची दाणादाण उडवायची, असे वाटू लागले. त्या भाषणामध्ये एवढी प्रेरणा आणि जोश होता की, संघातील प्रत्येक खेळाडूच्या अंगात जिंकण्याची ईर्षां संचारली. आता हा सामना आपलाच, तो काहीही करून आपण जिंकणारच; पण रात्र असल्यामुळे खेळाडूंना मैदानात उतरणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी संघ मैदानात उतरला आणि मुंबईने रणजी करंडक जिंकला. संघासाठी प्रेरणास्रोत ठरलेले मुंबईचे कर्णधार होते रवी शास्त्री. तिरंगी स्पध्रेतील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ आता ज्या अफलातून पद्धतीने खेळतोय, त्यामागचे महत्त्वपूर्ण रहस्य म्हणजे संघाचे संचालक आणि दिग्दर्शक शास्त्रीच.
भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर संघासाठी एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे कार्यरत होते. संघातील खेळाडूंना ओळखायलाच त्यांना दोन वर्षे लागली. भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून त्यांना नियुक्त करण्याचा अनाकलनीय निर्णय बीसीसीआयने घेतला; पण प्रशिक्षक म्हटल्यावर त्यांचे ऐकावे तर लागणारच. संघ आणि प्रशिक्षकामध्ये समन्वय नसल्याने एकामागून एक पराभव पदरी पडायला सुरुवात झाली. विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला तरी पराभवाचीच मालिका सुरू होती. त्या वेळी बीसीसीआयने विश्वचषक नजरेसमोर ठेवत सर्वात महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ते म्हणजे शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी नेमण्याचे. शास्त्री यांनीही विश्वचषकासाठी काही रणनीती आखली आणि ती यशस्वी ठरताना दिसत आहे. दिलेले काम चोख बजावयाचे, खेळाडूंना एकत्रित आणायचे, त्यांना समजून घ्यायचे, समजावयाचे, त्यांचे आधारवड व्हायचे, त्यामध्ये कोणताही सोज्वळपणाचा आव वगैरे नाही. या वयात जसा मुलगा वडिलांचा चांगला मित्र व्हायला हवा, तशीच वडिलांची भूमिका सध्या शास्त्री वठवताना दिसतात. खेळाडूकडे एकदा जबाबदारी सोपवल्यावर मग काहीही घडो, पण माझा विश्वास खेळाडूवर कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका ते घेताना दिसतात. नाही तर भारताकडून सर्वाधिक धावा करणारा शिखर धवन आणि जवळपास सर्वच गोलंदाज या विश्वचषकात खेळण्यायोग्य नाहीत, त्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवा, अशी ओरड सुरू झालीच होती; पण शास्त्रींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
धवनचे विश्वचषकात पहिले शतक झाले तेव्हा शास्त्रींची मुलाखत ऐकण्यासारखी होती. ते त्या वेळी म्हणाले की, ‘‘ज्यांना धवनची फलंदाजी समजली नाही त्यांना क्रिकेट कळतच नाही. त्याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे, हे मला माहीत होते. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आता सारे काही तुमच्यासमोर आहे.’’ मुलगा यशस्वी ठरल्यावर कोणाला सुनवायला जसा एखादा बाप मागेपुढे पाहत नाही, तसेच शास्त्री; पण त्यासाठी शास्त्रींनी अथक मेहनत घेतली हेसुद्धा विसरून चालणार नाही. धवनला काही काळ शिकवणी देत त्यांनी त्याच्या खेळामध्ये मोठा बदल घडवला. त्याचे पाय फलंदाजी करताना हलायचे नाहीत, आता या बदलामुळे त्याच्या धावा वाढल्या आहेत. विश्वचषकापूर्वी धोनीचाही आत्मविश्वास काहीसा कमी दिसत होता. त्याला मोठे फटके मारता येत नव्हते. धोनी शास्त्रींकडे गेला आणि त्याच्या दोन चांगल्या खेळी आपण साऱ्यांनी पाहिल्या.
शास्त्रींची एकंदरीत पद्धत निराळी आहे. संघाच्या बैठकीमध्ये ते बोलत नाहीत. तिथे फ्लेचर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण मार्गदर्शन करतात. मैदानातही ते खेळाडूंना काही मार्गदर्शन करताना दिसत नाहीत; पण प्रत्येक खेळाडूला ते शिकवणी देतात. त्याचे अवगुण दूर सारून त्याच्यामधील गुणवत्ता त्याला पुन्हा नव्याने समजावतात, आत्मविश्वास देतात. विश्वचषकाच्या पूर्वी त्यांनी खेळाडूंना एवढेच सांगितले की, हा एक मोठा सोहळा आहे, त्यामुळे त्याचे दडपण घेऊ नका. या सोहळ्याचा आनंद कसा घेता येईल ते मात्र पाहा. नकारात्मकपणा शास्त्रींना शिवतही नाही आणि ज्यांच्याकडे तो आहे त्यांना धारेवर धरायलाही ते कमी करत नाहीत. ‘पॉवर-प्ले’च्या नवीन नियमांचे त्यांच्यावर दडपण नाही. जर तुम्ही चांगले क्रिकेट खेळताय तर किती खेळाडू वर्तुळाच्या बाहेर आहेत, त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही, असे ते बोलून दाखवतात. कोणताही संघ समोर आला की चांगला खेळ करत त्यांना पराभूत करायचे, हे त्यांचे ब्रीदवाक्य. त्यामुळे आपण आफ्रिकेला सहज पराभूत करू शकलो आणि आता विश्वचषक दोन पावलांवर येऊन ठेपला आहे. चांगलं खेळायला हवे. जिंकणे-हरणे हा खेळाचाच भाग, असं सांगतानाच बेधडकपणे विश्वचषकापूर्वी तिरंगी स्पध्रेची काहीच गरज नव्हती, हेदेखील बोलून दाखवतात.
प्रत्येक समूहाला एका नेत्याची गरज असते; पण त्या नेत्यालाही समजवायला, चूक-बरोबर सांगायला, पुढची दिशा ठरवायला एक महागुरू नक्कीच लागतो, शास्त्री तेच भारतीय संघासाठी करीत आहेत. फ्लेचर यांची भूमिका ते निभावत आहेत. शास्त्री यांच्या काही महिन्यांच्या काळात संघाची कामगिरी बहरताना दिसते. युद्ध जसे मानसिकतेच्या जोरावर जिंकता येत असते, तसा सामनाही. आता भारताबाबत ‘दुख भरे दिन बिते रे भैया’ असं म्हटले जात आहे. आपण विश्वचषक जिंकण्याच्या फार जवळ आलो आहोत. पण ही स्वप्ने ज्याने दाखवली, त्या शास्त्रींना विसरून कसे चालेल?
महागुरू
मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदार संघात नवखा असतानाचा हा किस्सा. त्यावेळी मुंबई रणजीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.
First published on: 22-03-2015 at 05:59 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri mahaguru of team india