ख्रिस्टोफर हेन्री ‘ख्रिस’ गेल.. हे नाव आहे वेस्ट इंडिजच्या तुफानाचं. गॅरी सोबर्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, ब्रायन लारानंतर कॅरेबियन क्रिकेटचा वारसा तो समर्थपणे चालवतो आहे. एरव्ही शांत, संयमी असलेलं हे उंच व्यक्तिमत्त्व मैदानावर असलं की क्षेत्ररक्षकांचे बुरुज ढासळतात, गोलंदाजाची हुकमी अस्त्रे निष्प्रभ ठरतात, सीमारेषा थिटय़ा पडतात. एकेरी-दुहेरी धावा काढण्यात त्याला मुळीच रस नाही. अत्यंत आरामाने चेंडूला दूरवर भिरकावण्याचा त्याला नाद. शैलीदारपणा त्याच्या फलंदाजीत नाही, तसा व्यक्तिमत्त्वातही नाही. त्याची फलंदाजी आणि स्वभाव सारंच मुक्त छंदातलं. आनंद, जल्लोष हे मनसोक्त साजरा करण्याची कॅरेबियन विचारप्रणाली त्याच्या नसानसांत भिनलेली. त्यामुळेच वैयक्तिक किंवा सांघिक यशाच्या सर्वोच्च क्षणी त्यानं साकारलेलं ‘गंगम’ नृत्य डोळ्यांचं पारणे फेडतं. १६ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द असलेल्या गेलची हीच शैली वेस्ट इंडिजच्या अनेक क्रिकेटपटूंमध्ये दिसून येते. पण एके काळी जागतिक क्रिकेटचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वर्चस्व असणाऱ्या कॅरेबियन क्रिकेटची रया आता हरपली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि क्रिकेटपटू यांच्यातील वाद विकोपाला गेल्याची नित्य नवी प्रकरणं समोर येत आहेत. यात सर्वात अग्रेसर आहे तो गेल. त्यामुळेच ‘गेलफोर्स’, ‘गेलस्टॉर्म’ आणि ‘मास्टर स्टॉर्म’ या टोपणनावाप्रमाणेच ‘बंडखोर’ ही आणखी एक ओळख त्याला दिली.
२००५ मध्ये गेलसहित काही क्रिकेटपटूंचा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी पुरस्कर्त्यांबाबतचा वाद ऐरणीवर होता. या खेळाडूंचे केबल अॅण्ड वायरलेस कंपनीशी पुरस्काराचे स्वतंत्र करार होते, जे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचेही पुरस्कर्ते होते. परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी डिजिसेलशी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने नवा करार केल्यामुळे खेळाडूंना केबल अॅण्ड वायरलेसशी असलेले वैयक्तिक करार मोडीत काढण्याचे फर्मान काढण्यात आले. परंतु खेळाडूंनी या फर्मानाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी गेलसह या वादग्रस्त क्रिकेटपटूंना वगळण्यात आले. नंतर गेलने विंडीज मंडळाच्या धोरणापुढे शरणागती पत्करली आणि केबल-वायरलेसशी असलेला करार संपुष्टात आणला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले.
त्यानंतर मार्च २००६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत गेल वादाच्या भोवऱ्यात सापडला. वेगवान गोलंदाज शेन बॉण्डच्या चेंडूला तटवल्यानंतर क्षेत्ररक्षकाने अपील केले आणि त्याला उद्देशून केलेल्या कृत्यामुळे गेलवर क्रिकेट भावनांचा अनादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबतच्या सुनावणीत गेलनं आपली बाजू समर्थपणे मांडली आणि सामनाधिकाऱ्यांनी त्याला निर्दोष ठरवलं. याच वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल क्लार्कशी झालेली बाचाबाची त्याला महागात पडली. त्याला आर्थिक दंड ठोठावण्यात आला. मग २००७च्या इंग्लंड दौऱ्यावर गेलनं वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर प्रसारमाध्यमांच्या साक्षीनं बेधडकपणे टीका केली. त्या वेळी विंडीज मंडळाने त्याला ताकीद दिली.
जागतिक क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा गेल शांत राहणाऱ्यातला मुळीच नव्हता. वेस्ट इंडिजचा संघ २००९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना गेल पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी होता. ‘‘वेस्ट इंडिज संघाचं कर्णधारपद म्हणजे खूप साऱ्या दडपणाचं ओझं सांभाळायचं असतं!’’ या गेलच्या प्रतिक्रियेनं पुन्हा वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये वादळ आलं. परंतु या वेळी तो एवढय़ावरच थांबला नाही. ‘‘भविष्यात कसोटी क्रिकेटची जागा ट्वेन्टी-२० क्रिकेटनं घेतली, तर मला त्याचं अजिबात दु:ख होणार नाही,’’ हे त्याचे मनमोकळे बोल तथाकथित क्रिकेटपंडितांना स्वीकारणं कठीण गेले. रिचर्ड्स, सोबर्स यांनी गेलच्या वक्तव्यावर खडाडून टीका केली. गेलच्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केल्याचे मग वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ज्युलियन हंटे यांनी जाहीर करून हे प्रकरण सावरले. त्यानंतर विंडीजचे कर्णधारपद आपण सोडू इच्छित नसल्याचे स्पष्टीकरणही गेलने दिले होते.
एप्रिल २०११ मध्ये गेलच्या सहनशक्तीचा बांध तुटला आणि त्यानं वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे एक वर्षांहून अधिक काळ त्यानं संघाबाहेर राहणं पसंत केलं. तोवर आयपीएलमध्ये आपले नाणे खणखणीत सिद्ध करून गेल आर्थिकदृष्टय़ा चांगलाच स्थिरावला होता. त्याचं मोठेपण जपणं विंडीज क्रिकेटला मुळीच मान्य नव्हतं. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. अखेर ६ एप्रिल २०१२ या दिवशी विंडीज क्रिकेटच्या भल्यासाठी हा वाद सामोपचारानं मिटवण्यात आला. मग सहा महिन्यांनी गेल पुन्हा राष्ट्रीय संघात परतला आणि आपल्या बहारदार खेळानं त्यानं पहिल्याच मालिकेत आपली छाप पाडली. गेल्या वर्षी वेस्ट इंडिज संघानं आर्थिक समस्यांवर तोडगा न निघाल्यामुळे तडकाफडकी भारत दौरा अध्र्यावर सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी दुखापतीमुळे गेल या संघासोबत नव्हता. अन्यथा त्यानं आपल्या टीकास्त्रांनी हे प्रकरण आणखी गाजवलं असतं. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये आपली छाप पाडणारा हा कॅरेबियन अवलिया आपल्या कारकीर्दीत विक्रमांचे आणखी कोणती नवी शिखरे सर करेल, हे उत्सुकतेचे आहेच. परंतु यासोबतच तो आपल्या बंडखोर नीतीमुळे नव्या वादांच्याही केंद्रस्थानी असणं स्वाभाविक आहे.
प्रशांत केणी
बंडखोर
ख्रिस्टोफर हेन्री ‘ख्रिस’ गेल.. हे नाव आहे वेस्ट इंडिजच्या तुफानाचं. गॅरी सोबर्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, ब्रायन लारानंतर कॅरेबियन क्रिकेटचा वारसा तो समर्थपणे चालवतो आहे.
First published on: 26-02-2015 at 04:37 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebellious