कोणत्याही खेळात कोणीही कमकुवत नसतो. कधी ना कधी तरी हा संघदेखील अनपेक्षित कामगिरी करू शकतो. क्रिकेटमध्येही त्यास अपवाद नाही. ट्वेन्टी-२० असो किंवा एकदिवसीय सामना असो, समीक्षकांना wcबुचकळ्यात टाकण्यासारखी कामगिरी नवोदित संघांकडून होत असते. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत असे अनेक धक्कादायक निकाल नोंदवले गेले आहेत. यंदाच्या विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांद्वारेच क्रिकेटपंडितांना चक्रावून टाकले आहे.
या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्कॉटलंड, आर्यलड, अफगाणिस्तान यांनी स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे झिम्बाब्वे व बांगलादेश यांनाही कमकुवत संघ म्हणून हिणवले जात असते. ज्या अर्थी या संघांनी मुख्य फेरीत स्थान मिळविले आहे, त्या अर्थी त्यांच्याकडे मैदानावर चमक दाखवण्याची क्षमता आहे, हे सिद्ध झाले आहे. अन्य संघांपेक्षा कदाचित हे संघ थोडेसे अनुभवाने कमी असतील, मात्र शेवटपर्यंत झुंज देण्याची क्षमता, काही अनपेक्षित, परंतु कौतुकास्पद कामगिरी करण्याची शैली त्यांच्याकडे आहे, यात तिळमात्र शंका नाही.
विश्वविजेतेपदाचे दावेदार मानल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्ध निर्धारित षटकांत ४ बाद ३३९ धावांपर्यंत मजल गाठली, तेव्हा हा सामना ते एकतर्फी जिंकतील अशीच अपेक्षा होती. मात्र झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या डेल स्टेन, मोर्ने मोर्कल, व्हरनॉन फिलँडर यांना दिलेली लढत खरोखरीच wc08कौतुकास्पद होती. झिम्बाब्वेने २७७ धावांपर्यंत मजल गाठली, हीच त्यांच्यासाठी मोठी कामगिरी आहे.  
प्रथम फलंदाजी करताना तीनशे धावांचा टप्पा ओलांडण्यापेक्षा ते आव्हान समोर असताना फलंदाजी करणे अधिक अवघड असते. त्यातही माजी विश्वविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध तीनशेपेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वी करीत आर्यलडने आपल्या भावी यशाची झलक दाखवली आहे. विंडीजने त्यांच्यापुढे ३०४ धावांचे आव्हान ठेवले, त्या वेळी या सामन्यात त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला गेला होता. देशाच्या क्रिकेट मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे विडींजचे खेळाडू जरी ग्रासले असले तरीही त्यांनी ही मोठी धावसंख्या रचताना आपण मानसिकरीत्या तंदुरुस्त असल्याचाच पुरावा दिला. आर्यलडच्या फलंदाजांनी तीनशे धावांच्या लक्ष्याचे कोणतेही दडपण न घेता आत्मविश्वासाने खेळ केला. त्यांनी चार विकेट व चार षटके बाकी राखून विजय मिळविला. खरे तर त्यापेक्षाही कमी षटकांमध्ये व कमी फलंदाज गमावून त्यांनी हा सामना जिंकला असता. २ बाद २७३ धावांवरून सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात त्यांनी चार फलंदाज गमावले अन्यथा त्यांनी किमान सहा विकेट्सनेच ही लढत जिंकली असती.
स्कॉटलंडने न्यूझीलंडविरुद्ध सामना गमावला, परंतु त्यांनी या सामन्यात किवी खेळाडूंना दिलेली लढत खरोखरीच कौतुकास पात्र आहे. विजयासाठी केवळ १४३ धावांचे आव्हान न्यूझीलंडने २० षटकांपूर्वीच पार करायला पाहिजे होते. मात्र हे लक्ष्य पार करताना त्यांनी सात फलंदाज गमावले तसेच त्यांना २५व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. यावरूनच स्कॉटलंडच्या खेळाडूंनी दिलेल्या लढतीची कल्पना येऊ शकते.
बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तानचा पराभव ही काळ्या दगडावरची रेघ होती. बांगलाच्या खेळाडूंनी हा सामना मोठय़ा फरकाने जिंकला तरीही अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न करीत आपल्याकडे चांगले कौशल्य आहे हे दाखवून दिले. ५० षटकांत बांगलाचे सर्व खेळाडू बाद करण्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी यश मिळवले, हीच त्यांच्यासाठी खूप भरीव कामगिरी आहे. अफगाणिस्तान म्हणजे तालिबान्यांच्या कारवायांनी पोखरलेला देश असेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर नेहमी येत असते, तरीही त्याला न जुमानता त्यांचा संघ उभारला गेला व मुख्य फेरीत पोहोचला हा त्यांच्यासाठी मुलखावेगळा विजय आहे.
स्कॉटलंड, आर्यलड, अफगाणिस्तान यांच्यासारख्या संघांच्या चाहत्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी खूप मोठी दरमजल केली. आपले खेळाडू व आपण अन्य देशांच्या खेळाडूंपेक्षा कमी नाही, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांमध्येही हे संघ आणखी काही करामत करून दाखवतील अशी अपेक्षा आहे.

Story img Loader