लिंबू-टिंबू म्हणून गणना होणाऱ्या अफगाणिस्तानने श्रीलंकेला विश्वचषकातील पहिल्यावहिल्या विजयासाठी चांगलाच संघर्ष करायला लावला. अनुभवी महेला जयवर्धनेच्या शैलीदार शतकाच्या बळावर श्रीलंकेने अडखळत स्पर्धेतला पहिला विजय साकारला.
गोलंदाजांना साहाय्यकारी खेळपट्टीवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संथ, धीमी खेळपट्टी आणि असखल उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अडचणी आल्या. अशगर स्टॅनिकझईने ५४ धावा करत डाव सावरला. सॅमीउल्ला शेनवारीने ३८ तर मिरवाइस अशरफने २८ धावांची खेळी केल्यामुळे अफगाणिस्तानने २३२ धावांची मजल मारली. श्रीलंकेतर्फे लसिथ मलिंगा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
दौलत झाद्रान आणि हमीद हसान यांनी श्रीलंकेची अवस्था ३ बाद १८ अशी केली. थोडय़ाच वेळात ती ४ बाद ५१ अशी झाली. यानंतर महेला जयवर्धनेने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने पाचव्या विकेटसाठी अँजेलो मॅथ्यूजसह १२६ धावांची भागीदारी केली. ८ चौकार आणि एका षटकारासह जयवर्धनेने १०० धावांची सुरेख खेळी साकारली. मात्र जयवर्धने आणि मॅथ्यूज लागापोठ बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ६ बाद १७८ अशी झाली. ५५ चेंडूंत ५४ धावांचे आव्हान असताना थिसारा परेराला जीवन मेंडिसची साथ मिळाली. परेराने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४७ धावा करत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : ५० षटकांत सर्वबाद २३२ (अशगर स्टॅनिकझई ५४, लसिथ मलिंगा ३/४१, अँजेलो मॅथ्यूज ३/४१) पराभूत विरुद्ध श्रीलंका : ४८.२ षटकांत ६ बाद २३६ (महेला जयवर्धने १००, थिसारा परेरा ४७, हमीद हासन ३/४५)
सामनावीर : महेला जयवर्धने


विश्वचषकात महेला जयवर्धनेच्या शतकांची संख्या

विश्वचषकात जयवर्धनेची ५० धावांपेक्षा अधिक धावांच्या खेळीची संख्या. सनथ जयसूर्यासह संयुक्तपणे अव्वल स्थानी
१९
जयवर्धनेच्या एकदिवसीय प्रकारातील शतकांची संख्या.

अफगाणिस्तानने सुरेख खेळ केला. हा सामना एकतर्फी होऊ न देण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. कठीण परिस्थितीत त्यांनी चांगली फलंदाजी केली. छोटय़ा धावसंख्या हाताशी असतानाही त्यांनी आम्हाला अडचणीत आणले. आम्ही विजय मिळवू शकलो याचे समाधान आहे. कसोटी खेळणारे संघ आणि संलग्न संघाच्या दर्जात फार अंतर नाही.
– महेला जयवर्धने, श्रीलंकेचा फलंदाज

आम्ही लौकिकाला साजेसा खेळ करू शकलो नाही. आम्हाला आमच्या कामगिरीत प्रचंड सुधारणा करावी लागेल. महेलाची खेळी निर्णायक ठरली. थिसारा परेराने दडपणाच्या क्षणीही थंड डोक्याने खेळ करत विजय सुकर केला. अफगाणिस्तानने शानदार खेळ केला. त्यांनी सातत्याने आमच्यावर दडपण ठेवले. मोठय़ा संघांविरुद्ध आम्हाला जबाबदारीने खेळ करावा लागेल.
– अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार