तो दिवस होता १८ जानेवारी २०१५. जोहान्सबर्गच्या वाँडर्स मैदानावर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध १ बाद २४७ अशा सुस्थितीत असताना ए बी डी’व्हिलियर्स मैदानावर आला. पुढच्या अर्धा तासात त्याच्या नावावर एकदिवसीय प्रकारातील वेगवान शतकाची नोंद झाली. ही खेळीच अविश्वसनीय वाटावी अशी होती. या खेळीदरम्यान जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर उजव्या यष्टीबाहेरून डी’व्हिलियर्सने चेंडू तटवला. फारसा वेग नसलेला हा चेंडू थेट प्रेक्षकांमध्येच जाऊन विसावला. डी’व्हिलियर्सच्या अफलातून टायमिंगचं कौतुक झालं. मात्र हे टायमिंग शक्य करणारी बॅट मात्र दुर्लक्षितच राहिली. बदल आणि आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला प्रगत बनवतात. मात्र बदल सर्वसमावेशक नसेल तर विपरीत परिणाम होऊ शकतो. क्रिकेट हा बॅट आणि बॉल यांचा खेळ. मात्र सध्या बॅटच्या वर्चस्वासमोर हिरमुसलेला बॉल हेच चित्र सातत्याने दिसते आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम सहामध्ये बॅटसंदर्भात तरतुदी आहेत. यानुसार बॅटची लांबी ३८ इंच (९६५ मिलिमीटर)पेक्षा असू नये आणि रुंदी ४.२५ इंच (१०८ मिलिमीटर)पेक्षा असता कामा नये. साधारण बॅटचे वजन १.२ ते १.५ किलोग्रॅम असावेत, असेही नमूद केले आहे. मात्र कठोर नियम असा नाही. १६२४मध्ये पहिल्यांदा बॅटचा वापर झाल्याचा उल्लेख आहे. सुरुवातीला हॉकी स्टिक आणि एखाद्या शेतीच्या अवजाराप्रमाणे भासणाऱ्या बॅटमध्ये फलंदाजांच्या गरजेनुसार बदल होते गेले. हँडल आणि खाली घाटदार लाकडी संरचना हे बॅटचे स्वरूप. विलो वृक्षापासून तयार होणाऱ्या बॅट दर्जेदार मानल्या जातात. काश्मीर खोऱ्यात हे वृक्ष मोठय़ा प्रमाणावर असल्याचे असंख्य बॅटचे कारखाने या प्रदेशात आहेत. काश्मीरप्रमाणे सध्या उत्तर प्रदेशातील मेरठ बॅट निर्मितीचे केंद्र झाले आहे.
फलंदाजांनी चौकार, षटकारांची लयलूट करावी. चेंडू आणि गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडतील अशी ही फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये येतात. टीव्हीवरही याच तोडफोडीला ‘टीआरपी’ मिळतो हे क्रिकेटकेंद्रित अर्थकारणाचे सूत्र बनले. यामुळे फलंदाजांना बॅटची रुंदी आणि जाडी वाढवण्यासाठी परवानाच मिळाला आणि कर्दनकाळ पर्व सुरू झाले. चौकार, षटकार खेचण्यात टायमिंगप्रमाणे फलंदाजाची शारीरिक ताकद आणि मैदानाचा आकार निर्णायक असतो. मात्र वाढीव रुंदी आणि जाडीच्या बॅटमुळे छोटय़ा चणीच्या आणि मर्यादित ताकदीचे फलंदाजही टोलेबाजी करत आहेत. कालौघात बॅटचे वजन कमी झाले आहे, मात्र रुंदी आणि जाडी वाढल्याने चौकार, षटकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. आयसीसीने स्टीलचा अंश असलेल्या तसेच कार्बन फायबर पॉलीमरयुक्त बॅटवर र्निबध घातले. मात्र ट्वेन्टी-२०च्या फटकेबाजीला अनुरूप ‘युझी’, ‘एमएमआयथ्री’, ‘मुंगूस’, ‘बिग हीटर’, ‘जोकर’ या बॅटचा वापर वाढला आहे. मोठे हँडल आणि बेसबॉलप्रमाणे चेंडूवर लत्ताप्रहार करणाऱ्या बॅट्स गोलंदाजांसाठी दु:स्वप्नेच ठरत आहेत.
गोलंदाजांना एका षटकात दोन उसळते चेंडू टाकता येतात. बीमर टाकल्यास गोलंदाजीवर बंदी येऊ शकते. पॉवरप्लेदरम्यान ३० यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर चार क्षेत्ररक्षकांनिशीच गोलंदाजी करावी लागते. याव्यतिरिक्त नोबॉल, फ्रीहिट, वाइडचे नियम असतातच. मात्र फलंदाजांच्या बॅटसाठी अशी नियमांची जंत्री नाही.
फलंदाजधार्जिणे झालेले एकसुरी सामने आता एकदिवसीय क्रिकेटची ओळख होत आहे. विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या लढतीत नऊ वेळा संघांनी तीनशेचा टप्पा सहज ओलांडला. धावांचा पाठलाग करतानाही तीनशे धावा झाल्या आहेत. ब्रेंडन मॅक्क्युलम, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, कोरे अँडरसन यांच्या हाती वाढीव रुंदीची बॅट म्हणजे बॉलची दैना निश्चित.
न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांनी या मुद्यावर आवाज उठवला होता. खेळ एकांगी होऊ नये यासाठी बॅटच्या आकारावर निर्बँध आणायला हवेत, अशी भूमिका क्रो यांनी मांडली होती. ‘‘हे पाऊल लोकप्रिय रुढ संस्कृतीच्या विरोधात असेल मात्र त्याने खेळातली एकता वाढेल. वाढीव रुंदी आणि जाडीच्या बॅटच्या माध्यमातून फलंदाजांना फायदा मिळत आहे. हा गोलंदाजांवर अन्याय आहे,’’ असे क्रो यांनी म्हटले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही खेळ सर्वसमावेशक होण्यासाठी बॅटला नियमांची चौकटीत आणावे अशी परखड भूमिका मांडली आहे.
‘विक्रमचषक’ असे वर्णन होणाऱ्या या विश्वचषकात बहुतांशी विक्रम फलंदाजांचेच होत आहेत. ‘बॅटमन’ विक्रमपटूंना रोखण्यासाठी आयसीसीने उशिरा का होईना, बॅटच्या रुंदी आणि जाडीवर कडक र्निबध घालण्याच्या विचारात आहेत. तसे झाले तर ते आधुनिकतेला वेसण घालणारे ठरेल, मात्र त्याने बॅट-बॉलमधल्या खेळात समानता येईल. कदाचित पुढचा विश्वचषक गोलंदाजांचा असेल.
पराग फाटक
सिली पॉइंट : बॅटचा खेळ, बॉलची दैना
तो दिवस होता १८ जानेवारी २०१५. जोहान्सबर्गच्या वाँडर्स मैदानावर दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध १ बाद २४७ अशा सुस्थितीत असताना ए बी डी’व्हिलियर्स मैदानावर आला.

First published on: 24-02-2015 at 03:36 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of south africa west indies oneday match