भारतीय संघनायक महेंद्रसिंग धोनीची काही वैशिष्टय़े आहेत. विशेषत: २०१५मधील धोनीची. कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतरच्या धोनीची आणि सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, झहीर, कुंबळे, हरभजन, युवराज, गंभीर आदी बुजुर्गाच्या गैरहजेरीत नेतृत्व करणाऱ्या धोनीची. साऱ्या निर्णयांचे एकमेव मध्यवर्ती केंद्र बनल्यानंतरच्या धोनीची. त्यापैकी एक ठसठशीत वैशिष्टय़, आपल्या पसंतीच्या खेळाडूंचा पाठपुरावा करण्यासाठी कोणत्याही टोकापर्यंत जाण्याचं. अतूट नाती निर्माण करण्याचं. रवींद्र जडेजा, मोहित शर्मा, सुरेश रैना अशा आपल्या पसंतीच्या काही खेळाडूंवर ठाम विष्टद्धr(२२४)वास टाकण्याचं. पण ही निष्ठा, हे धोरण, हे डावपेच दुधारी हत्यारांसारखे आहेत, हे तो नक्कीच जाणतो!
म्हणजे धोनीचा जडेजावर, त्याच्या डावखुऱ्या फिरकीवर, त्याच्या टोलेबाजीवर, त्याच्या क्षेत्ररक्षणातील चापल्यावर अढळ विश्वास आहे. पण याचाच दुसरा अर्थ असा, की डावखुऱ्या अक्षर पटेलवर त्याचा अविश्वास आहे. तसाच स्टुअर्ट बिन्नीवरही अविश्वास आहे. अक्षर व स्टुअर्ट या दोघांच्याही अष्टपैलुत्वावर त्याचा काडीचाही विश्वास नाही. आणि तोच गर्भीत अर्थ आहे, धोनीच्या जडेजावरील अढळ विश्वासाचा!
तसेच, धोनीचा कमालीचा विश्वास आहे मोहितवर. त्याच्या माऱ्यातील अचूकतेवर. त्याच्या तंदुरुस्तीवर. पण मोहितवरील धोनीच्या विश्वासाच्या ओघात लपलेली दुसरी बाजू आहे, अनुभवी भुवनेश्वर कुमार, अष्टपैलू बिन्नी (व राखीव धवल कुलकर्णी) यांच्यावरील साफ अविश्वासाचे. खरं तर त्यांच्या उपेक्षेची. जणू हे खेळाडू यशस्वी होतील याची धास्ती घेतलेल्या धोनीने ती शक्यता नष्ट करण्याकरता त्यांना संघाबाहेर ठेवण्याच्या बंदोबस्ताची. वस्तुस्थिती अशी की धवल या अधिकृत राखीव संघ सदस्याच्या पंगतीत बसवलं गेलंय पटेल, बिन्नी, अंबाती रायडू (व पाच षटकांपुरता खेळलेला भुवनेश्वर) या चार संघसदस्यांना, त्यांना धोनीने बनवलंय अनधिकृत राखीव खेळाडू!
चार वर्षांपूर्वी भारतानं विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्या संघात होते सचिन, सेहवाग, गंभीर, युवराज, झहीर, हरभजन असे दिग्गज. पण तरीही त्या स्पर्धेत धोनीनं १५ पैकी १५ खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं. झहीर ते मुनाफ पटेलसह नेहरा व श्रीशांत खेळायचा. हरभजनच्या साथीला अष्टपैलू युसूफ पठाण वा अश्विन वा पीयूष चावलासह प्रमुख फलंदाजांना त्यानं हात लावला नाही. पण काही काळ रैनाला पर्याय म्हणून पठाणकडे जरूर पाहिलं होतंच की!
यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडने भारताप्रमाणे ११ जणांचा एकच एक संघ पसंत केला. एकदा बदल केला तो जलदगती मिलनेला दुखापत झाल्यावर. पण ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी किमान १४-१४ खेळाडूंचा कस अजमावला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या दोन जागांसाठी कांगारूंनी कस अजमावला अनुभव शेन वॉटसनसह मिच मार्श व फॉल्कनर या ताज्या दमाच्या खेळाडूंचा. डावखुऱ्या झेव्हियर डोहर्टीची फिरकी श्रीलंकेसमोर वापरून पाहिली. हेझलवूड हा स्टार्क-जॉन्सन यांसह त्रिकूट जमवू शकतो का, याची मैदानी परीक्षा घेतली. दक्षिण आफ्रिकेनेही पार्नेल, रूसो, बेहराडिन व अ‍ॅबॉट यांचा जोश अनुभवून घेतला. श्रीलंकन संघात अधिकच फेरबदल झाले. पण जबर दुखापती हे त्याचं कारण होतं. विंडीजनेही किमान १५ खेळाडू खेळवले. विजयी संघ बदलत नसतात, असं सांगितलं जातं. भारत व न्यूझीलंड यांनी हे सुभाषित तंतोतंत पाळलंय. पण ऑस्ट्रेलियाची हार झाली, तीही नाममात्र एका विकेटच्या फरकानं. पण तरीही त्यांना जवळपास सारे खेळाडू खेळवून बघावेसे वाटले. द. आफ्रिकेला भारत-पाककडून पराभवाचे दणके बसले. पण एरवीही साऱ्या खेळाडूंना वापरून पाहाण्याची त्यांची वृत्ती असते.
२००३च्या विश्वचषकात सौरभ गांगुलीनं, २०११च्या नव्हे तर २०१५च्या धोनीसारखं धोरण अवलंबलं होतं. सलामीला खेळण्याचा स्वार्थी आग्रह, तेव्हा गांगुलीनं, श्रीनाथ-कुंबळे-प्रशिक्षक जॉन राइट यांच्या सल्ल्यानुसार सोडला. मग सचिन, सेहवाग, गांगुली, कैफ, द्रविड, युवराज, कुंबळे, हरभजन, झहीर, नेहरा, श्रीनाथ व दिनेश मोंगिया (!) या १२ जणांपलीकडे पाहिले नव्हते. इतरांना कुजवलं होतं. अजित आगरकर, संजय बांगर व पार्थिव पटेल यांना शीतपेय आणणं-नेणं या खास कामगिरीवर ठेवलं होतं! आता धोनीनं त्यासाठी निवडले आहेत बिन्नी, पटेल, नायडू, बहुतांशी भुवनेश्वर. तेच या विश्वचषकातले आगरकर- बांगर-पटेल.
२००३चे प्रशिक्षक जॉन राइट धोनीला सल्ला देत आहेत, की विजेत्या संघास हात लावू नकोस. विशेषत: फलंदाजांच्या फळीला. पण एक-दोन बदल करून बघता येतील. वातावरण स्विंगला अनुकूल असल्यास बिन्नीला वाव देता येईल, असे त्यांच्या शैलीत नम्रतेनं सुचवून पाहतात! सौरभ गांगुली म्हणतो की, ‘‘उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम फेरीत जडेजाला खेळवायचं, असंच धोनीनं ठरवलं असेल तर न्यूझीलंडमध्येही आर्यलड व झिम्बाब्वेसमोर त्याला संघात ठेवावं. जडेजाचं स्थान राखण्यास तो संमती देतो, ती बरीचशी नाइलाजास्तवच.’’
धोनीचा हा आग्रह, हा हट्टाग्रह कशामुळे? रवींद्र जडेजा व या स्पर्धेत सातत्यानं चमकलेला मोहित शर्मा व धोनी यांना इतकं घट्ट बांधून ठेवणारा धागा एकच. तो धागा सीएसकेचा. चेन्नई सुपर किंग्जचा. भारतीय मंडळाचे सत्तापिपासू सर्वेसर्वा श्रीनिवास ऊर्फ श्रीनि यांच्या इंडिया सिमेंटस परिवाराच्या चेन्नई सुपर किंग्जचा.
भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी (व पूरक) महासत्तातील संघर्ष गाजलेले आहेत. फाळणीपूर्वी मुंबई-लाहोर, फाळणीनंतर मुंबई-दिल्ली, मुंबई-हरयाणा, मुंबई-कर्नाटक. पण आयपीएलनं बरखास्त केली आहेत ही बलवान, परंपरागत सत्ताकेंद्रे. धोनी-श्रीनि यांच्या जमान्यातील असली सत्ताकेंद्रे आहेत चेन्नई सुपर किंग्ज प्रायव्हेट लिमिटेड, ऊर्फ सीएसके अमर्यादित! पूर्वी वाडेकर विरुद्ध बेदी, गावसकर विरुद्ध कपिल असे तट पडत. आता गट-तट एकच: सीएसके अमर्यादित.
मुंबई, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक येथील खेळाडू घडवले होते, ते संबंधित राज्य संघटनांनी नव्हे, तर त्या संघटनांतील क्रिकेटला वाहिलेल्या क्लबनी. आता उतरणीस लागलेल्या शिवाजी पार्क जिमखान्यानं आणि क्लब हाऊसपुरतं अस्तित्व टिकवून धरलेल्या दादर युनियननं. चौरंगी-पंचरंगी सामने रंगवणाऱ्या हिंदू, इस्लाम, पारशी, कॅथलिक जिमखान्यांनी. हरयाणातील देशप्रेम आझाद व बंगळूरचे तारापोर आदी उपशिक्षकांनी. सीएसके वा त्यासारखे आयपीएल संघ, त्यांच्या खेळाडूंना कोणत्या निष्ठा, कोणती संस्कृती संस्कारित करणार? खेळाडूंचे प्रभावशाली व्यावसायिक एजंटस् कोणते संस्कार करणार? सीएसके अमर्यादितचा उदय, हा विषयच चिंतेचा. युरोपीय फुटबॉल क्लबप्रमाणे आयपीएलच्या ठेकेदारांचे संघ, खेळाची विद्यापीठे बनेपर्यंत या चिंतेला उत्तर कोठून मिळणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा