‘‘मी यापुढे गुरू गोविंद सिंग क्रीडा महाविद्यालयात पाऊल ठेवणार नाही,’’ हे वाक्य तो ११ वर्षांचा मुलगा वारंवार ओरडून सांगत होता. हे सांगताना त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी त्याला विनंती-सूचना करून पाहिल्या; परंतु तो कुणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सुरेश रैनाची क्रिकेट कारकीर्द घडावी म्हणून या कुटुंबानं गाझियाबादहून लखनौला स्थलांतर केलं होतं. अपेक्षेप्रमाणे गुरू गोविंद सिंग क्रीडा महाविद्यालयात सुरेश जाऊ लागला. जेमतेम काही दिवस झाले असताना आपली क्रिकेट कारकीर्द गुंडाळण्याचा निर्णय तो घेणार होता. या धक्क्यातून तो सावरणं कठीण होतं. असं काय घडलं होतं सुरेशच्या आयुष्यात? ज्यामुळे तो आपल्या आवडत्या खेळाचाही त्याग करायला निघाला होता. त्याने सुमारे सहा महिने घराची वेस ओलांडली नाही. हा काळ त्याच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण रैना कुटुंबीयांसाठी परीक्षा पाहणारा होता; परंतु सुरेशचा मोठा भाऊ दिनेशनं याबाबत चौकशी केली आणि आपल्या भावाचं रॅगिंग झाल्याचं विदारक सत्य त्याच्यासमोर आलं. दिनेश गाझियाबादच्या छबिलदास महाविद्यालयात इंग्रजी शिकवायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या जाणिवांची त्याला चांगली जाण होती. दिनेशनं आधी सुरेशच्या प्रशिक्षकांशी चर्चा केली आणि मग त्यानं हळूहळू त्याला धक्क्यातून सावरलं. पुन्हा असं कुणीही तुझ्याशी वागणार नाही, याची हमी सुरेशला देऊन दिनेशनं त्याला पुन्हा मैदानावर आणलं. अन्यथा रॅगिंगसारख्या घातकी कृत्यामुळे एका शाळकरी क्रिकेटपटूची कारकीर्द अकाली खुडून गेली असती.
रैना कुटुंबीय हे पंजाबी ब्राह्मण. काश्मिरी पंडित म्हणून जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर भागातील रैनावारी भागात त्यांना चांगला मानसन्मान मिळत होता. सुरेशचे वडील त्रिलोक चंद हे निवृत्त लष्करी अधिकारी आणि आई परवेश ही गृहिणी. १९८०च्या दशकात या कुटुंबीयांनी श्रीनगरहून स्थलांतर करून उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्हय़ात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुरेशला तीन भाऊ- दिनेश, नरेश आणि मुकेश आणि बहीण रेणू. सुरेश हा यापैकी शेंडेफळ. त्यामुळेच ‘सानू’ आणि ‘छोटा’ ही घरातूनच मिळालेली टोपणनावं. सुरेशचं क्रिकेटवर प्रेम अपरंपार. त्यामुळेच लखनौच्या क्रीडा महाविद्यालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. इथूनच त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेशच्या पहिल्या निवड चाचणीला तो ११ वर्षांचा असताना हजर राहिला, तेव्हा ८०० खेळाडूंमधून निवडलेल्या २० खेळाडूंमध्ये त्याचं नाव होतं.
सुरेशची क्रिकेट कारकीर्द सावरणारा भाऊ दिनेश त्याच्या अभ्यासाचीसुद्धा काळजी घ्यायचा. पहाटे साडेपाच वाजता दिनेश त्याची शिकवणी घ्यायचा; परंतु बऱ्याचदा सामने आणि दौऱ्यांमुळे त्याला अभ्यासाकडे लक्ष देणं कठीण जायचं. मात्र सुरेशनं दिनेशला शिक्षा देण्याची कधीच संधी दिली नाही. कारण सुरेश घरी यायचा, तेव्हा बऱ्याचदा त्याच्यासोबत जेतेपदाचा चषक, सामनावीर पुरस्कार किंवा प्रमाणपत्र असायचं. त्यामुळे त्याच्या खेळाचं कुटुंबातील सर्वच जण दिलखुलास कौतुक करायचे. सुरेश रात्री झोपताना आपल्या उशीखाली काडेपेटी ठेवायचा. सकाळी उठून मैदानावर जाताना लाइट लावल्यास सर्वाची झोपमोड होणं, हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. पुढे १६ वर्षांखालील संघाचा तो कप्तान झाला. मग उत्तर प्रदेशकडून रणजी खेळत त्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि भारतीय संघाची दारं त्याच्यासाठी खुली झाली. खेळातून वेळ काढून दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा तो उत्तीर्ण झाला.
विश्वचषकानंतर सुरेशचं लग्न होणार, अशी चर्चा सध्या आहे. त्याची भावी पत्नी कोण, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्या प्रेमप्रकरणाला प्रसारमाध्यमांनी खमंग फोडणी दिली होती. सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारी अनुष्का शर्मासुद्धा सुरेशला आवडायची; परंतु या वावडय़ा खऱ्या नसल्याचं सुरेशनंच प्रसारमाध्यमांना ठणकावून सांगितलं होतं. विवाहासाठी सज्ज झालेला सुरेश पाककलेतही माहीर आहे. अनेक चांगले पदार्थ त्याला बनवता येतात. हे पदार्थ तो कुठे बनवायला शिकला, याबद्दल त्याची आईसुद्धा अनभिज्ञ आहे. त्यामुळे सुरेशच्या आयुष्याची जोडीदारीण कोण असेल, याबाबत क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा