सलग सात सामन्यांत विजयांसह भारतीय संघाचा विजयरथ जेतेपदाच्या दिशेने भरधाव निघाला आहे. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर आव्हान आहे मातब्बर ऑस्ट्रेलियाचे. भारतीय फलंदाजीचा अविभाज्य घटक असलेल्या सुरेश रैनाला उशिरा का होईना सूर गवसला आहे. मात्र अजूनही उसळत्या चेंडूंचा सामना करणे रैनासाठी खडतर आव्हान आहे आणि म्हणूनच त्याने त्यावर उपाय शोधून काढला आहे. सक्षमपणे उसळत्या चेंडूचा सामना करण्यासाठी रैना ताकदवान टेनिस सव्र्हिस खेळून काढतो आहे.
वेगवान गोलंदाजांचा भेदक मारा खेळून काढण्याचा सराव म्हणून फलंदाज टेनिस बॉलने सराव करतात. मात्र रैनाने त्यापुढे जात जोरकस टेनिस सव्र्हिसला सामोरे जाण्याचा धाडसी पर्याय निवडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी सराव करताना रैना पाऊण तास टेनिस सव्र्हिसला सामोरा गेला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांनी बॉलिंग मशीनद्वारे उंचावरून वेगात येणाऱ्या चेंडूंचा सामना केला. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूडसारखे तेजतर्रार गोलंदाज आहेत. उसळते चेंडू हा रैनाचा कच्चा दुवा ओळखत ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज रैनाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. हे ओळखूनच मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी रैनासाठी टेनिस सव्र्हिस सरावाची शक्कल लढवली आहे.
एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विशेषज्ञ असणाऱ्या रैनाला कारकीर्दीत या उसळत्या चेंडूंनी नेहमीच सतावले आहे. या अडचणीमुळेच रैनाला कसोटी संघात स्थान पक्के करता आले नाही. ही समस्या वाटचालीत अडथळा ठरू नये, यासाठी रैनाने कायमस्वरूपी इलाज केला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंड परिसरात आयोजित सराव सत्रात रैनाचा हा उपाय उपस्थितांचे आकर्षण ठरला.
डंकन फ्लेचर यांच्या हातात टेनिसची रॅकेट होती. बॉलिंग मशीनच्या तुलनेत टेनिस सव्र्हिसमध्ये चेंडू वेगाने उसळी घेतो. यामुळे रैनासारख्या फलंदाजाला कच्चा दुवा बळकट करण्यासाठी चांगलीच मदत झाली. १५ मिनिटे रैनाला टेनिस सव्र्हिस केल्यानंतर फ्लेचर यांना या कामासाठी ताकदवान खेळाडूची गरज लक्षात आली आणि मग थेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने झंझावाती वेगाने रैनाच्या दिशेने सव्र्हिस केल्या. त्यांचा सामना करताना रैनाची तारांबळ उडाली. यानंतर धोनीने रैनाशी सल्लामसलत केली. त्यानंतर पुन्हा धोनीच्या टेनिस सव्र्हिसवर रैनाने मजबूत सराव केला.
महत्त्वाच्या लढतीत एखाद्या खेळाडूचे तंत्र उघडे पडू नये, यासाठी स्वत: खेळाडूसह प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी केलेला हा उपक्रम आधुनिक क्रिकेटचे बदलते स्वरूप दर्शवणारा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा