जागतिक क्रिकेटची सूत्रे भारताच्याच हाती आहेत. खेळात सर्वाधिक पैसा भारतातूनच येतो. भारतीय संघाच्या सामन्यांना सर्वाधिक टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) मिळतात आणि मैदानावरही स्टेडियम चाहत्यांनी गच्च भरलेले असते. धोनी आणि भारतीय संघाचे गारूड आता ‘गुगल’पर्यंत पोहचले आहे.
इंटरनेट विश्वातील सर्वात ताकदवान ‘सर्चइंजिन’ असलेल्या ‘गुगल’वर धोनी आणि त्यांचा संघाचा शोध सर्वाधिक वेळा घेतला जात आहे. विश्वचषकाचे पडघम वाजू लागल्यानंतर धोनी आणि त्याच्या संघाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नेटिझन्सची उत्सुकता चाळवली गेली. सर्वव्यापी ‘गुगल’च्या पाहणीतून भारतीय संघच विश्वचषकातला सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष काढला आहे. भारतीय संघापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे.
भारतीय संघातील खेळाडूंमध्ये तरुण तडफदार आणि रनमशीन विराट कोहलीबाबत सगळे काही जाणून घेण्यासाठी नेटिझन्स प्रयत्नशील आहे. कोहलीनंतर धोनीचा क्रमांक लागतो. या दोघांच्या बरोबरीने सख्खे शेजारी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची ‘गुगल’वर चर्चा होते आहे.
जागतिक स्तरावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शकीब उल हसन आणि ऑस्ट्रेलियाचे मायकेल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथ या कर्णधारांविषयी नेटिझन्स ‘गुगल’ताना दिसत आहेत.
गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार मिचेल जॉन्सन, इंग्लंडची जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही जोडगोळी चर्चेत आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचे रवींद्र जडेजा आणि स्टुअर्ट बिन्नी यांना नेटिझन्सची पसंती आहे.

Story img Loader