cricket-blog-ravi-patki5
या विश्वचषकातील परीक्षा पहाणारा सामना वेस्ट इंडिज बरोबर पर्थला झाला. आत्तापर्यंत संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बाऊंसचा प्रतिकार आपण केला आहे. पण वाकाच्या खेळपट्टीवर बाऊंस आणि स्विंग असे दोन तोफगोळे एकावेळेस अंगावर आले आणि भंबेरी उडाली. आपण सामना चार विकेटसने जिंकलो असलो तरी सामना खूप अटीतटीचा झाला. या खेळपट्टीवर कुठलाच फलंदाज सेट होणे अवघड होते आणि त्यामुळे सातवी विकेट पडली असती आणि अगदी दहा धावा करायच्या असत्या तरी जिंकलोच असतो असं बिलकूल सांगता आलं नसतं. पर्थला वाहणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वाऱ्याने (फ्रीमँटल डॉक्टर) असे काही चेंडू हवेत हलले की चेंडूवर अचूक वेळेस बॅट ठेवणं अवघड चाललं होतं. त्यातले बरेच चेंडू लेट स्वींग होत होते. उमेश यादव, जेरॉम टेलर, केमार रोच, आंद्रे रसेल, ड्वेन स्मीथ या सर्वांनी अप्रतिम लेट स्विंग केले.
गमतीची गोष्ट अशी भारताने शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजीने वेस्ट इंडिजला हैराण केले तर वेस्ट इंडिजने फूल लेंथ गोलंदाजीने. हे क्रिकेट इतिहासाच्या उलटे झाले. मला वाटतं वेस्ट इंडिजचा गोलंदाजी कोच कर्टली अॅम्ब्रोजने ही रणनिती आखली होती. अॅम्ब्रोजने पूर्वी वाकावर काही अविश्वसनीय स्पेल टाकले होते. विंडीजची रणनिती सहापैकी पाच बॉल फूल लेंथ आणि एखादा शॉर्ट तर भारताची रणनिती चार बॉल शॉर्ट आणि दोन फूल लेंथ अशी होती. धवन, रोहित, रहाणे, रैना चांगल्या लेंथ बॉलवर आऊट झाले. कोहली आणि जडेजा शॉर्ट लेंथवर आऊट झाले. भारताच्या शॉर्टबॉलच्या जाळ्यात गेल, कार्टर, सिमन्स, सॅमी सापडले. भारताचे गोलंदाज विरुद्ध संघातल्या फलंदाजांना उत्तम दिशेने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर जेरीस आणत आहेत, हे चित्र सुखावह होते. मला वाटतं परिस्थितीनूसार विनींग कॉम्बीनेशन बदलण्याचा सूज्ञपणा दाखवायला हवा. वाकाच्या खेळपट्टीवर एक स्पीनर पुरे होता. जडेजाच्या जागेवर भुवनेश हवा होता.
जडेजाने वाईट गोलंदाजी केली नाही पण त्याच्याऐवजी भुवनेश्वर असता तर विकेट मिळवण्याच्या जास्त संधी मिळाल्या असत्या. स्पीनरची फ्लाईट दडपून टाकली की काम होत होते. जलदगती गोलंदाज स्वींग आणि बाऊंसमुळे अतिशय धोकादायक झाले होते. भुवनेश्वर ब-यापैकी फलंदाजीसुद्धा करु शकतो. जडेजा उतावळेपणा करुन बाद होतोय. फक्त गोलंदाजीचा जरी विचार केला तरी वाकावर जडेजाऐवजी भुवनेश्वरचं हवा होता. दोन स्पीनर्समुळे फार जोखीम न घेता वेस्ट इंडिजच्या चाळीस ते पन्नास धावा जास्त झाल्या हे नक्की.
दोन्ही बाजूंची फलंदाजी रडतरडत १८०पर्यंत पोहोचवली. मी माझी विकेट काहीही झालं तरी स्वस्तात देणार नाही अशा निश्चयाची फलंदाजी कोणीही केली नाही. चेंडू अंगावर घेईन, बाहेरच्या बॉलला काहीही झालं तर बॅट लावणार नाही, हूक मारणार नाही, बॉलच्या मागे येऊनचं खेळणार अशा ध्येयाने कुणीही फलंदाजी केली नाही. अशा खेळपट्टीवर सामान्य सैनिक कोण आणि तानाजी मालुसरे कोण याचा फैसला होत असतो. धोनीने नेहमीप्रमाणे लढवय्या फलंदाजाचे गुण दाखवले. अश्विनने धोनीला धीराने साथ दिली.क्षेत्ररक्षकांनी कमावलेले चांगले नाव या सामन्यात घालवले. जे झेल उमेश आणि शामीने सोडले ते ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, न्यूझीलॅंड वाल्यांनी घेतले असते आणि जे रोहित आणि जडेजाने सोडले ते ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा घेतले असते. क्वार्टर फायनलपासून प्रत्येक सामन्यातील काही अतिमहत्त्वाचे क्षण क्षेत्ररक्षणामुळे निर्णायक ठरणार आहेत. इतके सोपे झेल सोडल्यास आपले आव्हान बोथट होईल.एकूण काय तर वाकाच्या सामन्यात थोडक्यात बचावलो. ‘त्यांना’ मोका होता. पण आपला धोका टळला.

रवि पत्की -sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)